कार्लोस जर्मन गेला म्हणून निकारागुआ येथील मित्राची ई-मेल आली आणि काही आठवणी जाग्या झाल्या. अमेरिका (यु.एस.ए ) आणि लॅटिन अमेरिकेच्या मधील सेंट्रल अमेरिका नावाने ओळखला जाणारा प्रदेश म्हणजे सेंट्रल अमेरिका. त्यातील ७ देशांपैकी एक म्हणजे निकारागुआ.
त्याचं खरं नाव कार्लोस, पण त्याला सगळे कार्लोस जर्मन या नावानेच ओळखत. ह्या नावाचं कारण म्हणजे त्याचे वडील हे जर्मन ज्यू. आई दुसऱ्या कुठल्यातरी देशाची असावी, त्याच्या आई विषयी तो कधी फार बोलला नाही. तो स्वतःला ज्यू मानायचा.
कार्लोसला आमचा दुभाषी म्हणून काम दिले होते. आम्ही आणि तेथील प्रकल्पाचे क्लायंट यांच्यात इंग्लिश- स्पॅनिश संवाद साधायला मदत करणे हे त्याचे काम. वय ६७-६८ वर्षे म्हणजे २००६-०७ साली आम्ही एकत्र असताना.
जर्मन असून सुद्धा उंचीने साधारण म्हणजे साडेपाच फूट, गोल चेहरा, डोक्याला टक्कल. शरीर मजबूत, एकेकाळी सैन्यात होता. ६० च्या दशकात कुठल्यातरी गृह युद्धात भाग घेतलेला. त्या युद्धात छातीत बंदुकीची गोळी लागून झालेली जखम तो मोठ्या अभिमानाने दाखवायचा. विशेष म्हणजे ती गोळी त्याच्या शरीरातच राहिली होती. त्यासाठी ३-४ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. जखमेवरची पट्टी सुद्धा नियमितपणे बदलावी लागायची. इच्छाशक्ती एवढी जबरदस्त की ती गोळी शरीरात बाळगून स्वारी अनेक दशके जगात वावरत होती. पेहराव अगदी साधा, चौकटीचा अर्ध्या बाह्यांचा बुशशर्ट साधारणपणे तपकिरी रंगातील असायचा आणि डार्क रंगाची विजार. शर्ट कधीच विजारीत खोचलेला नसायचा. डोक्यावर टक्कल झाकणारी एक टोपी मात्र नेहमी असायची.
फक्त दुभाषी अशी जबाबदारी असली तरी कार्लोस फक्त तेवढ्यावर समाधान मानणारा नव्हता. त्या वयात सुद्धा त्याला आम्ही नेमके काय काम करतो ते बघायची, शिकायची इच्छा असायची. कुठले उपकरण कसे काम करते हे तो जाणून घ्यायचा. त्यासाठी दिवसातून ४-5 वेळा आमच्या बरोबर ६ मजले चढ-उतार करायचा त्याचा उत्साह आश्चर्यकारक होता. आम्हीच काही वेळा काळजीने नको येउ म्हणून सांगितलेले त्याने कधी ऐकले नाही.
मोकळा वेळ असताना सतत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला कार्लोस ला आवडायचे. स्पॅनिशचा थोडाफार अभ्यास केल्यामुळे मी त्याच्याशी व तेथील अन्य लोकांशी बऱ्याच वेळा स्पॅनिश भाषेत संवाद साधायचो. माझाही सराव व्हायचा, आणि तेथील लोकांनाही आपल्या भाषेत बोलतो म्हणून बरे वाटायचे. तेथील लोक आम्हाला लोस हिंदुएस ( ते हिंदू) म्हणत. आम्हाला सुरुवातीला हे ऐकून आश्चर्य वाटले. मग नंतर कळले कि ते सर्व भारतीयांना हिंदु म्हणूनच संबोधतात. तेथील बऱ्याच लोकांना भारताविषयी फक्त ऐकून माहिती होते. काही लोकांनी मला हेटाळणीनेच विचारले होते कि भारतात हत्ती हे वाहतुकीचे साधन आहे का, लोक खूप गरीब आहेत का वगैरे. मग मी एक दिवस सगळ्यांना बोलावले. गुगल वर शेअरच करून भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील झेप, प्राचीन भारतीय शोध अशी सगळी माहिती दिली. ते पाहून सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. काही जण तर लगेच म्हणाले, हे पाहून आम्हाला पण भारताला भेट द्यायची इच्छा झाली.
पण ह्या सगळ्याला कार्लोस अपवाद होता. कारण कार्लोस चे अफाट वाचन. एकूणच जगातील अनेक गोष्टीविषयी त्याचे वाचन अफाट होते. त्याला धार्मिक , आंतरराष्ट्रीय राजकारण, खेळ कुठलाही विषय चालत असे. इतर जर्मन लोकांप्रमाणे त्यालाही फ़ुटबाँल चे भयंकर वेड होते. त्याच्या शाळेतील गमतीजमती सांगताना तो आठवणीत रमून जायचा. निकारागुआतील जिवंत ज्वालामुखींविषयी त्यानेच आम्हाला माहिती दिली आणि जरूर बघून या म्हणाला. भारताविषयी बोलताना त्याच्या बोलण्यात खूपच आदर जाणवायचा. त्याच्या वाचनातले अनेक संदर्भ देऊन तो म्हणायचा, भूषण, तुमची संस्कृती खूप पुरातन आणि खूप उच्च आहे, खूप परिपक्व आहे. नाहीतर इथले लोक बघ. इथे आम्हाला स्वतःचा इतिहास नाही, संस्कृती नाही. लोक कशासाठी जगतात, जीवनाचे ध्येय काय हे त्यांना माहिती नाही. तुमच्या संस्कृतीत मोक्ष मिळवणे हे आयुष्याचे ध्येय असते". हे सर्व तो सांगू लागला कि मी अवाक होऊन जात असे. कोण कुठला सेंट्रल अमेरिकेतील निकारागुआ नामक छोट्या देशातील कार्लोस नावाचा माणूस मला भारताची आणि हिंदू संस्कृतीची महती सांगतोय, ही कल्पनाच भारावून टाकणारी होती. अर्थात त्याचवेळी मला भारतातील बदलाची जाणीव होत असे.
अनेक दिवस आमचा संवाद असाच सुरु होता. दरम्यान छातीचे दुखणे बळावल्यामुळे, कार्लोसला काही दिवस कामाच्या ठिकाणी येणे जमले नाही. आम्हालाही अक्षरशः दिवस रात्र काम असल्यामुळे त्याची विचारपूस करणे जमले नाही. परंतु काम संपत आले तसे अचानक एक दिवस कार्लोस चा निरोप आला. त्याने त्याच्या घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते. त्या नंतरच्या रविवारी संध्याकाळी त्याच्या घरी चहा बरोबर खूप गप्पा झाल्या. त्याच्या व कुटुंबीयांनी दिलेली छोटी भेटवस्तू घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही भारतात परतलो ते कार्लोसच्या आठवणी मनात जपूनच.
- भूषण मेंडकी