शिवसेनेचा ‘जैतापूर’ला विरोध लवकरच मावळणार ?

    12-May-2017   
Total Views | 2


 

रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर-माडबन येथे उभ्या राहत असलेल्या अणुउर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला कडवा विरोध लवकरच मावळण्याची असून त्यात आताही फारसा फारसा दम उरलेला नाही. प्रकल्प रोखणे आता जवळपास अशक्य असून शिवसेनेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २०१९ पर्यंत विरोध करण्यासाठी दुसरा एखादा मुद्दा मिळाल्यास जैतापूरबाबत शिवसेना सहज थंड होणार आहे. कोकणातील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने याबाबत माहिती दिली.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या काळात भारत व अमेरिकेदरम्यान झालेल्या अणुकरारानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर-माडबन येथे अणुउर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला गेला. अरेवा या फ्रेंच कंपनीच्या माध्यमातून उभ्या राहत असलेल्या या प्रकल्पाला प्रारंभी स्थानिक रहिवासी विशेषतः मच्छिमार, बागायतदार, शेतकरी आदींकडून विविध मुद्द्यांवर कडाडून विरोध झाला. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर हा प्रकल्प सुरळीतपणे उभा राहण्यासाठी स्थानिकांचा असंतोष दूर करण्याची जबाबदारी दिली गेली होती असे म्हटले जाते. त्यामुळे राणेंना विरोध करून राणेंच्या पक्षांतरानंतर पडझड झालेली पक्ष संघटना पुन्हा उभारण्यासाठीच शिवसेनेने जैतापूरचा मुद्दा उचलला असे भाजपच्या या नेत्याने सांगितले.

जैतापूरच्या विरोधामुळे शिवसेनेला राजापूर विधानसभा मतदारसंघात सातत्याने फायदा झाला. स्थानिकांच्या विरोधामुळेच आम्ही प्रकल्पविरोधात आहोत अशी सोयीस्कर भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र, आता या प्रकल्पाला स्थानिकांमधील विरोध बराच मावळला आहे. विस्थापितांना अत्यंत चांगले पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्गाची निर्मिती, दिघी बंदर विकास, चिपळूण-कराडसह अनेक रेल्वेमार्ग आदींमुळे कोकणाचे अर्थकारण भविष्यात बदलणार आहे. त्यामुळे बदलत्या काळात प्रकल्पाला विरोध फारसा उरणार नसल्याचे मत व्यक्त करत त्यामुळेच विरोधासाठी दुसरा मुद्दा सापडल्यानंतर शिवसेना जैतापूरबाबत लगेचच मवाळ होऊन जाईल असे या भाजप नेत्याने स्पष्ट केले.

जैतापूर प्रकल्पाचे भूमी अधिग्रहण पूर्ण झाले आहे, जागेला कुंपण घालण्याचे कामही पूर्ण होत आले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आता राजापूर भागातच उभ्या राहत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा विरोधासाठी उचलण्याची शक्यता असून त्यामुळे त्यात राजकीय ‘उपद्रव मूल्य’ दिसल्यास शिवसेना जैतापूरबाबत लवकरच थंड होणार असल्याचे या नेत्याने सांगितले. या वृत्तामुळे शिवसेनेचा ‘जैतापूर’ला असलेला इतक्या वर्षांचा ‘कडवा’ विरोध नेहमीप्रमाणेच ‘पेल्यातील वादळ’ ठरणार असल्याचेच स्पष्ट होत आहे.

 

निमेश वहाळकर

निमेश वहाळकर

सध्या मुंबई तरूण भारत मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत. मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121