कळत-नकळत - झाडूवाली

    12-Apr-2017   
Total Views |

 
झपझप चालत ती चौकात आली. बरोबर नेहमीच्या सहकारी झाडूवाल्या बायका होत्याच. आज  जरा उशीरच झाला होता. रोज सकाळची पावणेसातची वेळ होऊन गेली होती. गोल नेसलेली साडी,  डोक्यावर पदर,  एका हातात टोपली-खराटा आणि दुसऱ्या हाताने डोक्यावरचा पदर सांभाळत तिने  चौकातल्याच जैन मंदिराच्या ओसरीवर बसकण मारली. कमरेला खोचलेली मिश्रीची पुरचुंडी काढून त्यातील  थोडा ऐवज डाव्या हाताच्या तळहातावर घेतला आणि पुरचुंडी परत कमरेला खोचली. दोनच मिनिटात मिश्री तोंडात सारून समोरचा चौक झाडण्यासाठी प्रत्येकीने आपापलया  ठरलेली जागा सांभाळल्या. हातातला खराटा भराभर चालू लागला. चौकाचा एकेक कोपरा स्वच्छ होऊ लागला. रस्त्यात पडलेले कागद, प्लास्टिक, कडुलिंबाच्या झाडाचा पालापाचोळा रस्त्यावरच्या मातीतून वेगळे होऊन  टोपलीत गोळा होऊ लागले.  
 
मातीत चालणाऱ्या खराट्याचा खर्रर्र्र - खर्रर्र्र आवाज येताच मी घराच्या आतील भागातून दरवाजाकडे धाव घेतली. आता रस्त्यावरची सगळी धूळ उडून घरात येणार! आज अंगणात सडा पण टाकलेला नाहीये, विचार करतच दार बंद करू लागलो. माझे वय जेमतेम दहा-बारा वर्षे असेल. मी त्या रोजच्या  स्वच्छता मोहीमेचे  निरीक्षण बऱ्याच वेळा केले होते.  घराच्या अगदी समोरचा भाग झाडणाऱ्या त्या बाईंबरोबर आज एक लहान मुलगा पण होता. कागद, प्लास्टिक उचलायला आईला मदत करत होता. तो शाळेत जात असेल का ? हे लोक कुठे राहतात ?  यांचे सगळे नातेवाईक सगळी सफाईचीच कामे करतात असे आईने सांगितले होते, म्हणजे हा मुलगा मोठा झाल्यावर हेच काम करेल? अनेक प्रश्न  माझ्या मनात गर्दी करू लागले. त्या विचारताच मी घरात परतलो. 
 
पाऊणेक तास झाल्यावर खराटे शांत झाले. चौक आता कसा लक्ख दिसत होता. टोपलीतल्या कचऱ्याने मुख्य रस्त्याच्या एका कडेची जागा घेतली. आता त्या कचऱ्याचा पुढचा प्रवास कचरा उचलणाऱ्या गाडीतून होणार होता. झाडूवाली जैन मंदिराच्या ठरलेल्या ओसरीवर विश्रांतीसाठी बसली. पदर सारखा करून पुन्हा एकदा तंबाखूचा बार भरला आणि समोरच्या घरापुढे जाऊन आवाज दिला ' माई...  पानी'. पिण्याचे पाणी मागण्यासाठीची ही नेहमीची हाक. '
 
जा, तांब्यात पाणी दे तिला', स्वयंपाक करता करता आई ने सांगितले. 
मी- 'फक्त तांब्या? कसं  पिणार तांब्याने? '. 
 
आई - तू वरून तांब्याने पाणी टाक, ती ओंजळ करून पिते .  
 
मला  काही हे पटलेले नव्हते- 'असं का पण?  मी तिला व्यवस्थितपणे भांड्यानेच पाणी देणार'. ' 
 
ठीक आहे, देऊन बघ'- इति आई. 
 
तांब्या भांडं हातात घेऊन चुकीची पद्धत आज बदलायचीच अशा निश्चयाने मी दाराकडे निघालो.
 
'माई, जल्दी करो..देर हो रही है '  बाई घाई करत होती. दार उघडून  बाई समोर हातातले भांडे धरले, 'हे घ्या'. बाई काही क्षण माझ्याकडे  पाहतच राहिली. मग भानावर येत हाताची ओंजळ करून म्हणाली, ऐसेही दे दो भैया. 
 
मीही ठाम -  ' हे भांडं घ्या; चालेल आम्हाला'
 
'नही नहीं भैया, ऐसा नही कर सकते, ऐसा नही चलता'
 
'अरे ले लो ना बर्तन'
 
'देखो भैया, अगर जिद्द करोगे तो मैं पानी नही लुंगी.' 
 
मी हताश झालो, भांडं घ्या म्हणावं तर ही बाई पाणीच घ्यायला तयार नाही. जाऊ दे म्हणत वरूनच तांब्याने पाणी ओतायला  सुरुवात केली. बाई हाताच्या ओंजळीने पाणी पिऊ लागली. 
 
पाणी ओतताना माझे  विचारचक्र जोरात फिरू लागले होते. काय पण परंपरा आहे? पूर्वी ह्या लोकांचा स्पर्श सुद्धा चालत नव्हता म्हणून कोणीतरी  वरूनच पाणी देण्याची पद्धत सुरु केली. आता मी परंपरा तोडायला तयार आहे, पण ह्या बाईंच्या  डोक्यातली  स्वतःविषयीची हीन  भावना कशी काढणार?  
 
झाडूवालीला  मात्र आज वेगळीच जाणीव दिवसभर अस्वस्थ करत होती. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिला आपणही इतरांसारखे माणूस आहोत असे वाटू लागले होते. 
 
 
- भूषण नवीनचंद्र मेंडकी
हीच गोष्ट तुम्ही इथेच ऐकूही शकता ..

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.