
हिंदू धर्माचे एक व्यवच्छेदक लक्षण जर कोणते असेल तर ते म्हणजे विविधता आणि स्वातंत्र्य. आणि त्यामुळेच जगभरातल्या हिंदूंमध्ये अनेक गोष्टींच्या बाबतीत विविधता आढळते. तो भेद नसतो तर ते वैविध्य असते. हिंदूंच्या सणांच्या बाबतीतही तीच बाब लागू होते. हिंदू लोक हे फार पूर्वीपासून खगोलशास्त्राचे जाणकार होते आणि आहेत. साहजिकच त्यामुळे त्यांच्या राहाण्याच्या ठिकाणानुसार त्यांनी गणित मांडून, चंद्र सूर्याच्या स्थितीवरून पंचांगे तयार केली आणि त्यानुसार तिथींचे मोजमाप केले. त्यामुळे स्थलकालसापेक्ष त्यात किंचित फरक आढळतो.
हिंदू नववर्षाच्या बाबतीतही हाच फरक आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रात, कर्नाटकात, आंध्रप्रदेशात, मणिपुरात, काश्मीरात आणि सिंध प्रांतात साजरा होणारा पाडवा किंवा उगादी किंवा पाडौवा हा सण हिंदूंचे नववर्ष नाही असा एक आक्षेप काही मंडळी कायम उपस्थित करत असतात. त्यांना असे वाटते की संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची जयंती म्हणून संघ हा दिवस समस्त हिंदू समाजावर थोपवतो. आणि त्यासाठी ते बैसाखी, कार्तिक प्रतिपदा वगैरे अशी उदाहरणे देतात. त्यामुळे हिंदूंचे नववर्ष एकच कसे असू शकते, त्यांच्यात तर विविधता आहे आणि तीच जोपासली पाहिजे वगैरे तर्क देतात.
मुळात हिंदू नववर्षाचा भाव नीट समजून घ्यायला हवा. हिंदूंच्या सगळ्याच सणांप्रमाणे हा ही सण हा पर्यावरणीय बदलांशी जोडलेला आहे. नवीन वर्षामागची मूळ कल्पना ही सृष्टीचक्राशी जोडलेली आहे. पृथ्वीच्या फिरण्याशी तिचा संबंध आहे. त्यामुळे जेव्हा शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू सुरू होतो, म्हणजेच जेव्हा झाडांची पानगळ संपून नवी पालवी फुटण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू होते, पर्यावरणाचे चक्र पुन्हा नव्याने सुरू होते तेव्हाच नवीन वर्ष साजरे केले जाते. आपल्याला हे माहिती आहे की केरळमधील शाळांच्या परीक्षा आणि सुट्ट्या मार्च एप्रिलमध्ये असतात कारण तिकडे पाऊस महाराष्ट्रापेक्षा १५ दिवस आधी दाखल होतो. आणि दिल्लीत तो १५ दिवस उशिरा दाखल होतो. बाकी ऋतूंचेही तसेच आहे. आणि म्हणूनच नर्मदा, तापी नदीच्या खालच्या भागात पानगळीची प्रक्रिया फेब्रुवारी - मार्चमध्ये होते तर उत्तरेत ती मार्च - एप्रिलमध्ये होते. नववर्षाच्या सणाच्या बाबतीतही तसेच आहे. ढोबळमानाने एकाच कारणासाठी हा सण साजरा केला जातो. अपवाद फक्त गुजरात, काश्मीर, तामिळनाडू आणि केरळचा. तिथेही याचे कारण म्हणजे आपल्या देशांत काही राज्यात चांद्र पंचांग वापरतात आणि काही भागात सूर्य पंचांग. त्यातही निरनिराळ्या प्रदेशातील सूर्योदयानुसार वेळेत आणि तिथीत थोडा फरक पडतो. तामिळनाडूत सौरवर्ष मानलं जातं त्यामुळे तिथे नववर्षाची तारीख बदलते. गुजरातमध्ये बहुतांश समाज हा व्यापारी आहे आणि म्हणूनच ते दिवाळी पाडवा नववर्ष म्हणून साजरा करतात.

त्यामुळे सृष्टीत होणारा सकारात्मक बदल साजरा करणे ही ती मूलभूत संकल्पना असल्यामुळे साधारणपणे १५ दिवसांच्या फरकानेच हे सण साजरे केले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. आणि याचेही सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारतात असलेली कृषीप्रधानता. हे सगळे कशासाठी तर बळिराजा त्याचे पीक काढून तयार असतो. उन्हाळा झाला की नवीन पेरणीला प्रारंभ होणार असतो. त्यामुळे या काळात त्याच्याकडे वेळ आणि पैसे दोन्ही असतात म्हणून याच काळात हा सण साजरा करण्याची पद्धत निर्माण झाली. हा गाभा समजून घेतला तर हे लक्षात येईल की गुढी पाडवा आणि बैसाखी ही दोन्ही हिंदूंची नववर्षेच आहेत. त्यामुळे जे गुढी पाडवा साजरा करतात त्यांनीही हिंदू नववर्ष म्हणावे आणि बैसाखी साजरी करणाऱ्यांनीही.
गुढी पाडव्याला ऐतिहासिक महत्त्वही आहे ते म्हणजे प्रभू श्रीराम याच दिवशी वनवासातून पुन्हा अयोध्येत आले, शालिवाहन राजाने परकीय शासनकर्ते शकांचा पराभव केला. हे दाखले काही प्रांतवाचक नसल्यामुळे पाडवा हा देखील खऱ्या अर्थाने हिंदू नववर्षदिन आहे. त्यामुळे गुढी पाडवा हे मराठी नववर्ष तर आहेच पण त्याच बरोबर ते हिंदूंचेही नववर्ष आहे हे नाकारता येणार नाही.
हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!