
मोरया S S S हाक ऐकू आली आणि खेळ सोडून मी पळतच नलूआत्याकडे गेलो. नलूआत्याने सायंकाळच्या आरतीचा प्रसाद घेण्यासाठी बोलावले होते. प्रसाद घेऊन तिथेच झोपाळ्यावर बसलो. थोडा वेळ झोपाळ्यावर खेळून परत खेळात सामील झालो. हे माझ्यासाठी रोजचंच होतं. नलिनी महाशब्दे ह्या आम्हा सर्वांसाठी फक्त 'नलूआत्या' होती. आम्हा बालगोपाळांचं हक्काचं ठिकाण. . ती मला मोरया म्हणायची, माझे कान गणपतीसारखे आहेत म्हणून.
घरी वृद्ध आई आणि ती दोघीच. आईंना सगळे आक्का म्हणायचे. आक्कांची इतर मुलं शिकून मुंबई-पुण्याकडे स्थिरस्थावर झालेली. अधूनमधून नंदुरबारला भेटायला येत. मला आठवतं तेव्हापासून आक्का पाठीत बाक आल्यामुळे पुढे वाकून चालायच्या. आक्का बैठकीतल्या पलंगावर बसलेल्या असताना आम्ही मुद्दाम त्यांच्या समोरच्या झोपाळ्यावर जाऊन बसायचो. अक्का अतिशय प्रेमाने आमची विचारपुस करायच्या. जुन्या, नवीन ओव्या म्हणायच्या आणि त्या ओव्यांमध्ये आमचे नाव गुंफायच्या. ओव्यांमध्ये गुंफलेले आमचे नाव ऐकले की कोण आनंद व्हायचा.
नलूआत्या अविवाहित होती. शिवण क्लास मध्ये शिक्षिका होती. क्लास व्यतिरिक्त इतर वेळात देवपूजा, धार्मिक वाचन करायची. सोवळे खूप कडक पाळायची. रोजचा स्वयंपाक सोवळ्यात असायचा. उपास तापास बरेच असायचे. काही उपास तर एवढे कडक कि पाणीसुद्धा पीत नसे. तब्येत बरी नसताना उपास आहेत म्हणून औषध गोळ्या सुद्धा तिला चालत नसत.
हे सर्व असले तरी नलूआत्या ने तिच्या घरात एका रेवा नावाच्या भिल्ल बाई ला आधार दिला होता. घर नसलेली रेवा एका पत्र्याची शेड असलेल्या महादेव मंदिरात राहायची. रेवाचे जे काही थोडेफार सामान होते ते नलूआत्या च्या घरी असायचे. रेवाला तिने निराधार योजनेत नाव नोंदवून दिल्यामुळे महिन्याला काही पैसे मिळायचे. बरेच वेळा रात्रीचे जेवणही नलूआत्या तिला मंदिरात नेवून द्यायची.
नलूआत्या कडे गेलो आणि रिकाम्या हाताने परत आलो असे कधी घडले नाही. आंबावडी , श्रीखंड गोळी, खोबऱ्याची वडी, आलेपाक , आवळ्याचे पदार्थ असले काहीतरी हातावर मिळाल्याशिवाय आम्हीही परत गेलो नाही. काही वेळा तर फक्त वेगळा खाऊ खाण्याची इच्छा झाली म्हणून जरा नलूआत्याकडे जाऊन येतो गं असा आईला सांगून पळायचो. लपाछपी खेळताना हे घर सुद्धा आम्ही लपण्याच्या ठिकाणांमध्ये सामील करून घेतलं होतं.
अनेक कार्यक्रमांचं केंद्र ह्याच घरात होतं. बाल गणेश मंडळाचा गणपती आम्ही अनेक वर्ष तिथेच बसवला. गुरुवारी भजन, रोजचा संस्कार वर्ग, दरवर्षी होणारी दासनवमी , रामनवमी, गोकुळाष्टमी, हे सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन साजरे करत. इथे माझ्या जन्माच्या वर्षापासून दासनवमी साजरी करायला सुरुवात झाल्यामुळे सर्व आज्जी मंडळींमध्ये माझी (उगाचच) वट होती.
महिला मंडळाचे एकत्र येऊन शेवया करणे, पापड करणे हे कार्यक्रम सुद्धा याच ठिकाणी पार पडायचे. १५- २० कुटुंबांसाठी हे पदार्थ तयार करण्याचा कार्यक्रम लागोपाठ २-३ दिवस दुपारच्या वेळात चालायचा. दोन्ही हात शेवया वळण्यात गुंतलेले असताना आज्ज्या ओव्या म्हणायच्या. आमचा डोळा मात्र पापडाच्या लाटीवर असायचा. छानपैकी तेल लावलेली लाटी मिळेल म्हणून आम्ही उगाच मध्ये लुडबुड करत असू.
रोज सायंकाळी हे घर संस्कार वर्गासाठी येणाऱ्या मुलांनी गजबजून जात असे. माझ्यासारख्या अनेकांचे भगवद्गीतेच्या अध्यायांचे पाठांतर अनेक वर्षे इथेच झाले. कुणी काहीही म्हणोत पण आपल्या पुढच्या आयुष्याला चांगले वळण देण्यात बाल वयातील ह्याच क्षणांचा मोठा वाटा असतो.
शाळेत क्रमांक मिळवल्यावर आधी पळत जाऊन बातमी सांगायला ( आणि अर्थातच खाऊची बक्षिसी घ्यायला), नवीन कपडे घेतल्यावर देवाला-आई-पप्पांना नमस्कार झाल्यावर नमस्काराला जावे असे वाटायला लावणारी घरे आम्हाला लाभली हे भाग्यच म्हणायला हवे. काही घरं म्हणजे आजूबाजूच्या समाजासाठी ऊर्जाकेंद्र म्हणून काम करत असतात. अशा केंद्राभोवती आजूबाजूचा समाज काही चांगली कामे करायला एकत्र येतो. लहानपणी आम्हाला लाभलेलं असंच ठिकाण म्हणजे नलूआत्याचं घर.
-- भूषण नवीनचंद्र मेंडकी