उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड भागात मोदींनी बाजी मारली आणि तेव्हाच मी ठरवलं की त्यांच्या नावाने इथे श्रमपरिहार साजरा करायचा आणि त्यांचा विजय सुद्धा इथे साजरा करायचा...
बरं विजय आहे उत्तर भारतातला, मग डिश दुसरी कुठची तरी कशी चालेल म्हणून मग ठरवलं, उत्तर भारतातली मोघलाई डिश करूया आणि नेमकं म्हटलं तर विजय साजरा करायचा तर डिशसुद्धा गोडचं हवी ना ?
आपण बऱ्याचदा पंचतारांकीत हॉटेल्समध्ये येत- जात असतो. इथलं बुफ़े जेवणं हा खरतरं एक विलक्षण अनुभव असतो माझ्यासाठी.
पण त्यातल्या त्यात म्हणालं तर इथे गेल्यावर इतर सगळ्या पदार्थांसोबत एक सेक्शन मात्र नेहेमीच माझे लक्ष वेधून घेतो आणि तो सेक्शन म्हणजे दुसर तिसर काही नसून तो विभाग असतो रंगारंग स्वादिष्ट डेझर्टस चा सेक्शन…
कुठल्याही व्यक्तीचा मूड फुलवण्याचा, आसमंतात आनंदी वातावरण दरवळवण्याचा, द्रुष्टी सुखच नव्हे तर अमर्याद जिव्हा सुखही पोचवण्याचा, अदभूत रंगसंगतीची मर्मभेदी उधळण आणि जोडीला विविध चवींचा आधी तोंडात आणि नंतर तिथून थेट मेंदूमध्ये स्वादांचा प्रसन्नचित्त आनंदी निधान पेरणारा असा हा डेझर्टसचा सेक्शन…
चला तर मग, जास्त वर्णन नको, आता मोदींच्या विजयाचे सेलिब्रेशन करायला केलेल्या या आलिशान शाही स्वीट डिशची रेसिपीच पाहुया….
विलक्षण टेस्टी होते हे डिश मित्रांनो आणि मैत्रिणींनो….
मी केलं आहे आणि आम्ही सर्वांनी मस्त चाखलही आहे. फक्त एकच नम्र विनंती आहे की आधी ही पूर्ण रेसिपी एकदा, दोनदा, तीनदा नीट वाचा. परत परत वाचा, नीट समजून घ्या, काही अडलच तर बेझिझक थेट मला विचारा आणि नंतरच करा… प्लीज.... प्लीज.... प्लीज.....
चला तर मग समजावून घेऊया शाही तुकडा...
साहित्य :-
म्हशीचे दुध – अर्धा लिटर
साजूक तूप – प्रत्येक स्लाईसला एक चमचा असे ८ चमचे तूप (मी गाईचे तूप वापरतो, घरी कढवलेले)
व्हाईट ब्रेड – चार स्लाईस, त्याच्या कडा कापून टाका आणि मधून एक छेद देऊन त्रिकोणी आकारात कट करा. हे करताना शक्य असेल तर ब्रेड कटर नाईफ वापरा (व्हीट ब्रेड अजिबात नको... किंचित वापरतो आपण इथे हा नेहेमीचा मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड... त्यामुळे हाच मैद्याचा साधा व्हाईट ब्रेडच वापरावा. हा ब्रेड सुद्धा न विसरता तारीख पाहून ताजा बघा आणि घ्या, जितका हा ब्रेड ताजा असेल तितकी डिश मस्त कुरकुरीत होईल)
साखर – दोन वाट्या
वेलदोड्यांची पावडर - १० वेलदोडे (वेलचीची सालं नका घेऊ, ती चहाच्या बरणीत टाका, चहाला छान वास येतो मागाहून, वेलची सोलल्यावर काळ्या बिया असतात आत, याची आधीच पूड करून निराळी ठेवा, शक्यतोवर वेलची कुटायचा खल-बत्ता इतर कशाला वापरू नका, मी वेलचीसाठी वेगळा सेट ठेवला आहे, इतर कशाचाही वास वेलचीला पटकन लागू शकतो).
बदाम – २० उभ्या पातळ काप चिरलेले
हिरवे पिस्ते – २० उभे पातळ काप चिरलेले
केशर – १० काड्या
कृती :-
माझ्या सर्वच कृती तश्या सोप्प्या असतात.
ही शाही तुकडा’ची कृती तशी अवघड नाहीये पण या डिशच्या नावातच शाही असल्याने जरा काळजी नक्की घ्यावी लागते हे नक्की मैत्रांनो.
तेव्हा नेहेमी सारखीच तुम्हा सर्वांना नम्र विनंती की आधी ही पूर्ण पाककृती नीट शांतपणे वाचा, मनातल्या मनात पदार्थ करून पहा आणि मगच डिश करायला घ्या.
चला तर मग करायला घेऊया शाही तुकडा
१) सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात पाव कप पाणी घ्या. आता यात म्हशीचे चांगले घट्ट दुध ओता आणि मंद विस्तवावर हे दुध आटवायला सुरुवात करा. आटवताना मध्ये मध्ये हे दुध आपल्याला ढवळत राहायचे आहे, पातेल्याला शेजारी लागलेली साय आपल्याला पुन्हा पुन्हा दुधात मिक्स करायची आहे हे लक्षात ठेऊया.
हे दुध आटवून आपल्याला निम्म्यापेक्षाही कमी करायचे आहे, ऑलमोस्ट रबडीच करायची आहे म्हणा ना.
पूर्ण घट्ट रबडी तयार होण्याच्या पाच एक मिनिटेचं आधी या मिश्रणात एक वाटी साखर घाला आणि ढवळायला सुरुवात करा. ही साखर विरघळेल तसे तसे मिश्रण परत पातळ होईल, चिंता नको, हे नैसर्गिक आहे.
आता अजून काही वेळ हे मिश्रण पुन्हा घट्ट होण्यासाठी जरा वेळ अजून ढवळायचे आहे. हे ढवळत असताना आता यात एकूण चिरून ठेवलेल्या बदाम आणि पिस्तांपैकी निम्मे सरकवून पुन्हा ढवळायला सुरुवात करूया.
आता यात एकूण केलेल्या वेलच्या पुडी पैकी पाउण पूड घालून आणि सोबत केशर कांड्या सुद्धा घालून परत ढवळायला सुरुवात करूया.
ही कृती आपण पहिली करायला घेतली आहे कारण या कृतीला लागणारा वेळ बघितला तर ही कृती सगळ्यात शेवटपर्यंत चालू राहू शकते.
आता तुमच्या स्वतःवरच्या ताब्याची परीक्षा आहे कारण या रबडीचा जो गंध घरात पसरायला आता सुरुवात झाली आहे त्यापासून घरच्यांना आणि स्वतःला देखील लांब ठेवणे हे फार अवघड असते. हे मी का म्हणतो ते तुम्हाला तेव्हा लक्षात येईल.
पण ताबा ठेवा...अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त.
आता तयार झालेली ही रबडी आच बंद करून तयार ठेवा. फार गार होऊ न देण्याची दक्षता घ्या, झाकून ठेवलं तरी चालेल.
२) आता दुसऱ्या अश्याच जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा कप पाणी घ्या आणि मंद आचेवरठेवा, जरा पाणी गरम झाले की यात अर्ध्यापेक्षा जराशी जास्त साखर घाला आणि ढवळायला सुरुवात करा.
या मिश्रणाचा आपल्याला घट्टसर पाक करायचा आहे, बऱ्यापैकी घट्ट, हा पाक जेव्हा तयार झाला आहे असे आपल्या लक्षात येते तेव्हा एक थेंबभर पाक बाहेर काढून पहा आणि तो जरा तार तयार करणारा चिकट झाला असेल तर ते योग्य आहे असे मानायला हरकत नाही.
माझं असं झालं होतं की मी एकाच वेळी दोन्ही हातांनी एका पातेल्यात दुध आणि दुसऱ्याने साखरेचा पाक ढवळत होतो.... शेजारी शेजारी, पर्याय नाही, छान डिश व्हायची असल्यास हे पळापळीचे कष्ट करावेच लागतात.
हवा तसा पाक तयार झाला की, विस्तव बंद करून हा पाक गार होऊ द्या.
३) एका पसरट तव्यावर आता आपल्याला बऱ्यापैकी साजूक तूप घ्यायचे आहे. आता मंद विस्तव लावा आणि तूप जरासे गरम झाल्यावर, या तव्यावर सर्व ब्रेड स्लाईस अलगद सोडा आणि या स्लाईस आपल्याला सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत गरम करायच्या आहेत, हा रंग येईपर्यंत या स्लाईस एकदा दुसऱ्या बाजूने देखील छान गरम करा.
आवश्यकता असेल तितके तूप या स्लाईसच्या बाजूने सोडत राहूया. विश्वास ठेवा ही डिश शाही आहे, मुबलक तुपाचा वापर करा, एकावेळी तुम्ही जास्तीत जास्त एकच, मी तर म्हणतो अर्धाच तुकडा खाऊ शकता, त्यामुळे तुपाची चिंता करू नका, बिनधास्त तूप वापरा.
तसही आपण गाईचे साजूक तूप वापरत आहोत, सो नो टेन्शन बॉस.
४) हव्या तश्या रंगाच्या स्लाईस तयार झाल्या की, नंतर या स्लाईस (आपल्या फायनल प्लेटिंग आपण ज्या डिश मध्ये करणार आहोत त्या डिशमध्ये) काढून घ्या. कृती क्रमांक २ मध्ये तयार केलेला आणि आत्ता गार झालेला पाक आता हळुवार छोट्या चमच्याने या स्लाईसवर मुरवत मुरवत सोडत चला, घाई नको, सावकाश होऊ द्या, हा पाक जितका जास्त छान आत मुरेल तितका हा तुकडा फ्रीज मधून बाहेर आल्यावर छान लागणार आहे हे लक्षात ठेवूया.
५) आता साखरपाक मुरवलेल्या या स्लाईसवर आता कृती क्रमांक एकमध्ये केलेली रबडी हळुवार सोडायला सुरुवात करा. पुन्हा सांगतो घाई नको.. घाई न करता अलगद चमच्याने रबडी यावर पसरायला सुरुवात करा, शक्यतोवर रबडी प्लेटमध्ये पडायला नको, जितकी शांतपणे ही कृती कराल तितकी रबडी स्लाईसवर स्थिरावेल आणि तुकडे जास्तीत जास्त शाही होतील, विश्वास ठेवा.
६) आता झालेत आपले तुकडे तयार.
आता यावर मगाचचे बाजूला वगळलेले बदाम आणि पिस्ते पसरवून टाका आणि वेलची पुढ सुद्धा पसरावा. डेकोरेशनसाठी ४-५ केशर कांड्या पसरवा, छान दिसतात. शेवटी डिश जितकी जास्त छान दिसते तितकी खायला सुद्धा जास्त मजा येतेच ना मैत्रांनो, काय म्हणता?
७) आता ही झाली आपली शाही डिश तयार.
आता ही डिश मोजून ५ मिनिटे डीप-फ्रीजरमध्ये ठेवा, मोजून ५ मिनिटे बऱ, ना कम ना ज्यादा...
आता पाच मिनिटानंतर खाली रेग्युलर फ्रीजमध्ये आणि इथे किमान अर्धा तास तरी ही डिश ठेवा...
ही झाली आपली डिश तयार....
या डिशचा आनंद घेत घेत मोदींना पुढल्या गुजरात, केरळ सकट उरलेल्या भारतासाठी सुद्धा शुभेच्छा देऊया आणि अश्या गोडधोड करायच्या संधी मोदी आपल्याला वारंवार देऊ देत यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करूया.
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...
आणि ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
भरपेट खा... आरोग्यदायी रहा.. खूष व्हा... मस्त जगा
देव बरा करो.........
-मिलिंद वेर्लेकर