ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय.....

    07-Dec-2017   
Total Views | 2
 
 
असे म्हणतात की सार्वजनिक जीवनात जेव्हा प्रवेश केला जातो तेव्हा आपल्या जिभेवर ताबा ठेवणे आवश्यक असते. सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्या प्रत्येकावरच जनतेचे बारीक लक्ष असते, त्यामुळे या क्षेत्रातील मान्यवर तोलून-मापून बोलत असतात. तसे, न केल्यास त्यांच्यावर आत्मक्लेश करण्याची पाळी येते. हे सांगण्याचे कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य.
 
अलिकडच्या काळात राजकारणाची पातळी एवढी खालावली आहे की, राजकीय व्यक्तींच्या धोरणांवर टीका न होता व्यक्तीचा द्वेष केला जातो. याचा परिणाम म्हणून मणिशंकर अय्यरसारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली आणि पंतप्रधान मोदींबद्दल त्यांनी 'नीच' शब्दाचे उच्चारण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन मोदींनी केल्यानंतर त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चक्क 'नीच किस्म का आदमी' अशी उपमा दिली. गल्लीतील नगरसेवकाने देखील आपल्या राजकीय विरोधकाला अपशब्द बोलू नये, अशी समाजाची अपेक्षा असताना, चक्क राष्ट्रीय स्तरातील राजकारणात ही भाषा वापरली जात आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
 
हे तेच मणिशंकर अय्यर आहेत, ज्यांनी पाकिस्तानी वाहिनीवर जाऊन "मोदी सरकार भारतातून जाईपर्यंत भारत व पाकिस्तानात शांतता नांदणार नाही " असे वक्तव्य केले होते. वास्तविक स्वत:च्या देशाच्या लोकनिर्वाचित पंतप्रधानाबद्दल परदेशात ते ही पाकिस्तानात जाऊन, द्वेषपूर्ण वक्तव्य करणे, म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यावरून देखील अय्यारांवर मोठया प्रमाणात टीका झाली होती, मात्र आपल्या मगरुरीतून बाहेर येतील ते अय्यर कसले. तसे मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरण्याची ही पहिली वेळ नाहीच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना त्यांनी 'चायवाला' म्हणून हिणवले होतेच. त्याचा परिणाम काय झाला? तर राष्ट्रीय राजकारणात असलेला काँग्रेस पक्ष एखाद्या प्रादेशिक पक्षाला शोभाव्या एवढ्याच जागा जिंकू शकला. साधा विरोधी पक्षनेता म्हणून देखील आज लोकसभेत पद मिळवण्यासाठी काँग्रेसला जंग-जंग पछाडावे लागत आहे.
 
महाराष्ट्रात आपल्या वक्तव्यामुळे आत्मक्लेश करणाऱ्या नेत्यांना एकदा मणिशंकर अय्यरांनी भेटले पाहिजे. अजित पवार आपल्या एका वक्तव्यामुळे मोठ्या अडचणीत आले होते. घसरलेल्या जीभेपायी किती नुकसान सहन करावे लागले, याचा कबुली जबाब त्यांनी एका सभेत दिला होताच. गेल्या महिन्याभरात भाजप नेते गिरीष महाजन हे देखील घसरलेल्या जीभेमुळे अडचणीत सापडले होते. "दारूला महिलांचे नाव द्या" असे एका सभेत ते बोलल्यामुळे दुसऱ्या दिवशी नाक रगडून माफी मागायची वेळ त्यांच्यावर आली होती. भाजप नेते साक्षी महाराज यांच्या घसरलेल्या जीभेमुळे स्वत: भाजपध्याक्षांना अनेक वेळेला जाब विचारला जातोच. राजकीय नेत्यांचे बेताल वक्तव्य हे सर्वसामान्य जनतेला कधीच रुचणारे नसते, याबाबत सोशल मिडिया, तसेच इतर ठिकाणी कटू प्रतिक्रिया उमटत असतात.
 
राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सतत सुरुच असतात, सत्ताधारी विरोधक यांच्यात वाद-विवाद होतच असतात, मात्र सार्वजनिक आयुष्यात कुणीही वैयक्तिक टीका करणे म्हणजे त्याचा स्तर घसरणे असेच मानले जाते. दिग्विजयसिंह, मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद असो अथवा स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी असोत हे ज्येष्ठ आणि जाणते काँग्रेसी नेते, जेव्हा आपला स्तर घसरून बोलतात, तेव्हा अकबरुद्दिन ओवैसी, वारीस पठाण, अबू आझमी यांच्या पंक्तीत किंवा कमाल आर खान याच्या सारख्या दुर्लक्षित अभिनेत्याच्या पंक्तीत त्यांना बसवावे लागते. त्याचे चांगले परिणाम तर होत नाहीच, उलटपक्षी नुकसानच जास्त होते. बहुदा हे ओळखूनच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचा मान राखण्याचा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता, मात्र अशाबाबतीत राहुलबाबांना सिरीयस घेतले जात नाही, याची प्रचिती अय्यर यांनी आज दिली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देखील मोदी यांच्याबद्दल गुजरात निवडणुकीत 'खून की दलाली', 'मौत का सौदागर' असे शब्द वापरून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला होता, त्याची नुकसान भरपाई काँग्रेस अद्यापही करत आहे, त्या पार्श्वभूमीवर अय्यर यांच्या या वक्तव्याचे गुजरातमध्ये काय परिणाम होतील हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
 
आपल्या देशात अनेक महान संत होऊन गेले आहेत. ज्यांनी जिभेवर ताबा ठेवण्याचे महत्व नमूद केले आहे. संत कबीर म्हणतात की "ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय । औरन को सीतल करे, आपहुं सीतल होय ।।" म्हणजे क्रोध, अहंकार, आणि आवेशात येऊन आपण कटू वाणीचा उच्चार केल्यास आपण स्वत:साठी पापाचा घडा भरत असतो, त्याऐवजी स्वत: सहित इतरांना मधुर वाटेल अशा शब्दांचा उपयोग केला पाहिजे, असे संत कबीर तीनशे वर्षांपूर्वी लिहून गेले आहेत.
 
- हर्षल कंसारा
 

हर्षल कंसारा

माहिती तंत्रज्ञानातून अभियांत्रिकी पदवीधर, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात कामाचा अनुभव, सॉफ्टवेअर बरोबरच लेखनात ही विशेष आवड, ब्लॉग लेखन, चालू घडामोडी, राजकारण, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाणाची आवड, मराठी बरोबरच गुजराती आणि इंग्रजी साहित्यात देखील रुची, रा.स्व. संघाचे स्वयंसेवक.

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121