डाव्यांची अस्वस्थता वाढविणारा सरसंघचालकांचा त्रिपुरा प्रवास

    14-Dec-2017   
Total Views |

रा. स्व.संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचा त्रिपुरात तीन दिवसांचा प्रवास होऊ घातलाय. राज्यात २०१८ च्या सुरुवातीला होणार्‍या विधानसभा निवडणुकांमुळे राजकारणाचा पारा तापत चालला असताना सरसंघचालक त्रिपुरामध्ये दाखल होणार आहेत. १७ डिसेंबरला त्रिपुरातल्या अस्तवाल मैदानात त्यांची प्रकट सभाही होणार असल्यामुळे सत्ताधारी डाव्या आघाडीचे नेते चांगलेच हडबडले आहेत.
 
 
ईशान्य भारतातील संघकार्याचा आढावा घेण्यासाठी १६ ते १८ डिसेंबर या काळात त्रिपुरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सरसंघचालक मार्गदर्शन करणार आहेत. ईशान्य भारतातील कामाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चिंतन होणार आहे. यानिमित्ताने चार वर्षांनी त्रिपुरामध्ये सरसंघचालकांचा प्रवास होणार आहे. यापूर्वी २०१३ मध्ये सरसंघचालक राज्यात आले होते.
 
सरसंघचालकपदाची जबाबदारी आल्यानंतर देशभर झालेल्या पहिल्या प्रवासादरम्यान २००७ मध्ये मोहनराव भागवत त्रिपुरात आले होते. यंदाच्या भेटीत सरसंघचालक प्रकट सभेच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधणार असल्यामुळे आम जनतेतही कमालीची उत्सुकता आहे. संघाचे कार्य देशभरात रुजवण्यासाठी संघ कार्यकर्त्यांनी घाम गाळला, वेळप्रसंगी रक्तही सांडले. त्रिपुराही याला अपवाद नाही. १९९९ मध्ये नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) च्या दहशतवाद्यांनी प. बंगाल आणि ईशान्य भारताचे क्षेत्रप्रचारक श्यामलकांती सेनगुप्ता, दक्षिण आसामचे प्रचारक दिनेंद्रनाथ डे, आगरताळ्याचे विभाग प्रचारक सुधामय दत्ता आणि जिल्हा प्रचारक शुभंकर चक्रवर्ती या चार संघ प्रचारकांचे अपहरण केले होते. २००० मध्ये त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे दहशतवाद्यांनी प्रसारमाध्यमांकडे जाहीर केली. त्रिपुराशी संबंधित ही जखम जुनी असली तरी देशातील अनेक जुन्या-जाणत्या स्वयंसेवकांच्या मनात हा घटनाक्रमअद्याप ताजा आहे. त्रिपुरातल्या स्वयंसेवकांच्या मनात ही जखम अजून ठसठसते आहे. चार प्रचारकांची हत्या हा संघाला मोठा धक्का होता. त्रिपुरातले संघकार्य या घटनेमुळे पार कोलमडले. अश्रू ढाळत न बसता कार्यकर्ते नव्या उमेदीने कामाला लागले खरे, परंतु कामाचा डोलारा पुन्हा उभा करण्यासाठी एका तपाचा काळ लोटावा लागला. ज्यावर्षी एनएलएफटीने संघ प्रचारकांची हत्या केली, त्याच वर्षी धर्मजागरणाचे कार्य करणाऱ्या शांतीकाली महाराजांची हत्या करण्यात आली होती, हा दुर्दैवी योगायोग. ही हत्या देखील एनएलएफटीच्या दहशतवाद्यांनीच केली होती. त्रिपुरातल्या जनजातींमध्ये शांतीकाली महाराज हे शिवभक्त संत अत्यंत लोकप्रिय होते. धर्म जागरणापुरते मर्यादित न राहाता त्यांनी त्रिपुरातल्या गरीब जनजातींसाठी अनेक सामाजिक उपक्रमही हाती घेतले होते. त्यांचे कार्य चर्चच्या धर्मांतराच्या मोहिमेत मोठा अडथळा बनले होते. एनएलएफटीच्या मदतीने हा अडथळा मोठ्या शिताफीने दूर करण्यात आला. दहशतवादी केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर महाराजांच्या हत्येनंतर त्यांचा वारसा कोणी पुढे नेऊ नये म्हणून त्यांच्या प्रमुख १२ अनुयायांना वेचून वेचून ठार करण्यात आले. धर्मजागरणाचे कार्य त्रिपुरातून समूळ नष्ट करण्याचे हे कारस्थान होते. त्यावेळीही त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांची सत्ता होती आणि माणिक सरकार हेच मुख्यमंत्रिपदी होते. शांतीकाली महाराजांना दहशतवाद्यांकडून आपली हत्या होणार याचे संकेत मिळाले होते, असे त्यांचे शिष्य सांगतात पण मृत्यूचे भय त्यांना रोखू शकले नाही. दहशतीला भीक न घालता त्यांनी आपले कार्य जारी ठेवले.
 
दहशतीच्या हत्याराने ना संघ थांबला ना शांतीकाली महाराजांचे अनुयायी. बंदुकीचे भय झुगारून धर्म जागरणाचे आणि समाज जागरणाचे काम सुरूच राहिले. शांतीकाली मिशन आणि संघ कार्यात, त्रिपुराच्या भूमीवर सांडलेल्या रक्ताचा असा हा समान धागा असल्यामुळेच की काय, सरसंघचालकांच्या सभेत शांतीकाली महाराजांचे शिष्य चित्त महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
त्रिपुरात आजमितीला सुमारे शंभर दैनंदिन शाखा आणि साधारण ८० साप्ताहिक मिलन, एकत्रिकरण असा पसारा आहे. वनवासी कल्याण आश्रम, भारतीय किसान संघ, अभाविप आदी परिवारातील संघटनांचेही काम आहे. जेमतेम ३८ लाखांच्या राज्यात डाव्यांच्या लाल दहशतीच्या सावटाखाली कार्यकर्ते समर्थपणे काम करतायत.
 
संपूर्ण ईशान्य भारताची भूमी सुरुवातीपासून संघकार्यासाठी एक मोठे आव्हानच होती. विविध दहशतवादी संघटनांच्या कारवाया, घाऊक धर्मांतराच्या माध्यमातून चर्चने पसरलेले हातपाय, बांगलादेशी मुस्लीमघुसखोरांमुळे निर्माण झालेला लोकसंख्येचा असमतोल, तस्कराचे जाळे अशा अनेक विघातक घटकांमुळे इथली जमीन राष्ट्रवादी कार्यासाठी निसरडी बनली होती, परंतु अशा परिस्थितीतही संघाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी चिवटपणे उभे राहिले. त्रिपुराही त्याला अपवाद नाही. संघकामाची मर्यादित उपस्थिती असलेल्या या राज्यात अस्तवालच्या मैदानात सरसंघचालकांची प्रकट सभा आयोजित करणे, ही काही सोपी बाब नाही, कारण हे त्रिपुरातील सर्वात मोठे मैदान आहे. राज्यातील सर्व पक्षांचे भव्य मेळावे याच मैदानात आयोजित केले जातात. अलीकडेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचे आयोजन या मैदानात करण्यात आले होते. संघाच्या कार्यकर्त्यांना याची जाणीव असल्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी कंबर कसली आहे. शांतीकाली मिशनचे अनुयायीदेखील सभेच्या यशासाठी प्रयत्न करीत आहेत. शांतीकाली मिशनचे देबबर्मा, त्रिपुरा, जमातीया आदी जनजातींमध्ये मोठे काम आहे. संघ परिवारातील अन्य संघटनांसह मिशनचे राज्यातील १४ आश्रमसभेसाठी अत्यंत सक्रिय झाले आहेत. सरसंघचालकांच्या प्रवासादरम्यान १८ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे. डाव्या विचारवंतांच्या मते गुजरात ही हिंदुत्वाची आद्य प्रयोगशाळा आहे. एकदा का गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला की, देशभरात भाजपचा निर्णायक पराभव करता येईल, असे सूत्र ही मंडळी वारंवार मांडत असतात. (अर्थातच यात निखळ राजकीय विश्लेषणाचा भाग कमी आणि आवडत्या अनुमानावर स्वार होण्याची हौस जास्त असा प्रकार आहे.) त्यामुळे इथल्या प्रत्येक घडामोडीवर डाव्यांचे बारीक लक्ष असते. गुजरातमधील दर निवडणुकीआधी हे सूत्र नव्याने उगाळण्यात येते. गेले काही दिवस गुजरातमध्ये भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा निकराचा सामना सुरू होता. त्याचा निकाल ज्या दिवशी येणार त्या दिवशी सरसंघचालक त्रिपुरामध्ये आहेत. प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे. या दौर्‍यामुळे त्रिपुरातील राष्ट्रवादी शक्तींमध्येही जबरदस्त उत्साह निर्माण झालाय आणि डावे कमालीचे अस्वस्थ आहेत.
 
- दिनेश कानजी 

दिनेश कानजी

गेली १७ वर्षे पत्रकारितेचा व्यापक अनुभव, महाराष्ट्र भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘मनोगत’मधून कारकिर्दीची सुरुवात. त्यानंतर दै. ‘सामना’, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, दै. ‘पुढारी’मध्ये कामाचा दांडगा अनुभव. नोकरीचा राजीनामा देऊन सध्या स्वतंत्रपणे लिखाण. पत्रकारिता करताना सिनेमा, महापालिका, गुन्हेगारी, राजकारण अशा विविध बीटचे काम. ‘शोध पत्रकारिता’ हा त्यांचा पिंड. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार’ या पुस्तकातून त्रिपुरातील कम्युनिस्ट सरकारच्या कारभाराची पोलखोल.