कडबनवाडीचा भगीरथ

    11-Dec-2017   
Total Views |

 
 
आपल्या देशात अनेक शतकं एकाचवेळी नांदतात असे म्हटले जाते. काही ठिकाणी पाण्याचे प्रमाण हे मुबलक असते तर काही ठिकाणी दुष्काळ आणि अवर्षण असते. काही ठिकाणी पाऊस भरपूर पडल्याने ओला दुष्काळ असतो तर काही ठिकाणी पाऊसच नसल्याने कोरडा दुष्काळ असतो. पुराणात भगीरथ नावाचा राजा होता. या भगीरथाच्या पूर्वजांना कपिल ऋषींनी शाप दिला होता. जोपर्यंत गंगेच्या पाण्याचा स्पर्श होत नाही तोपर्यंत पूर्वजांचा उद्धार होणार नव्हता. भगीरथाने गंगेला प्रसन्न करत तिला पृथ्वीवर आणले. तिच्या प्रवाहाने पृथ्वी खचू नये म्हणून शंकराच्या मस्तकी धारण करण्यास शंकरालाही भगीरथाने प्रसन्न करून घेतले पण गंगा शंकराच्या जटांत अडकली, मग शेवटी शंकराने जटेचा केस तोडून गंगेला वाट करून दिली आणि अखेर गंगा पृथ्वीवर प्रकटली. शेवटी भगीरथाचे पूर्वज शापातून मुक्त झाले. याच भगीरथाने उत्तरवाहिनी गंगेला दक्षिणवाहीनी गंगा बनवून उत्तर भारताचे दुष्काळाचे संकट दूर केले. असाच एक कडबनवाडीचा भगीरथ म्हणजे भजनदास पवार.
 
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावाचे क्षेत्रफळ दीड हजार हेक्टर. या वाडीची लोकसंख्या एकूण १६००. इथे पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य. इथे वर्षाला ४०० मि.मी पाऊस पडतो. पश्चिम महाराष्ट्रातील गाव असून सरकार दरबारी गावाची नोंद दुष्काळी पट्टा म्हणून. लोक फक्त गरजेपूरते धान्य पिकवायचे आणि पशूपालन करून घर चालवत होते. गावकरी हा शेतीचा आतबट्याचा व्यवहार सोडून शहरात स्थलांतर होत होते. भजनदास पवार हे गावातले पहिले पदवीधर. त्यांनी विज्ञान शाखेत पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. २८ वर्षे त्यांनी सरस्वती विद्यालयात शिक्षक म्हणून ज्ञानादानाचे कार्य केले. पवार अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धी या आदर्श गावातील कार्याने भारावले. राळेगण सिद्धीत त्यांनी अण्णांची भेट घेतली आणि अण्णांनी त्यांना पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. १९९४ साली महाराष्ट्र शासनाच्या पाणी व्यवस्थापनाच्या शिबिरात राळेगण सिद्धीतच त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. गावात येऊन त्यांनी यासाठी प्रयत्न केले पण गावकर्‍यांनी त्यांना सहकार्य केले नाही. त्यांचे अज्ञान पाहून पवारांनी त्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले आणि पाण्यासाठी लोकचळवळ उभारली. पाणी व्यवस्थापानाच्या आव्हानासह जमिनीची होणारी धूप हेही एक आव्हान होते. मग शेतात २ ते ३ मीटर खड्डा खणून शेततळी बांधण्यात आली. पाणी अडवण्यासाठी भिंती बांधल्या गेल्या आणि लायनिंग पेपर टाकले गेले. अशा पद्धतीने आज वाडीत १०० शेततळी आहेत. ३ पाझर तलाव, २७ सिमेंट नाले आणि मातीने बांधलेल्या पाण्याच्या बंधार्‍यांची संख्या ११० आहे. कोणे एके काळी या वाडीत उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा होत होता. तिथे आता डाळींबाच्या बागा फुलल्या आहेत. ही डाळींब मुंबई, पुणे, हैदराबाद सारख्या शहरात विकली जातात, तर काही इतर देशात निर्यातसुद्धा केली जातात. १०० एकरावर ऊसाची लागवड केली जाते, तर १०० एकरावर पालेभाज्यांची लागवड केली जाते. पूर्वी पवार यांना शिक्षण घेता आले, आता गावात शिक्षक, डॉक्टर आणि अभियंते झाले आहेत.
 
खरा भारत हा गावात वसतो तसेच खेड्याकडे चला हा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. स्वयंपूर्ण खेडी हे त्यांचे स्वप्न होते. अण्णा हजारे या गांधीवादी नेत्याने हे स्वप्न सत्यात उतरवले. तसेच स्वप्न भजनदास पवारांनी साकार केले. ’भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवा तुम्हारे भरोसे बैठा हो,’ असे म्हणत पवारांनी हे भगीरथ प्रयत्न करून कडबनवाडी सुजलाम सुफलाम केले. वसुंधरेशी इमान राखत पवारांनी ५०० हेक्टर जमिनीवर वनक्षेत्र वसवले आहे. या वनात जैवविविधता त्यांनी राखली आहे. तसेच इथे हरिण आणि चिंकारासारखे प्राणी राहतात. पुराणातल्या भगीरथाने गंगेला प्रसन्न करून पृथ्वीवर आणून आपल्या पूर्वजांना शापातून मुक्त केले आणि या आधुनिक रुपी भगीरथ भजनदास पवार यांनी भगीरथ प्रयत्न करून आपल्या गावकर्‍यांना दुष्काळाच्या शापातून मुक्त केले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
 
- तुषार ओव्हाळ

तुषार ओव्हाळ

मास मीडियामध्ये पदवी. मराठी वृत्तवाहिनीसाठी ३ वर्षे राजकीय आणि इतर संशोधन. राज्यशास्त्र विषयात रूची. वाचनाची आवड. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादकपदी कार्यरत.