२००व्या एकदिवसीय सामन्यात कोहलीचे धडाकेबाज शतक

    22-Oct-2017
Total Views |


वानखेडे स्टेडियम (मुंबई) : एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित होतात. त्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दिवस तसा विशेष म्हटला पाहिजे. कारण एकदिवसीय सामन्यांमधील कोहलीचा हा २००वा सामना आहे. त्या सामन्यात कोहलीने संघातील आपले महत्त्व पुन्हा एकदा दाखवून दिले. सातत्याने पहिल्या फळीतले फलंदाज बाद होत असताना भारताचा कर्णधार मात्र एका बाजूने टिकून राहिला. आज कोहलीने एकदिवसीय सामन्यांत नवा विक्रम प्रस्थापित करत ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचा एक विक्रम मागे टाकला. आज ३१वे शतक पूर्ण करत विराट कोहलीने ३१वे एकदिवसीय सामन्यातील वेगवान शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला जात आहे.

विराटचे शतक पूर्ण होतानाच भारताच्या ५ बाद २२७ धावा झाल्या होत्या. त्या नंतरही फटकेबाजी करत १२१ धावा केल्या आहेत. पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय भारताने घेतल्यावर भारताचे पहिले ५ फलंदाज पटापट बाद झाले. पहिली इनिंग संपताना भारताच्या ५० ओव्हर्समध्ये ८ बाद २८० धावा झाल्या.

विराट कोहलीच्या शतकाने भारताला सुस्थित आणून ठेवले अन्यथा भारतीय संघाचे आव्हान लवकरच संपुष्टात आले असते. कोहलीने एकूण १२५ बॉल्समध्ये १२१ धावा केल्या. कोहलीने काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिनेश कार्तिकला मधल्या फळीत खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यावर विश्वास टाकला होता. मात्र कार्तिकने केवळ ३७ धावांचे योगदान दिले आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बॉल्टने अचूक गोलंदाजी करत भारतीय संघासमोर चिंतेचे वातावरण निर्माण केले, त्याने १० ओव्हर्समध्ये ३५ धावा देऊन भारताच्या ४ फलंदाजांना चितपट केले. तसेच साऊदीने ३ बळी घेतले.

पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या पहिल्या दोन फलंदाजांना पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले तेव्हा केवळ ३७ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये १६० धावा तर पहिल्या २१ ओव्हर्समध्ये भारताच्या धावांचे शतक पूर्ण झाले.

भारताची चौथा बळी गेल्यावर विराट कोहली २१ तर दिनेश कार्तिक २७ धावांवर खेळत होते. विराटच्या शतकात ७ चौकार व १ षटकार यांचा समावेश होता. तिसऱ्या पॉवर प्लेमध्ये भारताने ४ विकेट गमावून ८३ धावा जोडल्या.