दूषित क्ले नदीमुळे आपतानी शेती आणि पर्यायाने आपतानी संस्कृती धोक्यात आली आहे. नदीच्या पात्रातून झुळझुळणारे पाणी दिसेनासे झाले आहे. प्लास्टिच्या पिशव्यांनी अनेक ठिकाणचा प्रवाह कुंठीत झाला आहे. त्यामुळे नदीचे अस्तित्वच संकटात आले आहे. आपतानी जनजातीतल्या तरुणांना या संकटाची चाहूल लागताच त्यांनी लागलीच हालचाल सुरू केली. ‘आपतानी युथ असोसिएशन’ या संघटनेने क्ले नदी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेली दोन - तीन वर्षे त्यांनी सरकार आणि जनता या दोन्ही स्तरांवर क्ले नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
शहरीकरणाच्या रेट्यामुळे मुंबईतल्या अनेक नद्यांचे रुपांतर गटारात झाल्याचे आपण पाहतो आहोत. पण, नद्यांची वाताहत केवळ शहरीकरणामुळे झाली, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अरुणाचलसारख्या निसर्गरम्य राज्यातही नद्या प्रदूषणामुळे आचके देताहेत. झिरो व्हॅलीत वाहणारी क्ले नदी कचर्याने तुंबली आहे. तिचा श्वासही गुदमरतोय. म्हणूनच अरुणाचल प्रदेशची ही गंगा स्वच्छ करण्यासाठी आता नागरिकांनी कंबर कसली आहे.
नद्यांची पात्रे स्वच्छ केल्याशिवाय देशाचे भवितव्य सुरक्षित नाही, हे सत्य उशिरा का होईना, आपल्याला कळून चुकले आहे. गंगा स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने ताकद पणाला लावली आहे. राज्य पातळीवरही नद्यांची पात्रे स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही ठिकाणी यश तर काही ठिकाणी अपयश अशी परिस्थिती आहे. गुजरातमध्ये साबरमती नदी स्वच्छ झाली आणि आज तिचा सुंदर काठ पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक गर्दी करतात. परंतु, महानगरी मुंबईत मिठीचा श्वास अजूनही कोंडलेलाच आहे. राज्याराज्यातले भगीरथ आपापल्या गंगा-यमुना वाचविण्यासाठी संघर्ष करताहेत. अरुणाचलमध्येही अशीच एक नदी वाचविण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. त्यांचा लढा केवळ एका नदीपुरता मर्यादित नसून, त्या नदीच्या काठी फुललेली संस्कृती वाचविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.
आपतानी जनजातीचे वास्तव्य असलेल्या झिरो व्हॅलीत क्ले नदी वाहाते. आपतानी जनजातीत एकेकाळी चेहर्यावर गोंदवून घेण्याची (टॅटू) परंपरा होती. आता सगळे जग अंगभर टॅटू काढू लागल्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यातली गंमत बहुधा संपली असावी. या लोकांनी आता चेहरा गोंदवणे बंद केले. पण, त्यांचे एक वैशिष्ट्य मात्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपतानी आपल्या शेतीच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीसाठी ओळखले जातात. भातावर तर त्यांचे अतोनात प्रेम! खरेतर हा देशच भातावर प्रेमकरणार्यांचा. काश्मीरपासून केरळपर्यंत आणि कोकणापासून कामरूपपर्यंत हे भातप्रेमव्यापलेले आहे. भात हा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि अरूणाचलची आपतानी जनजाती ही खास त्यांच्या भातशेतीसाठी ओळखली जाते.
ईशान्य भारतातील जनजातींमध्ये आपतानींची शेतीची पद्धत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ईशान्य भारतातल्या बहुतेक जनजातींमध्ये फिरत्या शेतीची परंपरा आहे. अनेक जनजाती शेतीसाठी वने जाळतात. मोकळ्या झालेल्या जमिनीवर काही वर्षे शेती करतात आणि काही वर्षांनी पुढे सरकतात. नवी वने जाळतात, नवी जमीन तयार करतात. यामुळे जंगलांची मोठी हानी होते. त्या तुलनेत आपतानी जनजातीने स्वीकारलेली शेतीची पद्धत निसर्गाशी सुसंगत अशी आहे. आपतानी फिरती शेती न करता एकाच ठिकाणी शेती करून भरपूर उत्पादन घेतात. याच वैशिष्ट्यासाठी झिरो व्हॅलीचा समावेश ‘जागतिक वारसा स्थळां’मध्ये करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
काय आहे या शेतीचे वेगळेपण? आपतानी भातशेतीसाठी जनावरांचा किंवा यंत्रांचा वापर करीत नाहीत. भातशेतीत साचलेल्या पाण्यात मत्स्यपालन (कोळंबी) केले जाते. थायलंड, व्हिएतनामआणि कंबोडियासारख्या दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये भातशेतीत कोळंबी आणि अन्य छोट्या माशांचे उत्पादन घेणे ही सर्वसामान्य बाब आहे, परंतु भारतात मात्र ही पद्धत तेवढी प्रचलित नाही. केवळ एवढेच नाही, तर जमिनीचा पुरेपूर वापर करण्यासाठी भाताच्या बांधावर बाजरी पिकवली जाते. भाताचे भरपूर उत्पादन देणारी ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आपतानी जनजातीची ओळख आहे. त्यांचे वास्तव्य असलेल्या झिरो व्हॅलीला ‘जागतिक वारसा स्थळा’चा दर्जा मिळावा म्हणून भारतीय पुरातत्व विभागाने डिसेंबर २०१२ मध्ये झिरो व्हॅलीची निवड केली. व्हॅलीत वास्तव्यास असलेल्या सुमारे ६० हजार आपतानींसाठी ही अभिमानाची बाब होती, परंतु हा दर्जा मिळण्याचा मार्ग निष्कंटक नाही. क्ले नदीच्या पात्रात प्रचंड प्रदूषण झाले आहे आणि नदीत तुडुंब भरलेला हाच कचरा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यात अडथळा ठरतो आहे. अनेक ठिकाणी पात्राचे दर्शनच होत नाही. दिसतात फक्त तरंगणार्या बाटल्या आणि प्लास्टिक. अरुणाचलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पॉलिथिनच्या पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पिशव्या क्ले नदीत टाकल्या जातात. त्यामुळे या नदीच्या २४ किमीच्या पात्राला गटाराची अवकळा आली आहे. नदीच्या काठी संस्कृतीचा उगमहोतो. नदीच्या आक्रसत जाणार्या पात्रासोबत संस्कृतीचाही र्हास अटळ असतो. त्यामुळे दूषित क्ले नदीमुळे आपतानी शेती आणि पर्यायाने आपतानी संस्कृती धोक्यात आली आहे. नदीच्या पात्रातून झुळझुळणारे पाणी दिसेनासे झाले आहे. प्लास्टिच्या पिशव्यांनी अनेक ठिकाणचा प्रवाह कुंठीत झाला आहे. त्यामुळे नदीचे अस्तित्वच संकटात आले आहे. आपतानी जनजातीतल्या तरुणांना या संकटाची चाहूल लागताच त्यांनी लागलीच हालचाल सुरू केली. ‘आपतानी युथ असोसिएशन’ या संघटनेने क्ले नदी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेली दोन- तीन वर्षे त्यांनी सरकार आणि जनता या दोन्ही स्तरांवर क्ले नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यापूर्वी क्ले नदी स्वच्छ करण्यासाठी दोन-तीन मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यापासून झिरो व्हॅलीतील शाळकरी मुलांपर्यंत सर्वजण या मोहिमेत सामील होत आहेत. १३ नोव्हेंबरला क्ले स्वच्छ करण्यासाठी पुन्हा ही मंडळी रस्त्यावर आली आणि झिरो व्हॅलीत पसरलेल्या क्ले नदीच्या २४ किमी लांब पात्राची सफाई करण्यात आली. तब्बल १२ ट्रक भरून कचरा गोळा झाला. कचर्यामध्ये सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे होते. क्ले नदीचे पात्र काही प्रमाणात मोकळे झाले. अनेक ठिकाणी प्लास्टिकचे अडथळे दूर झाल्यामुळे नदीचे पात्र पुन्हा वाहते झाले. क्ले आता काही काळ मोकळा श्वास घेते आहे. पण, लोकांना चांगलेच ठाऊक आहे की, क्ले नदी एका दिवसात दूषित झालेली नाही आणि त्यामुळे ती एका दिवसात स्वच्छही होणार नाही. आपतानींना आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी क्ले जपायची आहे. त्यासाठी सर्व धडपड सुरू आहे. त्यांची धडपड क्ले नदीला साबरमतीच्या मार्गाने नेईल, अशी आशा आहे.
- दिनेश कानजी