अक्षय कुमारच्या 'रोबोट-२'ची चर्चा जशी थांबली तसं 'पॅडमन'च्या चर्चेने जोर धरला. 'पॅडमॅन'चं पोस्टर, ट्रेलर या सगळ्याच बाबतीत तो उजवा ठरत असतानाच आज या चित्रपटातील 'आज से 'तेरी' हे पहिलं गाणं सोशल मीडियावरून प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच लक्ष्मिकांत चौहान व गायत्री चौबे यांच्या लग्नाची पत्रिका सुरुवातीलाच आपल्याला दिसते व तिथून हे गाणं आपल्याला या दोघांमधील प्रेमाचे विविध रंग दाखवते.
अक्षय कुमार व राधिका आपटे यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आले आहे. लग्न झाल्यानंतर लक्ष्मिकांत आपल्या बायकोची म्हणजेच गायत्रीची कशी काळजी घेतो, तिला कामात कशा पद्धतीने मदत करतो व यातूनच त्यांचे प्रेम कसे फुलत जाते हे या गाण्यातून आपल्याला दिसून येईल. विशेष म्हणजे अक्षय कुमारच्या आईच्या भूमिकेत जेष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती सुभाष आपल्याला या गाण्यात सुरुवातीलाच दिसतात.
कौसर मुनीर याने हे गाणं लिहिलयं. अर्जित सिंगच्या आवाजात 'आज से 'तेरी' हे गाणं ऐकायला खूप छान वाटत त्याचप्रमाणे अमित त्रिवेदीने यासाठी दिलेलं संगीतही मस्त झालाय.