युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काँग्रेस उपाय करेल : मनमोहन सिंग
08-Dec-2017
Total Views |
राजकोट: काँग्रेस निवडून आल्यास गुजरातच्या युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना करेल अशी ग्वाही काँग्रेस नेते व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली आहे. गुजरात निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची काल सांगता झाली. त्यावेळी राजकोट येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यातील युवक बेरोजगार बसले असून ज्या महत्वाच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यायला हवे त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी गुजरात सरकारवर केला.
यूपीए सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ही वृद्धीच्या मार्गावर होती. मात्र मोदी सरकारने त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत हीच अर्थव्यवस्था खाली आणली. अर्थव्यवस्था पुन्हा १०.६ टक्क्यांवर आणली तर मला आनंद होईल मात्र मोदी सरकार असे करू शकेल असे मला वाटत नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यूपीए सरकारच्या काळात जो नेता भ्रष्टाचार करत असे त्याला कठोर वागणूक दिली जात होती, मात्र, भाजपबद्दल असे म्हणता येत नाही. त्यांनी त्यांच्या शासन काळात एकाही भ्रष्टाचारी नेत्यावर कारवाई केली नाही असेही सिंग यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासोबत नर्मदेच्या मुद्द्यावर कधीच चर्चा केली नाही. ते असे म्हणतात की त्यांनी या मुद्यांवर माझ्याशी चर्चा केली, मात्र मला असे काहीही आठवत नाही असे स्पष्ट उत्तर मनमोहन सिंग यांनी यावेळी दिले. मी नेहमी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची स्वत:हून भेट घेतली. मी नेहमी माझी जबाबदारी पार पडली असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. सरकारच्या असुसंगत परराष्ट्र धोरणामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे तसेच सरकारने घेतलेले काही निर्णय हे देशाच्या हिताचे नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.