
जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद २०१८ सालच्या पाकिस्तानमधील सार्वजनिक निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना आता राजकीय पक्ष म्हणून पाकिस्तानात सक्रीय होणार आहे.
लाहोर उच्चन्यायालयाने हाफिज सईदवरील नजर कैद उठवल्यानंतर त्याने शनिवारी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार जमात-उद-दावाच्या या म्होरक्याने कुठल्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत स्पष्ट केलेले नाही. त्याचबरोबर एकूण किती जागा लढविल्या जातील हे देखील गुलदस्त्यात आहे.
युनायटेड नेशन्सच्या यादीत हाफिज सईद जागतिक दहशतवादी आहे. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर ही घोषणा केली गेली होती. पाकिस्तानमध्ये त्याच्यावर अद्याप ठोस कारवाई केली गेलेली नाही. त्याचबरोबर लाहोर उच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याची नजर कैद देखील उठवली आहे. त्यामुळे तेथे दहशतवादाला कायदेशीररित्या खतपाणी घातले जात असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर जागतिक दहशतवादीला राजकारणात प्रवेश दिल्यामुळे माकडाच्या हातात आयते कोलित दिल्यासारखे होईल,अशी देखील चर्चा सुरु आहे.