जिवलग मित्राच्या स्मृतिदिनीच ‘त्याचा’ही मृत्यु...

    27-Apr-2017
Total Views |
 

सत्तरचे दशक चालू होते. राजेश खन्नाने (काका) या काळात मोठा पडदा त्याच्या अदाकारीने अक्षरश: व्यापून टाकला होता. याच काळात त्याला शह देण्यासाठी एक ताड-माड, लुकडा-सुकडा आणि दिसायला सुंदर असणारा एक चेहरा समोर आला व बघता बघता काकाचे अस्तित्त्व पुसट होऊ लागले. अमिताभ बच्चनचा झंझावात दिवसेंदिवस वाढत असतानाच लाखो तरूणींच्या स्वप्नात जसा राजकुमार दिसतो अगदी तसाच त्याच ढाटणीतला एक अतिसुंदर अगदी आत्ताच्या भाषेत सांगायच तर एक ‘हँडसम हंक’ बॉलिवूडला मिळाला. साडेसहा फुट उंच, गोरापान वर्ण, राजबिंडा चेहरा आणि दणकट शरीरयष्टी लाभलेल्या या युवकाने आपल्या तडफदार अभिनयाच्या सहाय्याने अल्पावधीतच स्वत:चा मोठा फॅन क्लब निर्माण केला. या राजबिंडा चेहर्‍या असणार्‍या अभिनेत्याचे नाव होते विनोद खन्ना. 


 
बॉलिवूडमध्ये आजही असे खूप कमी अभिनेते आहेत की, ज्यांनी आपल्या करिअरची सुरूवात निगेटिव्ह भूमिका स्वीकारून केली. ‘मन का मित’, ‘पुरब और पश्‍चिम’, ‘सच्चा झुटा’ यांसारख्या चित्रपटातून विनोदने व्हिलनच्या भूमिका साकारत आपले कौशल्या सादर केले. सुरूवातीच्या काळात त्याच्या कार्याची फार दखल घेतली गेली नाही, परंतु नंतरच्या काही चित्रपटातून देखणे व्यक्तिमत्त्व व तरल अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात आपले एक स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले. याच काळात त्याचा काकानंतरच्या सुपरस्टारशी म्हणजेच थेट अमिताभशी सामना सुरू झाला. अमर अकबर अँथनी, खून पसीना, हेराफेरी, जमीर, परवरीश व मुकद्दर का सिकंदर हे मल्टिस्टारर चित्रपट विनोद आणि अमिताभ या दोन दिग्गज कलाकारांनी मिळून गाजविले. 

 
आत्तापर्यंत विनोदची दखल तर रसिकांनी, समिक्षकांनी तसेच मोठ्या-मोठ्या दिग्दर्शकांनी घेतलीच होती. पण अजूनही त्याच्या मध्ये असणार्‍या उर्जेला पूर्णपणे दाद देईल असा चित्रपट प्रदिर्शित झालाच नव्हता. तर मग या खर्‍या हिर्‍याची पारख केली कोणी, तर ते नाव होत फिरोज खान. बॉलिवूडला फिरोज खान या नावानेही दिग्दर्शन, अभिनय व निर्माता म्हणून बरचं काही भरभरून दिल. या त्याच्या योगदानातला एक मोलाचा टप्पा म्हणजे त्याने विनोदला सोबत घेऊन प्रदर्शित केलेला ‘कुर्बानी’ हा चित्रपट. विनोद, फिरोज आणि झिनत अमान अभिनित या चित्रपटाचा विषय तसा फार वेगळा नव्हता. ‘लव्ह ट्रँगल’वर आधारीत असणारे असे बरेच चित्रपट या आधी आले होते किंबहुना ‘कुर्बानी’ नंतरच काही महिन्यांनी अमिताभ, शत्रुघ्न सिन्हा व झिनत अमान यांचा ‘दोस्ताना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तरीदेखील या सगळ्या गोष्टींना झुगारून ‘कुर्बानी’ने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मिळविलेले यश खरोखरीच कौतुकास पात्र होते. या चित्रपटानंतर फिरोज आणि विनोद यांच्यातील मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत झाले. वेळोवेळी ते पडद्यावर तर दिसतच होते परंतु त्यांच्या खर्‍या आयुष्यातही ते मैत्रीसाठी आदर्श ठरू लागले. पुढे जाऊन फिरोज खानने दिग्दर्शित केलेल्या ‘दयावान’ने तर विनोद खन्नाला यश शिखरावरच नेऊन पोहचवले. ‘शक्ती’ (विनोन) आणि ‘शंकर’ (फिरोज) या जोडीला ‘दयावान’मधूनही प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळाली. विनोद खन्नाने यातील ‘शक्ती’ अक्षरश: जिव झोकून साकारला होता. फिरोज व विनोदची ‘रिल लाईफ’मध्ये केमिस्ट्रि जितकी चांगली होती त्याहीपेक्षा कैकपटीने जास्त ते एकमेकांना ‘रिअल लाईफ’मध्ये जिवलग होते. 

 
आता हा या दोन मित्रांचा दुर्देवी योगायोग म्हणायचा की पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मैत्रीसाठी दिलेली ही आणखी एक ‘कुर्बानी’च म्हणायची, ते सांगता येणार नाही, पण सत्य मात्र नाकारता येणं अवघड आहे. ज्या दिवशी फिरोज खान यांचा स्मृतिदिन (27 एप्रिल 2009) असतो त्याच दिवशी विनोद खन्ना (27 एप्रिल 2017) यांचा मृत्यु झाला आहे. यात आणखी एक साधर्म्य म्हणजे कर्करोगानेच दोघांचाही बळी घेतला. एकाअर्थी पाहिले तर हे योगायोगच म्हणावे लागतील. पण शेवटी कुठे ना कुठे याचा एकमेकांशी संबंध जोडला जाणार हे मात्र नक्की. 
 
अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन ते अगदी आत्ताचा बॉलिवूडचा सलमान भाई आणि सुलक्षणा पंडीत पासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांसोबत सहकलाकार म्हणून काम करून आपली प्रतिभासंपन्न कला आपल्यासमोर ठेवणार्‍या आणि मोजकेच चित्रपट करूनही बॉलिवूडमध्ये एक अढळ स्थान निर्माण करणार्‍या विनोद खन्ना या राजबिंड्या कलाकाराला महा तरूण भारतच्यावतीने भावपूर्ण आदरांजली!
 
- प्रथमेश नारविलकर