औचित्याची ऐशीतैशी.......

Total Views |



आपल्या घरी कोणत्याही कारणासाठी आलेल्या व्यक्तींसमोर टीव्ही सुरु करायची मला खूपच धास्ती वाटते. तशीच धास्ती मी कोणाकडे गेले असेन तर टीव्ही वरचा सुरु असलेला कार्यक्रम पाहण्याची वाटते. टीव्ही वरच्या विविध कार्यक्रमांमध्ये, अगदी बातम्या देणाऱ्या विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमांमध्येही, तुम्हाला चारचौघांत असतांना awkward करण्याची प्रचंड ताकद असते. अशा वेळी टीव्ही बंद करावा कि आत उठून जावं अशा संभ्रमात यजमान, तर सर्वांबरोबर निगरगट्ट मनाने जे काही समोर चाललंय ते पाहत बसावं कि त्याच्याकडे दुर्लक्ष करून काहीतरी बोलायला सुरुवात करावी अशा विचित्र परिस्थितीत आपण, सापडलेले असतो. अशा वेळी कोणालातरी रिमोटची आठवण होते आणि आपली सुटका होते त्या विचित्र परिस्थितीतून. टीव्हीवर काय दाखवलं जावं हे आपल्या हातात नाही पण कोणासमोर काय पहावं आणि काय पाहू नये या औचित्याचं भान आपल्याला असणं आणि त्यावेळी योग्य ती कृती करणं हे तर आपल्या हातात नक्कीच असतं.

एखाद्याच्या घरात खूप दिवसांनी बहुप्रतिक्षित अशी चांगली घटना घडली तर ती सर्व परिचितांना, नातेवाईकांना एकदमच कळवावी असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्यासाठी जिथे सर्व एकत्र भेटतील तिथे आवर्जून जाऊन सर्वांना ती सांगावी हे सुद्धा स्वाभाविक आहे. पण हे सर्व एकत्र भेटण्याचे ठिकाण जर ओंकारेश्वराचे किंवा तत्सम अंत्यविधीचे स्थान असेल तर! झालीच कि औचित्याची ऐशीतैशी!

आपल्या आनंदाच्या उधाणात आपण कोणत्या प्रसंगात काय बोलत आहोत याचं भान विसरावं का?

ऐकणाऱ्याची मनःस्थिती तुमच्या आनंदात सहभागी होण्याची असेल का? किमान याचा तरी विचार केलाच पाहिजे ना?

रुग्णालयात दाखल केलेल्या, परिचित किंवा लांबच्या नात्यात असलेल्या रुग्णाला, भेटायला जायला जमले नाही तर ते एकवेळ समजण्यासारखे आहे. रुग्णालयाच्या जवळच्या मंगल कार्यालयात लग्नाला आलोच आहोत तर जाता-जाता भेटून जाऊया हा विचार सुद्धा सोय म्हणून संयुक्तिक आहे. पण म्हणून लग्नासाठी घातलेल्या विशेष वस्त्रप्रावरणासह, सालंकृत आणि चेहऱ्यावरच्या रंगरंगोटीसह जाणं टाळता नाही का येणार? याचा सारासार विचारसुद्धा केला जात नसेल तर त्याला काय म्हणायचं? दुर्दैवाने, आपली सोय इतकी महत्त्वाची वाटते की, त्या रुग्णाच्या मनःस्थितीचा विचार मनात येतच नाही. असे करण्यापेक्षा भेटायला न गेलेले अधिक योग्य ठरेल. बऱ्याच वेळा जनरीत म्हणून जर असे भेटायला जाणे असेल तर त्यात आत्मीयता कमी आणि उपचार जास्त असतो. त्यामुळे उचित – अनुचित असा विचारच केला जात नसावा.

औचित्यभंग अशाच प्रसंगांमध्ये होतो असे अजिबातच नाही. एका विवाह सोहळ्यात नुकत्याच गाणं शिकू लागलेल्या हौशी कलाकाराला गाण्याचा खूप आग्रह झाला. जे गाणं त्याचं तयार होतं तेच त्याने गायलं. आधी कोणाला तरी विचारावं हे ना त्याला सुचलं ना आग्रह करण्याला व्यक्तीला. छान गायलेल्या गाण्याला काय प्रतिक्रिया द्यावी अशा संभ्रमात सर्व पडले नसते तरच नवल! विवाह सोहळ्यात गायलेल्या, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी “ या गाण्याला छान असं तरी कसं म्हणणार?

अशाच एका विवाह सोहळ्यात, विवाह संपन्न झाल्यावर एका विदुषीने “विवाह सोहळ्यातील विधींचा आजच्या कालानुरूप अर्थ या एरवी उत्तम असलेल्या विषयावर, दहा पंधरा मिनिटे भाषण केले. भाषणातील मुद्दे उत्तम असूनही ना कोणी ते ऐकण्याच्या मनःस्थितीत होते ना तशी योग्य ती योजना सभागृहात करण्यात आली होती. भाषण झाल्यावर, छान बोललात असं म्हणणं म्हणजे औचित्यभंगच पुन्हा. कारण खरं काय घडलंय ते दोघांनाही माहिती!

असे बरेच प्रसंग आपल्या सभोवताली कधी ना कधी घडत असतात. उच्चपदावर पोहोचलेली एखादी व्यक्ती आपल्या खूप परिचयाची असेल किंवा त्या व्यक्तीच्या लहानपणापासून तुम्ही तिला पाहत आले असाल तरी सार्वजनिक ठिकाणी भेटल्यावर एकेरी संबोधन वापरून, त्याच्याशी / तिच्याशी बोलणे कितपत संयुक्तिक ठरेल? त्या व्यक्तीबद्दल अपरोक्ष बोलताना सुद्धा ते टाळणेच उचित असते.

मोबाईलवर तर हल्ली कोणत्याही वेळी, कोणत्याही विषयावर, कुठेही संभाषण करता येते. अशा वेळी स्थान, वेळ – काळ, आपण बोलत असलेला विषय, आपल्या आवाजाची तीव्रता, आपल्या आसपासच्या लोकांच्या स्पेस वर होणारे अतिक्रमण याचा विचार अत्यावश्यक आहे. रस्त्यावर, चित्रपटगृहात, सार्वजनिक वाहनात, इतकेच काय तर दवाखान्याच्या आणि रुग्णालयाच्या वेटिंग रूममध्ये सुद्धा असे अनुभव येतात.

औचित्य भंग कोणी हेतुपुरस्सर नाही करत. पण त्यामुळे होणाऱ्या परिणामांना, इच्छा असो व नसो, सामोरी जावच लागतं. सतत प्रकाश झोतात असणाऱ्या ( public figure ) व्यक्तींचे हे औचित्याचे भान सुटले की, माध्यमातून उठणारी टीकेची झोड आपण नेहमीच अनुभवतो. मग सुरु होते सारवासारव, माफीनामा, स्पष्टीकरणे ज्याचा काहीच उपयोग नसतो. त्या व्यक्तीची झालेली प्रतिमा - हानी कधीच न भरून येणारी असते.

माणसाने विचार करून बोलावं, बोलून विचारात पडू नये - हा सुविचार कितीतरी वेळेला वाचलेला आहे. त्याचे अनुकरण केले तर कितीतरी औचित्यभंग टाळले जाऊ शकतात. कोणत्याही कृतीच्या अगोदर त्या कृतीच्या परिणामाची कल्पना करायला हवी. एक प्रकारची रंगीत तालीमच! आपली एकच बाजू लक्षात ना घेता, समोरच्याच्या भूमिकेत स्वतःला ठेऊन विचार करायला हवा. योग्य – अयोग्यचा कौल मनाला मागितला तर नंतर खेद व्यक्त करण्याची वेळ कधी येणारच नाही. मनाला आपल्या कर्मांचा आरसा म्हणतात आणि तो तर प्रत्येकाजवळ असतो. गरज आहे त्यात डोकावून बघण्याची आणि त्याच्यावर धूळ बसू ना देण्याची.

शुभांगी पुरोहित

शुभांगी पुरोहित

M. Sc. B. Ed., शाळेसाठी पथनाट्य लेखन, कविता स्पर्धांमध्ये सहभाग. ललित लेखन. माणसांच्या भावभावनांशी निगडित विषय लिहायला आवडतात. रत्नागिरीत आयोजित ' राम का गुणगान करिये ' ह्या रामाबद्दलच्या विविध गीतांवर आधारित २ तासांच्या कार्यक्रमाच्या संपूर्ण निवेदनाचे लेखन आणि सादरीकरण केलेले आहे.