'PET प्रश्न'

    30-Mar-2017
Total Views |


 

पूर्वीच्या काळी प्रवासाला जाताना पिण्याच्या पाण्यासाठी फिरकीचा तांब्या वापरला जायचा. त्यातलं पाणी आरोग्यासाठी उत्तम होते. आता आपण प्लॅस्टिकच्या  बाटल्या नेतो प्रवासात ! शीत पेये सुद्धा अशाच बाटल्यांमधून मिळतात. काम झाले कि या बाटल्या आपण  फेकून देतो. त्यांचं पुढे काय होते हा प्रश्न क्वचितच पडतो.

या प्रश्नाचे उत्तर २३ फेब्रुवारीला गाडगे महाराजांच्या जयंती निमित्त "पूर्णम इकोव्हिजन" ने आयोजित केलेल्या माहिती सत्रामध्ये मिळालं. पूर्णम इकोव्हिजन पर्यावरण पूरक उत्पादनांची निर्मिती करते. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे. 

पूर्णम इकोव्हिजनने ‘पेट बॉटल्स’ चा हा प्रवास दृक श्राव्य माध्यमातून उलगडून दाखवला.

वापरून फेकून दिलेल्या या बाटल्या भंगार गोळा करणारे लोक कबाडी वाल्याकडे आणून देतात. बाकी भंगार सामानाच्या तुलनेत या बाटल्यांना चांगली किंमत मिळते. कबडीवाले या बाटल्या रिसायकलिंग युनिट मध्ये आणून टाकतात. इथे त्यांचे वर्गीकरण केले जाते. बाटल्यांना असलेली लेबल्स व अल्युमिनियम ची झाकणे वेगळी काढून या बाटल्या क्रश केल्या जातात. त्यांचे अतिशय बारीक तुकडे किंवा 'फ्लेक्स'  केले जातात. व त्यापासून नंतर धागा काढला जातो.


या धाग्याचा  उशा , खेळणी , कपडे,carpets बनवण्यासाठी उपयोग केला जातो.

आपल्या इंडियन क्रिकेट टीम चे टी -शर्ट्स नायके या कंपनीने रिसायकल केलेल्या  प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेले होते. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने NIKE ने उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. मोठ्या उद्योगधंद्यांनी याचे अनुकरण केले तर पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल.


आजच्या घडीला आपल्या  देशामध्ये जवळपास ४० रिसायकलिंग युनिट्स आहेत. पण यापेक्षा जास्ती रिसायकलिंग युनिट्सची गरज आहे. जपान या बाबतीत अग्रेसर आहे.  तिथे जवळजवळ ७०% पेट बॉटल्सचा पुनर्वापर होतो. पेट बॉटल्सच्या पुनर्वापरामुळे कचरा डेपो मधला कचरा कमी होतो.

या बाटल्याचा सुलभपणे पुनर्वापर होण्यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. उदा. रंगीत बाटल्यांचा वापर टाळणे, बाटल्या तयार करताना धातूची झाकणे लावणे टाळणे.लोकांनी कचरा टाकताना या बाटल्या वेगळ्या देणे. ई.

परंतु प्लास्टिकच्या बाटल्यांचा प्रश्न पुनर्वापराने सुटणारा नाही. कारण या प्रक्रियेत प्लास्टिक नष्ट  होत नाही. फक्त त्याच्या उपयुक्ततेचा काळ वाढतो.

मुळात आधी बाटल्यामधून मिळणारे पाणी खरेदी करण्याची खरंच आवश्यकता आहे का? हा विचार केला पाहिजे.  बाटलीमधून विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेविषयी कोणतीही खात्री पाणी विकणारी कंपनी देत नाही . आज प्रगत देशांमध्ये  ५० कोटी पेक्षा जास्त बाटलीबंद पाणी विकले जाते. ते सुद्धा हजारो पट जास्त किमतीने. ! या बाटल्याच्या उत्पादनासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती नाहक खर्ची पडते.

ग्राहकांच्या मनात नळाद्वारे येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेविषयी शंका निर्माण करून, भुरळ पडणाऱ्या जाहिरातीद्वारे ग्राहकाला बाटली बंद पाणी विकत घेण्यासाठी उद्युक्त केले जाते. आणि शेवटी त्या बाटल्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

या साठी कमीत कमी बाटल्याचे उत्पादन होईल व त्यांचा पुनर्वापर कसा होईल यावर भर देणे आवश्यक आहे. 

या दिशेने IRCTC ने एक पाऊल उचलेले  आहे . २५० रेल्वेस्थानकांवर पिण्याचे पाणी मशीनद्वारे उपलब्ध करून दिले आहे. ज्यायोगे आपण परत आपल्या बाटलीत पाणी भरून घेऊ शकतो. आणि अगदी माफक दरात.!


प्लास्टिक व त्यापासून बनवलेल्या वस्तू विकत घेतांना, वापरतांना आणि नंतर त्याची विल्हेवाट लावतांना तारतम्य बाळगणे अतिशय गरजेचे आहे.

प्लास्टिक च्या निर्मिती साठी होणार नैसर्गिक संपत्तीचा वापर मर्यादित करण्याची आवश्यकता आहे.

 - अनुजा जोगळेकर