पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा
निमेश वहाळकर, दि. २४, मुंबई
मुंबईच्या गेल्या पन्नास-साठ वर्षांतील राजकीय, आर्थिक व सामाजिक-सांस्कृतिक वाटचालीतील महत्वाचे साक्षीदार म्हणजे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे. तसेच त्यांचे वडील 'प्रबोधनकार' केशव सीताराम ठाकरे हे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील एक मोठे नाव. प्रबोधनकार व बाळासाहेब या दोघांच्याही अनेक ज्ञात-अज्ञात आठवणींना उजाळा दिला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी.
निमित्त ठरले ते म्हणजे दिवाकर रावते व त्यांच्या पत्नी डॉ. मनिषा यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. यानिमित्ताने रावते यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान 'मेघदूत' बंगल्यावर एका छोटेखानी घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित काही मोजक्या पत्रकारांशी दिवाकर रावते यांनी दिलखुलास चर्चा केली. शिवसेनेची सुरूवातीची काही वर्षे, प्रबोधनकारांच्या आठवणी, सुरूवातीच्या निवडणुका, विविध पक्षांशी संबंध, भारतीय जनता पक्षासोबत युतीचा कालखंड, मराठवाड्यातील पुनर्वसनाचे कार्य, विविध नेत्यांशी बाळासाहेबांचे संबंध आदी गतकाळातील आठवणींमध्ये रावते चांगलेच रमून गेले. रावते यावेळी म्हणाले की, दादांची (प्रबोधनकारांची) स्मरणशक्ती जबरदस्त होती. ते थकल्यावरही व प्रकृती ठीक नसतानाही टाईपरायटरवर एका हाताने टाईप करत लेख लिहित असत. आम्ही सर्वच त्या काळात वयाने खूपच लहान होतो. आम्ही बऱ्याचदा ते लिहीत असताना त्यांच्यासमोर बसत असू. एखाद्या विषयावर लिहीत असताना प्रबोधनकार अचानक थांबायचे आणि आम्हाला समोरच्या कपाट ठेवलेले एखादं पुस्तक काढायला सांगायचे. त्या पुस्तकातील त्यांना हव्या असलेल्या संदर्भाचा अचूक पृष्ठ क्रमांक सांगून तो उतारा आम्हाला मोठ्याने वाचायला लावत. त्या नंतर आपल्या लेखातील संदर्भ तपासून मगच ते पुढचं लिहायला घ्यायचे. हा अनुभव आम्हाला खूपच समृद्ध करणारा ठरल्याचे रावते यांनी नमूद केले.
प्रबोधनकारांच्या लेखनातील नव्या शब्दांची निर्मिती हे एक वैशिष्ट्य आपल्याला अतिशय आवडत असल्याचे रावते यांनी सांगितले. दादांना शब्दांची पुनरावृत्ती अजिबात चालायची नाही. 'कोदंडाचा टणत्कार' हे या जबरदस्त शब्दनिर्मितीचेच एक उदाहरण असल्याचे रावते म्हणाले. माझ्या पत्नीने मराठीत डॉक्टरेट मिळवली त्यातही प्रबोधनकारांचेच योगदान मोठे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आजच्या पिढीला मात्र प्रबोधनकारांच्या या जबरदस्त लिखाणाबाबत जाणीव नसल्याची खंत रावते यांनी यावेळी व्यक्त केली. प्रबोधनकारांनी केलेले शिवसेना स्थापनेच्या वेळेचे मार्गदर्शन, संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान राज्यातील एकूण परिस्थिती, आचार्य अत्रे यांच्याबरोबर झालेले वाद यासोबतच बाळासाहेबांचे बंधू व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे वडिल दि. श्रीकांत ठाकरे यांच्या आठवणींनाही रावते यांनी उजाळा दिला. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शेवटच्या काळाबद्दलही रावते यांनी अनेक भावूक आठवणी सांगितल्या.
बाळासाहेब ठाकरे यांची कार्टूनिस्ट म्हणून कारकीर्द, 'मार्मिक'मधील सुरूवातीची वर्षं याबाबत बोलताना रावते म्हणाले की बाळासाहेबांना आम्ही केव्हाही भेटायला गेलो तरी ते वेगवेगळ्या विषयांवरील कार्टून्स काढण्यात व्यस्त असत. 'मार्मिक'मधून फोन येई की, अंकात अमुक एवढी जागा रिकामी आहे. बाळासाहेब लगेचच बसून बरोबर तेवढ्याच शब्दांचा लेख लिहून देत. आणि त्या लेखाचीही जबरदस्त चर्चा होई अशी आठवण रावतेंनी यावेळी सांगितली. शिवसेनेच्या मराठवाड्यातील विस्ताराबाबतही त्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच किल्लारी भूकंपाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेले पुनर्वसनाचे कार्य आणि स्वतः त्यात दिवसरात्र केलेलं काम हे लक्षात राहण्यासारखे असून मला ते जवळून पाहायला मिळाल्याचेही रावते यांनी आवर्जून सांगितले. सुमारे दीड-दोन तास झालेल्या या अनौपचारिक गप्पांमध्ये दिवाकर रावते हे गतकाळात चांगलेच रममाण झाले.