थेट परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी घेतली दखल
घरबसल्या एसटीचा पास काढून देणारे सॉफ्टवेअर
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील राहुल सागवेकर नामक १९ वर्षीय विद्यार्थ्याने चक्क एसटी बसेसचे विद्यार्थ्यांचे पासेस ऑनलाईन बनवून देणारे सॉफ्टवेअर बनवले आहे. विशेष म्हणजे या प्रयोगाची दखल थेट राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही घेतली आहे.
चिपळूण येथे राहणारा राहुल सागवेकर हा चिपळूणच्याच दातार-बेहरे-जोशी महाविद्यालयातील बी.एस्सी (कम्प्युटर सायन्स)चा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. राहुलने काही महिन्यांपूर्वी जळगाव येथील एका विज्ञान स्पर्धेसाठी एक सॉफ्टवेअर बनवले. यामध्ये गेल्या काहीं दिवसांत त्याच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मदतीने अधिकाधिक सुधारणा करत थेट एसटी महामंडळाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पासेसचे सॉफ्टवेअर बनवले. ‘न्यू पास रिन्युअल सिस्टीम’ असे नाव राहुलने या यंत्रणेला दिले आहे.
सध्याच्या एसटीच्या विद्यार्थी पासेस देण्याच्या यंत्रणेत बस स्थानकावरच लेखी नोंदणी करावी लागते. अर्थातच मग रांगेत उभे राहणे वगैरे गोष्टी आल्याच. या सर्व गोष्टींना या नव्या सॉफ्टवेअरमुळे फाटा मिळू शकतो व एसटी आणि विद्यार्थी दोघांचाही वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो असा राहुलचा दावा आहे. राहुलच्या सॉफ्टवेअरमध्ये विद्यार्थ्याची एकदा नोंदणी केल्यानंतर काही सेकंदात त्याचा पास हाती येतो. पासचे नूतनीकरण करतेवेळी केवळ विद्यार्थ्याचे नाव टाकल्यास त्याची सर्व माहिती, आधी घेतलेल्या पासच्या नोंदी आदी गोष्टी स्क्रीनवर उपलब्ध होतात. ही यंत्रणा महाविद्यालय स्तरावर वापरल्यास प्रत्येक महाविद्यालय स्वतःच पासेस वितरीत करू शकेल व एसटी स्थानकावर जायची गरजच पडणार नाही असे राहुलचे म्हणणे आहे. यंत्रणा अत्यंत ‘युझर फ्रेंडली’ व सुरक्षित असल्याचा त्याचा दावा असून प्रात्यक्षिक दाखवतेवेळी राहुल काही सेकंदात आपला पास तयार करून दाखवतो. संगणकाला प्रिंटर जोडला की छापील पास हातात. लवकरच या सॉफ्टवेअरचे ‘पेटंट’ मिळवण्यासाठी राहुल प्रयत्न करणार आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावतेंकडून दखल
राहुल सागवेकर याच्या या अभिनव प्रयोगाची दखल थेट राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे. आजच राहुलने मुंबईत येऊन दिवाकर रावते यांची भेट घेतली. रावते यांना या सॉफ्टवेअरच्या वापराचे प्रात्यक्षिकही दाखवले. यानंतर रावते यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हेच प्रात्यक्षिक परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्याची सूचना केली. यानंतर एसटीच्या विद्यार्थी पासेसशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रावते यांच्या सूचनेनुसार हे प्रात्यक्षिक बघितले. यानंतर यामध्ये काही किरकोळ सुधारणा करण्याची सूचना देत लवकरच या सॉफ्टवेअरबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन राहुल सागवेकरला यावेळी दिले.
निमेश वहाळकर