चला तर मग साहित्य बघूया...............
साहित्य
अर्धा किलो भेंडी - (भेंडी विकत घेताना शक्यतो ४ इंचापेक्षा कमी लांबीची छान ताजी, कोवळी आणि शक्यतो घट्ट भेंडी निवडावीत,भाजीवाला ओळखीचा असेल तर (एखाद्याच भेंडीचे) टोक मोडून पाहावे, एका झटक्यात कटकन मोडणारी भेंडी उत्तम...चिवटपणे मोडता मोडली नाही तर ढुंकून ही अजिबात पाहू नका,
या भाजीसाठी भेंडी आधी किमान २-३ तास चिरून ठेवावी लागतात...
आयत्या वेळी चिरलीत तर अकारण भाजी बुळबुळीत होते )
पाव किलो घट्ट दही - (हे दही किंचित आंबट असेल तर भाजी जास्त छान लागते...
अगदी गोड दही तितके छान लागत नाही...
शेवटी माणसाने आंबट शौकीन असलच पाहिजे ना...थोडतरी किमान :P :P )
टोमॅटो - 2 ताजे लालबुंद रसरशीत - मध्यम आकाराच्या फोडी ( धारदार सुरीने तुकडे करून घ्या...
रस गळता कामा नये, भाजीत रस गळला तर भाजीत पाणी जास्त होवून भाजीचे फर्म स्ट्रक्चर बिघडू शकते)
कडीपत्ता - ३ चमचे भरून
कलौंजी - 2 चमचे (याला Onion Seeds ही म्हणतात...२० रुपयाला साधारण २० ग्राम मिळतो हा प्रकार)
धने - जिरे पूड - प्रत्येकी एक एक चमचा
हिरव्या मिरच्या - ४ उभ्या चिरून घ्या
तेल - ४ चमचे
कांदे - २ मध्यम आकाराचे उभे चिरून
हळद - पाव चमचा
लाल तिखट - १ चमचा (काश्मिरी डिश असल्याने जर काश्मिरी तिखट वापरू शकलात तर बहार येईल)
कोथिंबीर - ४ चमचे बारीक चिरलेली
मीठ - चवीनुसार (साधारण दोन चमचे)
हिंग - चिमुटभर (रेडीमेड हिंग आणण्यापेक्षा खडा हिंग आणा...भन्नाट स्वाद आणतो हा हिंग प्रत्येक पदार्थाला)
साखर - चिमुटभर
जिरं - एक चमचा
आणि.....तुमच्या पूर्ण कुटुंबाची अपॉईंटमेंट...
कारण ही काश्मीरी डिश सगळ्या जणांनी एकत्र आस्वादणे म्हणजे भन्नाट आनंद आहे....believe me...
पाककृती
१) बाजारातून आणलेली छान कोवळी छोटेखानी भेंडी मस्त स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्याने भरलेल्या कुंड्यात ५ एक मिनिटे बुडवून ठेवा.
२) ५ मिनिटानंतर बाहेर काढून एक एक भेंडे व्यवस्थित कोरड्या टॉवेल ने पूर्ण कोरडे करून घ्या आणि बाजूला वेगळ्या कोरड्या भांड्यात ठेवा.
३) भेंडीचे देठ धारदार सुरीने कापून टाका आणि प्रत्येक भेंडीचे आडवे मध्यम आकाराचे चिरून तुकडे करा.
४) जाड बुडाच्या भांड्यात ४ चमचे तेल घ्या आणि ते तापल्यावर त्यात चिमुटभर हिंग टाकून हिरव्या मिरच्या टाकून हलकेच परता आता जिरे टाका , परता , कडीपत्ता टाका , परता, कलौन्जी टाका, परता, आणि आता सगळेच्या सगळे कांदे टाकून किमान ५ ते ७ मिनिटे कांदा सोनेरी रंगाला येईपर्यंत परता (ज्या क्रमाने पदार्थ दिले आहेत त्याच क्रमाने आणि मध्ये मध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे परतत परतत राहा...
घाई होते आहे म्हणून सगळ एकत्र सरकवून एकदम परतू नका...
अपेक्षित स्वाद आणि लज्जत यायची असेल तर पेशंस हवाच हवा)
५) अग्नी कमी करा...आता हळद, धने जिरं पूड घाला आणि परता , साखर आणि मीठ घाला आणि नीट परता.....लाल तिखट घाला आणि पुन्हा परता....इथे मीठ आणि साखरेमुळे मिश्रणाला खमंग वास यायला सुरुवात होईल आणि मस्त अंगचे पाणी सुटायला सुरुवात होईल....
६) आता चिरलेली भेंडी या पातेल्यात घाला....अग्नी पुन्हा जरा जास्त करा....५ मिनिटे परता...आणि आता पाण्यात हात ओला करून या पाण्याचा हबका पातेल्यातल्या भाजीवर एक दोन वेळा मारा...(हबका म्हणजे पाण्यात हात बुडवल्यानंतर जेव्हढे पाणी हाताला लागून वर येईल तितकेच पाणी भाजीवर शिंपडणे...
असे दोन वेळा करा...
हबका एकाच ठिकाणी मारू नका...
सगळ्या भाजीवर एकसारखे पाणी पसरले जाईल असे मारा).
आता या भांड्यावर झाकण ठेवून तब्बल ४ मिनिटे काही हि न करता शांत राहा.(एक ग्लास मस्त पाणी पिवून घ्या...
मगा पासून पाणी प्यालं नाहीये...
अधून मधून पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते.)
आता झाकण काढून भाजी एकदा परत...पुन्हा हलक्या हाताने पाण्याचा एक हबका मारा...आता या भांड्यावर झाकण ठेवून तब्बल ४ मिनिटे निवांत रहा...
आता घरातल्या सगळ्या मंडळींना सांगून या कि पुढील पाच मिनिटांत जेवण तयार होणार आहे...
पाणी घ्या...
सगळ्यांना घोटभर पाणी पिवून घ्याला सांगा...
आपल्या शास्त्रांमध्ये आचमनाला महत्व आहे....
ताट घ्या...
लोणचं आणि पापड घ्या...
७) आता भाजी जवळपास तयार झाली आहे...
आता या भाजी मध्ये सगळीकडे नीट पसरून चमच्या-चमच्याने सर्व दही घाला...
टोमाटो घाला...आ
णि सर्व भाजी खालीवर अशी परतून घ्या...
जेणेकरून आत्ता घातलेले दही सगळीकडे सगळ्या भेन्ड्यांना नीट सजवेल...
आणि टोमाटो जरासे शिजून मऊ झाले कि अग्नी बंद करा...
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वर पसरून टाका...
८) आता ही तयार झालेली भाजी या पातेल्यातून दुसऱ्या एखाद्या सर्व्हिंग बाउल मध्ये त्वरीत काढून घ्या...
सगळ्यांना टेबलावर बोलवा...
मस्त प्लेटिंग मध्ये लोणचे , पापड, कांदा, टोमाटो आणि आवडत असल्यास लिंबू घ्या...
भात आवडत असल्यास वाफाळलेल्या भातावर हि भाजी वरून पसरा...आणि विशेष न कालवता कोरड्या भातासोबत खावून बघा.....जबऱ्या लागते
आणि हात जोडून डोळे मिटून भोजन मंत्र म्हणून शांत चित्ताने, सुहास्य वदनाने भोजनाला सुरुवात करा....
एक विनंती...ही भाजी डब्यात घेवून जावू नका...गरमागरमच छान लागते...
आणि टीव्ही पाहात पाहात हि भाजी खावू नका...
एक घास घेतल्यावर जो काही स्वाद हि भाजी तोंडामध्ये तयार करते त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर टीव्ही बंद करा...आणि आता सावकाश जेवा......
वेडे व्हा..वेडे करा
खुप खा...खूप जगा
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...
आणि हि डिश केल्यानंतर नक्की कळवा....
भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा
- मिलिंद वेर्लेकर