
इंग्लिश मध्ये असे म्हटले जाते कि - Leaders don’t do different things, they do the things differently. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी भारताच्या ISRO ह्या अवकाश संशोधन संस्थेने १०४ उपग्रह अंतराळात यशस्वीपणे नेऊन ठेवले आणि जगात भारताची मान उंच झाली. ह्या उपग्रहांपैकी ३ भारताचे तर १०१ उपग्रह हे इतर वेगवेगळ्या देशांचे आहेत. "मानव जाति की सेवा में अंतरिक्ष प्रौद्योगिकी" (Space technology in the Service of humankind) हे ध्येयवाक्य घेऊन इस्रो ही संस्था १५ ऑगस्ट १९६९ रोजी तत्कालीन राज्यकर्त्यांनी आणि शास्त्रज्ञांनी स्थापन केली. त्यानंतर इस्रोने तयार केलेला आर्यभट्ट हा पहिला उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजीअंतराळात सोडायला रशिया ने भारताला मदत केली होती. आणि आत्तापर्यंत भारताने अनेक मोहिमांमधून इस्रोने भारताची अंतराळातील कामगिरी सिद्ध केली आहे.
आपल्या देशात असलेली शक्तीची साधने ओळखून त्या शक्तीचा उपयोग देशाच्या भल्यासाठी कसा करता येईल हे ओळखणे महत्वाचे असते. एखादी गोष्ट आधीपासूनच आमच्या कडे आहे पण आम्ही त्याचा उपयोग जगाशी आपले संबंध जोडण्यासाठी प्रभावीपणे , मुत्सद्दीपणे केलाच नाही तर तो करंटे पण ठरतो. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे भारताच्या असलेल्या शक्तिस्थानांचा उपयोग आत्मविश्वासाने मान उंच करून वावरण्यासाठी किती केला गेला? ह्याचे उत्तर जवळ जवळ नाही असेच येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा लालकिल्ल्यावरून प्रथम सांगितले की माझी इच्छा आहे की सार्क देशांचा एक उपग्रह इस्रोने आकाशात सोडावा. काय भन्नाट कल्पना आहे ना? एका उपग्रहाने आपल्या भोवतालच्या सात देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. ह्याच वर्षी ती कल्पना प्रत्यक्षात येणार आहे.
आपल्याला खगोलशास्त्राची प्राचीन परंपरा आहे. भारतीय लोक गणितात प्रचंड हुशार असतात हे जगात बोलले जाते. आपल्याकडे व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेचा उपयोग आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो हा विचार एक नेता म्हणून आपल्या पंतप्रधानांनी व्यवस्थेतल्याच लोकांना एक दिशा देऊन करायला लावला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज आपण पाहतोय कि २०१४ पासून इतर देशांचे उपग्रह आकाशात सोडण्यात पुढाकार घेत आहोत. अंतराळ क्षेत्रात आता भारत महासत्ता होत आहे हे आज जगातील अनेक देश मान्य करत आहेत. ह्याच प्रकारचे दुसरे उदाहरण म्हणजे आपल्याकडे मुबलक असलेल्या सोलर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग. भारतात वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण करण्यासाठी करावा असा विचार दुर्दैवाने राज्यकर्त्यांनी अनेक दशके केला नाही. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना मोदींनी तो विचार केला आणि वेगवेगळे प्रयोग करून गुजरात राज्य वीजनिर्मितीमध्ये अग्रेसर करून दाखवले. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उद्दीष्ट ठेवले 2019 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी सोलर पॉवर प्लांट लावले गेले, कोळसा उत्पादनातील अडचणी जूर करून कोळसा उत्पादन वाढवले, आणि वीजनिर्मिती वाढवली. आज भारतात तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात , मध्यप्रदेश अशा ठिकाणी सोलर पॉवर प्लांट सुरु झाले आहेत. पूर्ण देशभरात या प्रकारचे ३३ सोलर पार्क्सना मान्यता दिली गेली आहे.
भारताने २०२२ सालापर्यंत १०० गिगावॅट इतकी सोलर ऊर्जा निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. तसेच ६० गिगावॅट इतकी ऊर्जा वाऱ्यापासून निर्माण करण्याचे ठरवले आहे. सोलर ऊर्जेची किंमत सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. भारत सोलर ऊर्जेच्या बाबतीत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सर्व नेत्याच्या आणि त्याच्या बरोबर काम करत असलेल्या टीम च्या 'आपण देशहितासाठी काय काय करू शकतो' या दृष्टीमुळे आणि त्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे शक्य होत आहे.
- भूषण मेंडकी