भारतातील प्रसारमाध्यमे आणि विद्यापीठीय विचारवंतांचा विरोध असतानाही हिंदुत्ववादी सत्तेवर आले. या प्रक्रियेतूनच नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. याचा उपयोग करून प्रसारमाध्यमांनी लोकांना चिथवण्याचा, त्यांच्या भावना भडकविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, लोकांनी त्रास होऊनही आपला संयम सोडला नाही. याचे कारण लोकांचा मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास. नोटाबंदीनंतरही केंद्रात आणि महाराष्ट्रात हे यश मिळत आहे. त्याचे कारण या नेत्यांवर लोकांच्या असलेल्या विश्वासात आहे.
या वर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक ज्या सिद्धांताला मिळाले, तशाच प्रकारचे मानसशास्त्रीय संशोधन लोक कशाच्या आधारावर मतदान करतात यावरही करणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सोशल मीडियावर जे अनेक संदेश फिरू लागले आहेत, त्यातील एका संदेशात गुजरातमधील एका व्यापार्याशी झालेली चर्चा नमूद केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटी याचा मोठा फटका गुजरातमध्ये व्यापारी वर्गाला बसला. त्यामुळे हा वर्ग मोदींच्या आणि भाजपच्या विरोधात मतदान करेल काय ? असा प्रश्र्न विचारला असता ते व्यापारी म्हणाले की, ’’या दोन्हींमुळे आम्हाला त्रास झालेला आहे, हे खरे असले तरी मोदींच्या नेतृत्वावरील आमचा विश्वास ढळलेला नाही.’’ बहुतेकवेळा रम्य भविष्याची स्वप्ने दाखवून राज्यकर्ते सत्तेवर येतात आणि त्यांना आपल्या कार्यकाळात ती स्वप्ने वास्तवात आणता येत नाहीत. काही राज्यकर्त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते. परंतु, काही राज्यकर्त्यांना ती भोगावी लागत नाही. याचे मानसशास्त्रीय कारण काय ? याचा विचार करावा लागेल. भविष्यातील सुंदर स्वप्ने साकार झाली पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटले तरी ती साकार होणे सोपे नाही, याची लोकांना त्यांच्या अंतर्मनात जाणीव असते. नेतृत्व करणारा ती स्वप्ने साकार करण्यासाठी किती यशस्वी किंवा अयशस्वी होतो, यापेक्षा त्याच्यावर विश्वास टाकता येईल की नाही, हा मतदान करताना कळीचा मुद्दा बनतो.
कोणतीही गोष्ट खरेदी करताना लोक आपल्या मेहनतीचा पैसा विचारपूर्वक खर्च करतात, हे गृहीत चुकीचे आहे, असा सिद्धांत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ रिचर्ड थॅलर यांनी मांडला. राजकारणातील पैसा, गुंडगिरी, प्रचार, वक्तृत्व, लोकांना दिलेली आश्वासने, जात या आधारावर निवडणुका जिंकल्या जातात, असे मानले जाते. परंतु, प्रत्यक्षातील अनुभव याच्या उलट आहे. एखाद्या नेत्याची विश्वसनीयता किती ? यावर लोक मतदान करतात. यासाठी काही उदाहरणे पुरेशी आहेत. १९७७ च्या निवडणुकांत जनता पक्षापाशी पैसा नव्हता. पक्षयंत्रणा नव्हती. प्रचाराला पुरेसा कालावधी नव्हता, परंतु त्यावेळी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची विश्वसनीयता संपून गेली होती. त्यामुळे आणीबाणीच्या काळात सरकारचे व इंदिरा गांधींच्या बाजूने जो एकतर्फी प्रचार करण्यात आला, त्याचा विपरित परिणाम लोकमनावर झाला. जनता पक्षाने आपल्या कार्यकाळात इंदिरा गांधींची बदनामी करण्यात व त्यांना अडचणीत आणण्यासाठी बराच प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या आपापसांतील भांडणामुळे जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली लोकांचा विश्वास उडाला आणि शेवटी लोकांनी इंदिराजींना प्रचंड बहुमताने निवडून दिले. त्यांच्या हत्येनंतर राजीव गांधींना अभूतपूर्व यश मिळाले. परंतु, बोफोर्स प्रकरणी त्यांच्या नेतृत्वाची विश्वसनीयता संपुष्टात आली. राजीव गांधींचा पराभव होऊन विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधान बनले, त्यावेळी विरोधी पक्षांसोबत पक्षाचे गुंडगिरीचे प्रचारयंत्राचे पाठबळ होते, असे नाही. लोकांना विश्वनाथजींच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा आशेचा किरण दिसत होता. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी मतदान केले. परंतु, त्या विश्वासाच्या भावनेला प्रतिसाद देण्याऐवजी त्यांनी क्षुद्र डावपेचाचे राजकारण सुरू केले. त्यातून त्यांची लोकप्रियता संपली. बासनात पडलेला मंडल आयोग अमलात आणून इतर मागासवर्गीयांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात ते अपयशी ठरले. याचे कारण त्यांच्या नेतृत्वावरचा लोकांचा विश्वास संपला होता.
इतिहासात अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील, ज्यावेळी लोकांना त्रास सहन करावा लागत असला तरी नेत्यांवर विश्वास असेल तर तो त्रासही ते आनंदाने सहन करतात. दुसर्या महायुद्धात चर्चिल यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताना त्यांना अनेक आघाड्यांवर अपयश स्वीकारावे लागले. फ्रान्सच्या पराभवानंतर जर्मनी इंग्लंडच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला. जर्मनीची विमाने लंडनला भाजून काढू लागली. भारताच्या सीमेवर जपानच्या फौजा आल्या. तरीही लोकांचा चर्चिलवरील विश्वास ढळला नाही. इंग्लंडची पार्लमेंट सुरू होती. त्यामध्ये चर्चा होत होत्या, परंतु युद्धात विविध आघाड्यांवर अपयश आले म्हणून चर्चिलचा कोणीही राजीनामा मागितला नाही. मात्र, दुसरे महायुद्ध जिंकल्यानंतर साम्राज्यवादी मनोवृत्तीचे चर्चिल महायुद्धानंतर स्थिती इंग्लंडच्या हिताच्या दृष्टीने हाताळतील, असा विश्वास इंग्लिश लोकांच्या मनात नव्हता. त्यामुळे चर्चिल यांना पराभव पत्करावा लागला.
स्वातंत्र्यलढा हा प्रामुख्याने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली लढला गेल्यामुळे कॉंग्रेसवर लोकांचा विश्वास होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर झालेल्या तीन निवडणुकांत कॉंग्रेसला निवडून दिले गेले. या काळात सेक्युलॅरिझम व समाजवादाच्या नावाखाली एक सामाजिक तत्त्वज्ञान तयार झाले. देशातील प्रसारमाध्यमे, बुद्धिजीवी वर्ग या सर्वांनी त्याचा पुरस्कार केला. परंतु, ८० ते ९० च्या दशकात मीनाक्षीपुरम येथील धर्मांतर, काश्मीर खोर्यातील हिंदूंचे विस्थापन, शहाबानो खटल्याच्या निकालानंतर झालेला घटनाक्रम यामुळे समाजवादी आणि सेक्युलर यामुळे तयार झालेले सामाजिक तत्त्वज्ञान लोकांनी नाकारले आणि त्याआधारे चालणारे पक्ष आणि नेतृत्व अविश्वासार्ह ठरू लागले. याचा परिणाम भारतीय राजकारणाचे संदर्भ बदलण्यात झाला. भारतातील प्रसारमाध्यमे आणि विद्यापीठीय विचारवंतांचा विरोध असतानाही हिंदुत्ववादी सत्तेवर आले. या प्रक्रियेतूनच नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. याचा उपयोग करून प्रसारमाध्यमांनी लोकांना चिथवण्याचा, त्यांच्या भावना भडकविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, लोकांनी त्रास होऊनही आपला संयमसोडला नाही. याचे कारण लोकांचा मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास. नोटाबंदीनंतरही केंद्रात आणि महाराष्ट्रात हे यश मिळत आहे. त्याचे कारण या नेत्यांवर लोकांच्या असलेल्या विश्वासात आहे.
एखाद्या नेत्यावर लोकांचा किती विश्वास आहे, हे मोजणारे अजून तरी कोणते यंत्र निर्माण करता आलेले नाही. हा विश्वास लोकांच्या अंतर्मनात निर्माण होऊन त्याचा प्रत्यय व्यवहारात येत असतो. जोवर हा विश्वास कायम असतो, तोवर लोकांच्या मनात आज ना उद्या लोकांमध्ये आपली स्वप्ने साकार होण्याची आशा कायम असते. त्यासाठी कितीही त्रास भोगल्यास त्यांची तयारी असते. केवळ सांख्यिकी आलेखावर तो अवलंबून नसतो.
- दिलीप करंबेळकर