सरप्राईज एलिमेंट

Total Views |


I don’t like surprises असं वाक्य मी नुकतच कुठेतरी ऐकलं. कुठल्यातरी चित्रपटात किंवा दूरदर्शन मालिकेत असावं. असो, तर मुद्दा हा की, मला जरा धक्काच बसला ते ऐकून. ‘ मला हापूस आंबा आवडतं नाही ‘ असं ऐकून बसावा तसाच! तो पर्यंत मला वाटायचं की, surprises सर्वांनाच आवडत असतील. मला खूप आवडतात surprises. काही वेळा मला ती मिळतात तर काही वेळा मी स्वतःच surprise व्हायचं plan करते. काही वेळा ते plan यशस्वी होतात तर काही वेळा फसतात. अशा plans पैकी माझा लाडका plan, movies चा असतो. एखादा movie बघायच्या आधी त्याचे reviews किंवा likes अजिबात न पाहता तो बघायचा. काही वेळा तर त्याची star cast सुद्धा माहिती नसताना मी movies पहाते. असा एखादा, नामवंत परिक्षकांनी नाकारलेला सिनेमा आवडून पण जातो. पूर्वग्रह न ठेवल्याचा परिणाम असेल कदाचित!

 


माझ्या लहानपणी आई बाबांबरोबर महिन्यातला पहिला रविवार hoteling साठी ठरलेला असायचा. असेच एकदा काहीही माहिती नसताना, पोस्टरवर ओमप्रकाश हा विनोदी नट बघून, ‘ बुढ्ढा मिल गया ‘ हा सिनेमा पाहिलेला आठवतोय. आता बाकी काही आठवत नसलं तरी त्यात घडलेले खून आणि प्रत्येक खुनानंतर ओमप्रकाश वर चित्रित ‘ आयो कहांसे घनश्याम ' हे गाणं मात्र अजूनही आठवतंय!

 

सिनेमासाठीच surprise element तेंव्हापासून आजतागायत जोडले गेले आहे. बहुचर्चित बाहुबली – २ ने मला काही surprises दिली. एक म्हणजे, आपल्या भावाला आपली प्रेयसी आवडली आहे हे कळूनही त्याच्यासाठी स्वतःच्या प्रेमाची कुर्बानी वगैरे देण्याचा महान विचार नायकाने चक्क केला नाही, दुसरे म्हणजे स्वतःला ज्याने लाथ मारली त्याला, “ ये पैर मुझे देदे कुमार वर्मा “ असे न म्हणता, त्यात त्याला त्याचे सामर्थ्य दिसले आणि त्याला त्याने ती जाणीवही करून दिली. आजपर्यंतच्या गल्लाभरू चित्रपटांच्या परंपरांना त्याने कलंकच लावला की !

 

दुसरे एक surprise रोज मला मिळते, ते माझ्या नव्या मोबाईलमुळे. त्यात voice command नावाचे एक फीचर आहे. गाणी लावायची असतील तर play some music असं त्याला सांगायचं. गाण्याचे बोल सांगितले नाही तर तो स्वतःच गाणं निवडून लावतो. play some हिंदी music असं म्हटलं तर हिंदी गाणं लागतं. त्यामुळे mobile ने प्रत्येक वेळेस निवडलेलं गाणं हे एक surprise असतं माझ्यासाठी. त्यात ‘छुपालो युं दिल में प्यार मेरा' या हेमंतकुमारच्या गाण्यापासून ‘हुक्का बार‘ पर्यंतची अफाट विविधता असते. त्यामुळे nostalgic पासून hysteric पर्यंतच्या भाव भावनांची विविधता पण मिळते!

 

काही लोकं दुसऱ्यांसाठी surprises plan करण्यात खूप तरबेज असतात. दुसऱ्यांना कळू न देता कार्यक्रम ठरवतात, उत्सवमूर्तीला वगळून बाकी सर्वांना कळवतात, छान योजना करतात आणि यशस्वीरित्या त्या राबवतात पण! अशी माणसं छान अभिनय करू शकतात. समोर वावरायचं पण त्या व्यक्तीला कशाचाच सुगावा लागू द्यायचा नाही हे सोपं काम नाहीये! काही जणांना मात्र हे दुसऱ्याला surprise करणं अजिबात जमत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरूनच समजत की, ते काहीतरी लपवत आहेत. अशांनासुद्धा मग plan करणारे लांबच ठेवतात सर्व योजनांपासून. फितुरी होण्याचा धोका कोण पत्करणार ?

 

surprise होण्यासाठी मोठ्या मोठ्या घटनाच लागतात असं काही नाही. एखाद्या झाडाची कौतुकाने लावलेली फांदी रुजली नाहीये असं समजून तिला विसरून जावं आणि कालांतराने ती, नवीन कोवळी तांबूस पालवी लेऊन भेटावी हे सुद्धा पुरेसं असतं. मला वाटतं अनपेक्षितपणा ही जन्मदात्री आहे surprises ची. अपेक्षेपोटी अपेक्षाभंगाचं दुःख असत असं म्हणतात, तर अनपेक्षितते पोटी आश्चर्य जन्मते!

 

अनपेक्षित पणाचा विषय निघाला की, राजकारण आठवते. हिंदीत ‘चोली – दामन का साथ ‘ म्हणतात ना तसच नातं आहे या दोन्हीच एकमेकांशी. त्यामुळेच ब्रेकिंग न्यूज ची surprises असतात विविध वाहिन्यांवर. ही मात्र सगळ्यांनाच आनंद देतील असं नाही. कोणाच्या फायद्याची आणि कोणाच्या तोट्याची यावर अवलंबून आहे हे! उदा. ८ नोव्हेंबर २०१६. अधिक काही सांगणे नलगे!



राजकारणाला surprises चा राजा म्हणता येईल तर नियतीला राणी म्हणावं लागेल! नियतीच्या surprises बद्दल काय बोलावं? ती वांछनियच असतील असं नाही ना म्हणता येत. अप्रियच वाटेल कोणालाही त्याबद्दल बोलणं! बऱ्याचदा तडाखेचं असतात ते नियतीचे!

 

लहान बाळांना surprise होताना पाहणं फारच मनोहर असतं. तोंडावर रुमाल झाकून समोर गेलं आणि त्या बाळाने तो रुमाल खेचला की, रूमाला मागचा परिचित चेहरा दिसल्यावर त्याचे ते विस्फारलेले करवंदासारखे टपोरे डोळे, त्यातले ते आश्चर्याचे भाव आणि मग तोंडाचे बोळके पसरून खदखदून हसणे! आश्चर्य भावनेचे इतके निखळ निरागस रूप दुसरे कोणतेच नसेल.

 

देवाला प्रार्थना करावीशी वाटते की, माझे आयुष्य निरागस surprises ने संपन्न कर! छोट्या छोट्या क्षणांनी मला आश्चर्यचकित करावं, मलाही असं निरागस हसता यावं.


ह्या व्यवहारी, वास्तववादी आणि तुमची इच्छा असो वा नसो तुमच्यावर प्रौढत्व लादणाऱ्या, निष्ठुर जगात, स्वतःमधले शैशव जपण्याची ही एकच तर संधी आहे.

 

- शुभांगी पुरोहित

 

शुभांगी पुरोहित

M. Sc. B. Ed., शाळेसाठी पथनाट्य लेखन, कविता स्पर्धांमध्ये सहभाग. ललित लेखन. माणसांच्या भावभावनांशी निगडित विषय लिहायला आवडतात. रत्नागिरीत आयोजित ' राम का गुणगान करिये ' ह्या रामाबद्दलच्या विविध गीतांवर आधारित २ तासांच्या कार्यक्रमाच्या संपूर्ण निवेदनाचे लेखन आणि सादरीकरण केलेले आहे.