‘कुठे नेऊन ठेवलाय काँग्रेस व राष्ट्रवादी माझा..?’

    23-Feb-2017
Total Views |


आज महाराष्ट्रातील राजकीय समिकरणं बदलणारा निकाल लागला. भारतीय जनता पार्टीने लोकसभा, विधानसभा व त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत मिळविलेल्या निर्विवाद यशामुळे एनसीपी व काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधत आहे. हा संवाद काल्पनिक असला तरी वास्तवाशी त्याची जवळीकता मात्र नक्कीच असणारा. 

----

एक सामान्य कार्यकर्ता : अरे नरेंद्रा आणि देवेंद्रा, का रे बाबा नेमकं काय चुकलं आमचं? दोन-अडीच वर्षांपूर्वी तर माझ्या काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या देशभरात मानाने झळकत होतं. जनतेचं माहित नाही पण पक्षातील नेते मंडळी तरी सुखावह अवस्थेत होती... दरम्यानच्या काळात नरेंद्रा तुझं नाव झळकलं आणि संपूर्ण देशात हाहाकार माजावा तसचं काहीसं झालं आणि देशपातळीवर माझे हे दोन्ही लाडके पक्ष जमिनदोस्त झाले... बरं ठिक आहे, चुक झाली असेल आमच्याकडून, जे झालं ते आम्ही विसरलो, त्यातून पुन्हा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच देवेंद्रा तु आमच्या समोर येऊन उभा ठाकलास... पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली. महाराष्ट्राच्या क्षितीजावरूनही आम्हाला हद्दपार केल्यासारखी वागणूक देण्यात आली आणि आम्ही पुन्हा रसातळाला गेलो. पण तरीही यशवंतराव अन् शरदरावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला व पुन्हा राज्यातील पालिका तसेच काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मोठ्या उमेदीने सज्ज झालो... या निवडणुकांचे आज निकाल पाहिले आणि आता मात्र सांगायलाही नकोसं वाटतयं इतकी दयनीय अवस्था आमच्या पक्षाची झाली आहे. म्हणूनच खूप उद्विग्न होऊन आता तुला विचारावसं वाटतयं की कुठे नेऊन ठेवलाय काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष माझा..?
देवेंद्र : पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला तुझा आदर वाटतोय. पण कसयना मित्रा, तुमचे हे दोन्ही आवडते पक्ष आम्ही कुठेही नेऊन ठेवलेले नाहीत. त्यांना केवळ जनतेनेच त्यांची जागा दाखवून दिली आहे. आम्ही नाममात्र या खेळातील प्यादे आहोत. खरा सुत्रधार तर तो कर्ताकरविता आहे. आपल्याकडे म्हणतात ना, ‘जैसी करनी, वैसी भरनी’ अगदी तसचं झालयं बघ तुमचं..!

कार्यकर्ता : अरे, देवेंद्रा पण नेमकं काय चुकलं ते तरी सांग लका...?
देवेंद्र : हे बघ मित्रा, तुमच्या पक्षाच काय चुकलं हे सांगण्या इतका मी मोठा नाही. कारण माझ जेवढ वय (46) आहे, त्यापेक्षा जास्त राजकीय क्षेत्राचा अनुभव (50 वर्ष) पवार साहेबांना आहे व माझ्या वयाच्या जवळपास तिपटी ऐवढी वर्ष (132) आज काँग्रेस राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे मी याविषयी सांगण म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारख आहे...’ मी एवढं मात्र सांगू शकतो की आम्ही जनतेला काय हवं त्याकडे जास्त लक्ष दिलं. त्यांना आदर दिला, मान दिला. एवढचं नाही तर गेल्या दोन वर्षात जी आश्‍वासनं दिली ती पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला. त्यामुळेच तर आम्हाला सलग तीन निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालं.

कार्यकर्ता : देवेंद्रा, तुझ्या नेतृत्त्वावर संताप व्यक्त करावा की तुझे तोंड भरून कौतुक करावे याच संभ्रमात खरतर मी पडलो आहे. कारण माझ्या आवडत्या या दोन्ही पक्षाकडे आता असे खंबीर नेतृत्त्वच राहीले नाहीये रे... जे नेतृत्त्व आहे, त्यांच्यात तरूणांना एकत्र आणण्याची, विकासाची दूरदृष्टी दाखविण्याची किंवा अप्रत्यक्षरीत्या पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसविण्याची क्षमताच नसल्या सारखे वाटते. अंतर्गत हेवेदावे अन् सत्तेचा आजपर्यंत केलेला उन्माद यामुळे जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. अगदी गावपातळीपर्यंत पोहचलेले हे दोन्ही पक्ष आज महाराष्ट्रातून नष्ट होऊ पाहत आहेत. अगदी पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, सोलापूर हे या पक्षांचे बालेकिल्लेही आज हातातून निसटत चालले आहेत... एक कार्यकर्ता म्हणून मी खूपच हतबल झालो आहे रे, आता तुच काय तो मार्ग दाखव.
देवेंद्र : अरे मित्रा, तुझ्यासारखेच अनेक कार्यकर्तेच नव्हे तर नेतेही याच विवंचनेत अडकून बर्‍याचदा माझ्या संपर्कात येतात. आता तिकडून स्वखुशीने आमच्या पक्षात आलेल्यांना आम्ही स्वीकारलं तर लोक म्हणतात भाजप हा ‘आयात’ नेत्यांचा पक्ष आहे. अरे पण मला सांग जर तुमचीच तिथे कुचंबणा होत असेल आणि तुम्हालाच जर चांगल्या राजकारणाची साथ हवी असेल तर आम्ही तरी तुम्हाला का झिडकारू, मग आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहीला. म्हणूनच बिनदिक्कत आजपासून अगदी या क्षणापासून तु माझ्यासोबत ये, पुढील काळात परिवर्तनाच्या लाटेल सहभागी झाल्याचा आनंद आणि समाधान तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही.

----