राष्ट्रीय मानसिकता कशी घडते

    23-Oct-2017   
Total Views |


कल्पना करा, संपूर्ण भारतातील लोक एकाच ठरवलेल्या दिवशी एकाच वेळेस ( १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी सोडून) काहीतरी उपक्रम राबवत आहेत आणि त्यातून देशाला एका उंचीवर घेऊन जाणारं काम घडतंय. असं कधी घडलंय ?

 

१९६५ युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूरशास्त्रीनी लोकांना आवाहन केले की देशात अन्नधान्याची कमी झाली आहे आणि सैन्याला अन्नपुरवठा करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे देशबांधवांनी आठवड्यातून ठरवलेल्या वाराला एक वेळचे जेवण घेऊ नये. आणि देशाने त्यांना प्रतिसाद देऊन आठवड्यातून एक वेळ उपवास केला आणि अनेकांनी तो युद्ध संपल्यावरही सुरु ठेवला. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता दूर झाली, लोकांमध्ये एकीची भावना निर्माण झाली आणि सैनिकांना नैतिक पाठिंबा मिळाल्याने त्यांचा हुरूप वाढला. सैन्याने लाहोरपर्यंत धडक दिली. ही होती सामुदायिक भावनेची ताकद.


२ ऑक्टोबर १९९४ रोजी दिल्ली चे स्वास्थ्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एकाच दिवशी दिल्लीतील १२ लाख शिशूंसाठी पल्स पोलिओ अभियान राबवून दिल्लीला पोलिओ मुक्त करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले. १९९५ मध्ये डॉ. हर्षवर्धन यांचा हाच कार्यक्रम तत्कालीन नरसिंहराव सरकारने राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा व केंद्रीय स्वास्थ्यमंत्री ए आर अंतुले यांनी देशभरात राबवायला सुरुवात केली. ठरलेल्या तारखांना संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम सरकारी यंत्रणांनी राबवणे सोपे नव्हते. २३ लाख स्वयंसेवक आणि दीड लाख नियंत्रकाची फौज दिवस रात्र भारतातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी काम करत होती. सतत २० वर्षांच्या प्रयत्नांनंतर २०१४ साली भारताला पोलिओ मुक्त घोषित करण्यात आले. ही होती सामुदायिक प्रयत्नांची ताकद.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून २०१५ सालापासून साजरा केला जाऊ लागला. आणि या एकाच दिवशी भारतातच नव्हे तर जगभरातील लोक एकत्र येऊन योग करून हा दिवस साजरा करू लागले. ही संपूर्ण जगाची सामुदायिक प्रयत्नांची ताकद.


मनुष्य हा सामाजिक भावना असलेला प्राणी आहे. एकत्र येऊन काहीतरी कार्यक्रम करणे, उत्सव करणे त्याला आवडते. घरातील कार्यक्रम असो वा सार्वजनिक कार्यक्रम असो, एकट्याने करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम यशस्वी करण्यात आनंद अनेक पटींनी वाढतो. अशा सामुदायिक कामांमुळे लोकांमध्ये एक अदृश्य नातं तयार होत आणि एकी वाढते.

 

आपण साजरे करत असलेले सगळे सण असेच सामुदायिकरित्या साजरे करण्याचे सण आहेत. अगदी चैत्रातील गुढीपाडवा ते फाल्गुनातील होळीपर्यंत सर्व सणात सामुदायिकता दिसते. मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये लोक रमून जातात.

 

भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच पाहतांना बहुतेक लोक एकत्र बसून पाहणे पसंत करतात. पिकनिकला जातांना मोठा ग्रुप बरोबर जाणे आनंददायी वाटते.

 

शाळेत असताना एक प्रश्न नेहमी पडायचा. इंग्रज तर संख्येने थोडे होते. मग करोडो भारतीयांनी त्यांना एक दिवस ठरवून त्या एकाच दिवशी का हाकलून लावले नाही ? पण नंतर लक्षात आले की त्यासाठी आवश्यक असणारी सामुदायिक मानसिकता तेव्हा भारतीयांच्यात नव्हती.

 

लोकांनी एकत्र यावे यासाठी त्यांच्यात काहीतरी कॉमन गोष्टी आवश्यक असतात. उदाहरणार्थ एका मोठ्या कुटुंबातील लोक एकत्र येतात. एकाच वर्गातील मुलांचा गट बनतो. एकाच कॉलेजची मुलं एकत्र येतात. एका ऑफिसमधील लोक बाहेर एकत्र येतात. एका डिपार्टमेंटमधील लोक एकत्र येतात बाहेरच्या राज्यात गेले की एका राज्यातील एक भाषा बोलणारे लोक एकत्र येतात. बाहेर देशात गेले की एका देशातील लोक एकत्र येतात. सारखे सण-उत्सव करणारे लोक एकत्र येतात. एक आवड-निवड, विचार असलेल्या लोकांचे फेसबुकवर पण ग्रुप बनतात. एवढंच काय एकसारखं व्यसन असणारे लोक कुठेही असले तरी एकत्र येतात. म्हणजे कुटुंब, शिक्षण, पदवी, कामाचे स्वरूप, भाषा, देश, संस्कृती, सण समारंभ, खानपान, व्यसन, आवडी निवडी, आचार-विचार, ह्या पैकी काहीही कॉमन असेल तर लोक एकत्र येतात.



आता भारतासारख्या देशात, जिथे वर उल्लेख केलेल्या प्रत्येक गोष्टीत विविधता आहे, तिथे लोक कायम स्वरूपी एकत्र कसे येऊ शकतात ? नव्हे लोक एकत्र येतील अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे का ? अजिबात नाही. एक गोष्ट मात्र बहुतेक लोक विसरतात ते म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या भारत हा एक आहे. अजूनही बरेच लोक भारतीयांमध्ये असलेल्या विविधतेला भेद समजण्याची चूक करतात.

 

लोकांना हा देश तेव्हाच आपला वाटतो जेव्हा येथील लोक आपले वाटतात. ज्या लोकांना देश आपला वाटत नाही ते वेगळे होण्याची मागणी करतात. लोकांना जर एकत्र आणायचे असेल तर लोकांमधील भेद नव्हे तर त्यांच्यातील सामायिक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते. आणि ही सामायिक गोष्ट म्हणजे आपली हजारो वर्षे पुरातन संस्कृती. कणाकणात देव मानणारी, प्रत्येक प्राणीमात्रालाच नव्हे तर निर्जीवालाही पुजणारी, पर्यावरणाला पुजणारी संस्कृती. पूजेतील वैविध्याला स्विकारणारी संस्कृती. पूजा करणारे किंवा न करणारे यांत भेद न करणारी संस्कृती. आणि ह्या संस्कृतीप्रमाणे वागणारे आपले पूर्वज ही सामायिक आहेत. असे जर झाले तर कुणी कुठल्याही पूजा पद्धतीला मानणारा असो, भारतातील प्रत्येक व्यक्ती ही एक दुसऱ्याशी एका अदृष्य नात्याने जोडली जाईल आणि त्यातूनच नवा भारत जगासमोर येईल.

 

हे स्वप्नरंजन आहे का ? मला वाटत नाही. आज वाराणसीत घडलेली घटना या बदलाची सुरुवात आहे असे मानायला जागा आहे. आजच्या ( २२ ऑक्टो २०१७) वर्तमानपत्रात आलेली ही बातमी -


"वाराणसीमध्ये दिवाळीचे औचित्य साधत काही मुस्लिम महिलांनी श्रीरामाच्या मूर्तीची आरती केली होती. त्यानंतर अशा महिलांना बहिष्कृत केल्याचे दारुल उलुम देवबंदने स्पष्ट केले. मात्र आरती करणाऱ्या मुस्लिम महिलांनी याबाबत वेगळीच भूमिका मांडली आहे. अयोध्या हे एक धार्मिक स्थळ आहे, इथे श्रीराम वास्तव्य करतात. ते आपले पूर्वज आहेत. आपले धर्म आणि नावे बदलू शकतात पण पूर्वज नाही असे वक्तव्य नाजनीन अन्सारी नावाच्या महिलेने केले आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. श्रीरामाची पूजा केली तर हिंदू आणि मुस्लिम समाजात असलेली तेढ कमी होण्यास नक्कीच मदत होईल असेही नाजनीन यांनी स्पष्ट केले"

गरज आहे ती स्वार्थी दृष्टीकोन सोडून सर्वांनी अशा राष्ट्रीय मानसिकतेला सामुदायिक पाठिंबा देण्याची आणि त्याचा प्रचार करण्याची.

 

- भूषण मेंडकी