अमरावती जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला

    27-Apr-2017
Total Views |

अमरावतीचा जिल्हाधिकारी म्हणून मेळघाटातील कुपोषणाच्या समस्या संबंधित इतर बाबींचा प्राधान्याने विचार करणार आहे. अमरावती हे विभागीय ठिकाण असून येथील प्रशासनाला मोठी परंपरा आहे. अशा जिल्ह्यात काम करायला मिळणे हे मी भाग्याचे मानतो, असेही बांगर म्हणाले. आज बांगर यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी ते बोलत होते. ही जबाबदारी स्वीकारून बांगर हे अमरावतीचे ३७वे जिल्हाधिकारी बनले आहेत.

पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट, २०१४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. पालघरचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून काम करताना या आदिवासीबहुल जिल्ह्याचे असताना तेथील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. तिथे काम करताना ही समस्या समजून घेतल्या, उपाय आखले, त्याची अंमलबजावणी करण्याचा अनुभव मिळाला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातही मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यास प्राथमिकता देणार असल्याचे नव्याने येथे रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.

अभिजित बांगर यांनी २००८ च्या बॅचमधून आयएएस अधिकारी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्याचप्रमाणे, त्यांनी रायगड सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रत्येकी दोन वर्षे काम केले आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.