१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या जाहीर भाषणात मोदीजींनी काश्मीरचा प्रश्न दोस्तीने सोडविण्याचे संकेत दिले होते. सर्वांनाच या घोषणेचे आश्चर्य वाटले होते. पण रोज वेगाने घडणाऱ्या घटना पाहता ; दोस्तीचा हात आता पुढे झाला आहे असे वाटते. आतापर्यंत ११ विविध मात्यापित्यानी व मायबहिणीनी अतिरेकी प्रवाहात वाहून गेलेल्या काश्मिरी तरुणांना दयेची आवाहने केली आहे.
माजिद खानच्या माता पित्यांच्या आवाहनाला तो प्रतिसाद देईल असे वाटत नव्हते. परंतु त्याच्या वडिलांच्या आजारपणाच्या संदेशामुळे तो गांगरून गेला होता. सुरक्षादलांच्या खबऱ्यांनी ही गोष्ट त्याच्या घरी कळवली. त्या नंतर त्या मातेने समाज माध्यमांवरून व प्रसार माध्यमांमार्फत माजिद खानला भावनिक साद घातली. बारामुल्लाचा मोहसीन मुश्ताक असेल अथवा सोपोरचा नसीर अहमद मीर असेल ; सर्वांचेच कुटुंबीय भावनात्मक आवाहन करिताना माध्यमांना व सुरक्षा दलांना त्यांच्या मुलांना परत बोलविण्यासाठी, त्यांच्यावर दया दाखविण्यासाठी आवाहन करीत आहेत.
शोपियाँचा आशिक हुसेनने मातापित्यांची दयेची याचना धुडकावून लावली व आपण सच्चे मुजाहिद्दीन झाल्याने परतीचा मार्ग बंद आल्याचे जाहीर केले आहे. या उत्तरामुळे प्रत्यार्पणाची लाट थांबविता येईल असे पाकिस्तान मधील दहशतवादी गटांना वाटले होते. परंतु फळबाग मालक तरुण मंझूर अहमद बाबाची आई झाव्हरा बानूने थेट दहशतवादी संघटनांनाच दयेची याचना केली आहे ; त्यामुळे काश्मीर मधील समाजमन ढवळून निघाले आहे.
पोलीस दलात नोकरी करणाऱ्या बिलाल अहमद यांचा १८ वर्षीय मुलगा आदिल बिलाल भट हा पुलवामा जवळील मलंगपूरा मधून गायब झाला. त्याचे दहशतवादी अवतारातील फोटो पाहिल्यानंतर कुटुंबाने परत येण्याच्या विनवण्या केल्या आहेत. एखाद्या कारवाईत तो सापळ्यात अडकल्यास लगेच माहिती देण्याची खात्री सुरक्षा दलांनी कुटुंबियांना दिली आहे. पण त्या वेळी अतिरेकी त्याला प्रत्यार्पण करू देतील का या बद्दल त्याच्या कुटुंबियांना धास्ती वाटते. कुलगाम जिल्ह्यातील अक़िब इक्बाल मलिक या युवकाचे मातापिता त्याला परत आणण्याच्या मदतीसाठी आर्त साद घालत असलेल्या व्हिडीओ फितीमुळे दहशतवादी कारवायांकडे वळणाऱ्या तरुणाची मानसिक ताकत कमी करीत आहेत. कुलगाम मधीलच १६ वर्षीय झहीद रशिद भट व १६ वर्षीय मुहम्मद फरहान हे तरुण दहशतवादाकडे वळल्यावर त्यांच्या कुटुंबियांकडून परतीसाठी जोरदार विनंती केली जात आहे. वाणीगुंद येथील गुलाम मुहम्मद या पित्याने अत्यंत कारुण्याने आपल्या मुलांच्या भावनेला साद घातली आहे. तुझ्याशिवाय आम्ही कोणीच जगू शकत नाही असे कथन करणारी फीत त्या कुटुंबाने फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण जगा पुढे ठेवली आहे. या फिती पाहिल्यावर कोणालाही दयेचा पाझर फुटू शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनेश्वर शर्मा यांच्या माध्यमातून सुरु केल्याला संवादाला यश येऊ शकते अशी काही घटकांना भिती वाटत असावी. सर्व घटकांशी संवादाची घोषणा करून त्यांनी भेटी गाठीना सुरुवातही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनेश्वर शर्मा यांच्या माध्यमातून सुरु केल्याला संवादाला यश येऊ शकते अशी काही घटकांना भिती वाटत असावी. सर्व घटकांशी संवादाची घोषणा करून त्यांनी भेटी गाठीना सुरुवातही केली. काही ठराविक गटांनी नेहमी प्रमाणे बहिष्कार घालण्याचे नाटक चालूच ठेवले आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनी मात्र ४००० हुन अधिक तरुणांवरील खटले काढून घेण्याची घोषणा करून, क्षमा करण्याचे पहिले पाऊल उचलले आहे. काश्मीर पंडितांची नाराजी पत्करून सुद्धा मोदीजींनी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.
सीमेवर एका गोळीला २ गोळ्यांनी उत्तर, एका हुतात्म्याला किमान दोन दहशयवाद्यांना कंठस्नान, जश्यास त्या पेक्षा जोरात प्रतिक्रिया यामुळे पाकिस्तानी यंत्रणा गांगरून गेल्या आहेत. अणुबॉम्बची भीती दाखवून भारताला सतत दबावाखाली ठेऊ पाहणाऱ्या सैन्याला आता पाकिस्तान मधूनच कडवा विरोध होत आहे. लाहोर मधील हल्ले, बलुचिस्तान मधील यादवी, अफगाणिस्तान मधून येणारे तालिबानी लोंढे, सौदी अरबमध्ये येणारी रोजची संकटे, अमेरिकेची सततची भीती, ऐन वेळी रशिया भारतासोबत जाण्याची शंका चबाहार बंदरमुळे इराणने केलेली कोंडी या सर्व बाजूने भारताला मिळणारे यश या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानी जनता मात्र त्रस्त झाली आहे. काश्मीर पलीकडेही आमचे प्रश्न आहेत आणि दुर्लक्ष्य केल्यास पाकिस्तानचे तुकडे पडू शकतात याची जाणीव पाक नेतृत्वाला होऊ लागली आहे.
विचलित काश्मिरी तरुण आता अधिकच बुचकळ्यात पडले आहेत. मातापित्यांची दयेची विनंती अतिरेकी गट स्वीकारू देत नाहीत. मोदींनी दिलेली क्षमेची हमी स्वीकारावी का नाही या संभ्रमात काश्मीरची जनता पडली आहे. कुलगाम मधीलच निसार अहमदला आता शांतता स्वीकारावीशी वाटल्याने; त्याने घरी येऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. जम्मू काश्मीर मधील अस्वस्थ नंदनवनात शांतीची चाहूल लागलेली आहे.
- मदन दिवाण