स्वभावाला औषध नाही – नेहमी वापरले जाणारे प्रसिद्ध वाक्य ! खरं म्हणजे औषध हे साधारणपणे आजार बरा करण्यासाठी असतं. म्हणजे स्वभाव हा काहींच्या बाबतीत आजार सदृश्य असतो की काय ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना !
प्रत्येकाचा आपला एक मूळ स्वभाव असतो. स्वभावातल्या काही गोष्टी अनुवांशिक असू शकतात. अभ्यासक जास्त सांगू शकतील. पण साधरणतः ज्या वातावरणात आपण वाढतो, जसा जसा अन्य माणसांशी आपला संबंध येतो, जसे अनुभव विश्व वाट्याला येते तसतसा आपला स्वभाव घडत जात असावा. ठराविक वयानंतर त्यात बदल होत नसावा.
‘ माझा स्वभाव आधी असा नव्हता, मी तो बदलला ‘ असे काही वेळा आपण ऐकतो पण त्यासाठी कारणही तितकेच समर्थ असले पाहिजे. स्वभावातला बदल ही एक आतून घडणारी प्रक्रिया आहे. अन्य कोणा व्यक्तीने, ती कितीही जवळची असली तरी, तसा प्रयत्न करून काही उपयोग होत नाही.
ठरवलेल्या साध्याच्या आड आपला स्वभाव येत आहे अशी स्वतःच्या मनाला खात्री पटली तर स्वभावात बदल घडू शकतो. उदा. अबोल स्वभावाच्या व्यक्तीला marketting चे काम अपरिहार्य म्हणून स्वीकारावे लागले तर त्याला निश्चितपणे अबोलपणा सोडावा लागेल. फारसे माणसात मिसळण्याची आवड नसलेल्या व्यक्तीने जर व्रत म्हणून कोणत्याही संघटनेमध्ये कार्य करण्याचे ठरवले आणि त्याच्याकडे संघटनात्मक जबाबदारी आली तर त्याला आजूबाजूला माणसे नकोत असे म्हणून चालेल कां? उलटपक्षी सर्व प्रकारच्या माणसांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आवश्यक बदल त्याला करावाच लागेल. असे बदल घडतात असा अनुभव आहे. कार्यकर्त्यांबरोबरच्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांचे स्वतःचे आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दलचे असे किस्से ऐकायला मिळतात.
दुसरे आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात हे कारण आपला स्वभाव बदलण्यासाठी पुरेसं असतं का? ‘ आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो. ‘‘आपला चांगुलपणा आपली कमजोरी असता कामा नये. ‘‘ जशास तसे वागले पाहिजे. ‘या आणि अशाच वाक्यांमध्ये अभिप्रेत असलेल्या सल्ल्याप्रमाणे वागायचे ठरवले तर सरड्यालाही आपण लाजवू!
खरंच आपलं चांगुलपणा आपली कमजोरी असते का ? थोड्या वेळासाठी गृहीत धरूया की, एकाने आपल्या या स्वभावाचा गैरफायदा घेतला आहे उदा. कॉलेजमध्ये काही कारणाने गैरहजर राहिल्याने आपल्याला तेंव्हाच्या notes हव्या आहेत पण आपल्या मैत्रिणीने अभ्यासाचे कारण सांगून त्या दिल्या नाहीत. काही दिवसांनी तिला notes ची गरज पडली. तर आपण नाकारू कां ? काय हरकत आहे नाकारायला ? पण तसे घडेलच असे नाही. ते आपल्या स्वभावाच्या विरुद्ध असेल तर असे वागल्याने आपल्याला मानसिक त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते. तिच्या गरजेला आपण उपयोगी पडलो नाही ही टोचणी आपल्याला अस्वस्थ करेल. म्हणजेच आपल्या मानसिक शांतीसाठी, आपण स्वभावाप्रमाणेच वागण्याचा निर्णय घेणे स्वाभाविक नाही कां? चांगुलपणा कमजोरी नाहीये. पण दुसरा आपल्याशी कसा वागतोय ते लक्षातच न येणं ही कमजोरी ठरू शकते.
सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला समोरचा कसा वागतोय हे नक्कीच लक्षात येतं. पण याचा अर्थ आपल्यालाही तसंच वागता आलं पाहिजे असा नाही. असं वागायचं ठरवलं तर आपली स्वाभाविकताच आपण गमावून बसू.
स्मिता तांबे अभिनित ‘ ७२ मैल – एक प्रवास ‘ या चित्रपटात मनाला खूप भावलेलं एक वाक्य आहे. ती आणि तिच्या बरोबरच्या लहान मुलांची वाट एक नाग अडवतो. ती त्याला हात जोडून प्रार्थना करते पण तो पुन्हा त्यांच्या वाटेत येतो. शेवटी एका ट्रक खाली तो सापडतो आणि त्यांची सुटका होते. तेंव्हा एक मुलगा तिला विचारतो की तू त्याला मारून कां नाही टाकलंस? तेंव्हा ती म्हणते, “दुष्टाव्याला संपवायला आपल्याकडे दहापट दुष्टावा असावा लागतो. तो नसेल तर त्याला देव्हाऱ्यात ठेवून पुजलेलंच बरं ! “
हे वाक्य फक्त ‘ दुष्टावा ‘ या एकाच वैशिष्ट्याला लागू नाहीये. या सारख्या अनेक अवांछित पण अनुभवायला लागणाऱ्या वैशिष्ट्यांसाठी हे अगदी खरं आहे.
स्वभाव बदलावा कां ? आणि कां बदलावा ? याचा निर्णय आपला असावा. आपल्या स्वभावातील बदल हा स्वयंप्रेरणेने असावा. दुसऱ्याच्या हातात त्याचा रिमोट कशाला द्यावा ?
- शुभांगी पुरोहित