लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपल्या हुशारीने कोणालाही गंडवू शकतो अशी धारणा या कार्यक्षेत्रातील अनेकांची होऊन बसलेली दिसते आहे. असे नमूद करण्याचे कारण की, देशातील एक महत्वाच्या इंग्रजी वृत्तपत्राने राम मंदिर आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विषयी धडधडीत खोटी स्टोरी बनवून आपल्या वेबपोर्टलवर लावली होती. आजच्या २० वर्षांपूर्वी अश्या टेबलावरच्या बातम्यांचे खूप मोठे मार्केट होते, वृत्तपत्राने छापले म्हणून खरे मानणारा वर्ग देखील होता, मात्र आज जमाना बदलला आहे!! सोशल मिडियासारखे महत्वाचे माध्यमं समाजातील जागरूक लोकांच्या (विशेषत: तरुणांच्या) हाती असल्यामुळे तथाकथित उदारमतवादी, पुरोगामी माध्यमांचे पितळ उघडे पडते आहे, याचे भान मात्र ही मंडळी द्वेषापायी पार विसरून गेलेली दिसते.
उत्तरप्रदेशची शासकीय वेबसाईट, योगी आणि राम मंदिर
योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या संदर्भात अनेकानेक तर्क-वितर्कांना माध्यमांमध्ये उधाण आल्याचे दिसत आहे. योगी आता हिंदुत्वाचा अजेंडा चालवणार का? मुस्लीम भयभीत आहेत का? राम मंदिर त्वरित बनवले जाईल, असे नसलेल्या खपली उकलून काढायच्या कामात सध्या माध्यमे व्यस्त दिसत आहेत. त्यात एक मोठी भर पडली ती आज दुपारी. एका महत्वाच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबपोर्टलवर, उत्तरप्रदेश सरकार राम मंदिर बांधण्याबाबत लोकांचे मत घेत आहे व ते मत उत्तरप्रदेश सरकारच्या शासकीय वेबसाईटवर दाखल करता येत आहे असे त्यांनी सांगितले.
http://ayodhya-issue.gov-up.in या वेबसाईटवर गेल्यास लक्षात येते की तेथे मतनोंदणी सुरु आहे. मात्र काय खरे आणि काय खोटे, हे ओळखण्यात तथाकथित प्रगल्भ देखील चुकले ही बाब लक्षात घेणे महत्वाची आहे. परंतु सोशल मिडियामुळे हा खोटारडेपणा बाहेर यायला जास्त वेळ लागला नाही. उत्तरप्रदेश सरकारची शासकीय वेबसाईट http://up.gov.in अशी आहे. थोडे तांत्रिक बाजूने समजून घेतल्यास लक्षात येईल की, खोटी वेबसाईट च्या नावात "gov-up.in" हे जवळपास सारखे वाटणारे नाव त्यांनी वापरले आहे. डॅश(-) आणि डॉट(.) हा खूपच सूक्ष्म फरक खऱ्या आणि खोट्या साईटच्या नावात आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ही साईट खरी असल्याचे वाटते. या वेबसाईटचा अजून एक फसवेपणा सांगण्यासारखा आहे. तो म्हणजे www.gov-up.in वर आपल क्लीक केल्यास ते आपल्याला खऱ्या साईटवर नेते. म्हणजे ayodhya-issue शब्द न वापरल्यास आपण खऱ्या साईटवर रीडायरेक्ट होतो, त्यामुळे देखील भूल होऊ शकते. तिसरा मुद्दा म्हणजे येथे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो वापरून त्यांच्या बद्दल माहिती लिहून खरी साईट असल्याचे भासवले जात आहे. प्रत्येक साईटच्या सर्वात खाली राखीव हक्कांबद्दल लिहिले जाते त्यात Copyright © 2017 Uttar Pradesh General Online Voting System - up-gov.in असे लिहिले आहे. आता Uttar Pradesh General Online Voting System याचा शॉर्ट फॉर्म केल्यास UP GOVS असा होतो. म्हणजे कुणी या विरोधात हक्क भंगाची तक्रार करायला गेल्यास स्पष्टीकरण द्यायला देखील त्यांनी वाव ठेवला आहे.
Here are the screenshots of the fake story of UP govt opinion poll by @EconomicTimes #FakeMedia pic.twitter.com/cKDrL9shfJ
— Sameer Manekar (@sameer_manekar) March 24, 2017
थोडक्यात सांगायचे झाल्यास अश्या फसव्या वेबसाईटमुळे अनेक वेळेला चुकीची माहिती समाजात पसरवून गैरसमज निर्माण केले जातात व परिणामी दुफळी माजते. त्यामुळे काय खरे काय खोटे? हे उघड्या डोळ्याने तपासून आपण माहिती घ्यायला हवी. अश्या घटना आधी फेसबुक आणि ट्वीटरच्या बाबतीत देखील होत असत. कुणाचे अकाउन्ट खरे आणि खोटे हे तपासण्यासाठी सोशल मीडियात ब्लू टिक नावाची सोय उपलब्ध झाली असून त्यामुळे सत्यता तपासता येते. परंतु माध्यमांच्या बाबतीतला प्रश्न मात्र कायम राहतो. स्वत:ला प्रगल्भ, पुरोगामी, सत्यातावादी, उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्यांना 'खबर के पीछे की खबर' तपासण्याची तसदी घाव्यी वाटू नये! म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला प्रामाणिक आणि खऱ्या लोकांची किती आवश्यकता आहे हे जाणवून येते.
समाज माध्यमांमुळे उशिरा सुचलेले शहाणपण
या दरम्यान त्या वृत्त पत्रावर सोशल मीडियातून सडकून टीका होऊ लागल्यामुळे माफी मागण्याची वेळ आली. आपण केलेली बातमी चुकीची होती. राम मंदिराबाबत असा कुठलाही मतदान उत्तरप्रदेश सरकार घेत नसून ती एक फसवी वेबसाईट आहे हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. खरी पत्रकारिता केली असती तर चुकीच्या वेबसाईटवरून बातमी बनवण्याआधी कुण्या मोठ्या अधिकाऱ्याचे अथवा नेत्यांचे वक्तव्य घेण्याची तसदी करता आली असती. मात्र येनकेन प्रकारे विशिष्ट विचारसारणीला झोडपून काढायचे, आणि सर्वात आधी आमच्याकडे!! असा टेंभा मिरवत टीआरपी मिळवायचा, केवळ हेच ध्येय असल्यामुळे तोंडावर पडण्याची वेळ आली. आणि असत्याचे वाभाडे समाजमाध्यमांतून काढले गेले. अर्थात अश्या प्रसंगांपासून शिकण्यासारखे असते. त्यामुळे या क्षेत्रातील प्रामाणिक वृत्ती जागृत ठेवत अनेक लोक यातून धडा घेतील अशीच अपेक्षा आहे.
- हर्षल कंसारा