आपण सर्व स्वयंसेवक

    15-Oct-2017   
Total Views |


 

तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गासाठी नागपूरला गेलो होतो. विश्वभरातील निवडक स्वयंसेवकांचा वर्ग असल्यामुळे, हजाराच्या वर स्वयंसेवक असलेल्या या वर्गात संपूर्ण भारताचे एक छोटे स्वरूप पहायला मिळत होते.


 सर्व अखिल भारतीय कार्यकर्ते, ज्यांनी आपले आयुष्य संघकार्यासाठी वाहून दिले आहे असे सर्व त्या वर्गात होते. त्यांचे अनुभव, भरातभरातील कार्यकर्त्यांचे समाजकार्यातील अनुभव ह्याचा रोजच लाभ घडत होता. याशिवाय रोज रात्रीच्या जेवणानंतर एक कार्यक्रम असायचा, ज्यात देशातील एखादे नामवंत तज्ञ येऊन त्यांच्या विषयावर प्रेझेन्टेशन देत. हाही एक प्रचंड आवडणारा कार्यक्रम होता. 


केरळचे बरेच स्वयंसेवक या वर्गात होते. त्यांच्याकडून कम्युनिस्टांच्या हिंसक कारवाया सहन करत, प्रसंगी विरोध करत संघकाम कसे वाढत आहे हे कळत होते. पूर्वांचलातील कार्यकर्त्यांकडून मिझोराम, नागालँड अरुणाचल मधील धर्मांतर आणि त्यातून वाढीस लागलेली देशविरोधी भावना, त्यातून लोकांना भारताशी जोडण्यासाठी चाललेले संघकाम याची माहिती मिळत होती. विदेशातील कार्यकर्त्यांकडून जगभरपसरलेल्या कामाचा आवाका लक्षात येत होता. 


या वर्गात उपस्थित असलेल्या केंद्रीय स्तरावरील कार्यकर्त्यांना कोणताही स्वयंसेवक जाऊन भेटू शकत होता. आम्हाला कळाले की  दत्तोपंत ठेंगडी सुद्धा तेथे उपस्थित आहेत. ते कुठल्या खोलीत राहायला आहेत याची चौकशी करून आम्ही भेटायला जायचे ठरवले. 

 

दत्तोपंत ठेंगडी हे एक देशासाठी आयुष्य वाहून दिलेलं समर्पित व्यक्तिमत्व. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच अशा मोठ्या संघटनांचे संस्थापक. या सर्व संघटना त्यांच्या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या जीवनकाळातच मोठ्या केल्या. कम्युनिस्टांची कामगार क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढण्यात त्यांनी यश मिळवले. संप हे देशाच्या प्रगतीच्या विरोधात हत्यार म्हणून वापरणाऱ्या कम्युनिस्टांविरोधात जाऊन काम करणे हे जिथे अशक्य मानले जात होते तिथे त्यांनी मजदूर संघ वाढवलाच नाही तर भारतातील सगळ्यात मोठी संघटना म्हणून नावारूपास आणले. ' जगातील कामगारांनो एक व्हा' असे सांगत जग विरुद्ध कामगार असा वर्गभेद करणाऱ्या कम्युनिस्टांच्या विपरीत असे मजदूर संघाचे ध्येयवाक्य ठरवले 'कामगारांनो जग एक करा'. वसुधैव कुटुंबकम हे प्रत्यक्षात आणणारी संघाची विचारपद्धती त्यांनी या चार शब्दात ध्येय म्हणून कामगारांसमोर ठेवली.

 

तर असे दत्तोपंत एखाद्या छान चकाचक खोलीत राहत असतील, नागपूरच्या उन्हाळ्यात सर्व केंद्रीय कार्यकर्त्यांसाठी मस्त एअर कंडिशन रूम्स ची व्यवस्था असेल असा विचार करत आम्ही ४-५ जण त्यांच्या खोलीच्या दिशेने जात होतो. रूम चा दरवाजा उघडाच होता. दत्तोपंत बहुतेक आतल्या खोलीत असावेत. अगदी छोटा हॉल. त्यात डाव्या बाजूलाल पलंग आणि समोर दोन खुर्च्या. मधल्या जागेत सतरंजी घातलेली त्यावर ४-५ जणंच बसू शकतील एवढीच जागा. आम्ही दबकतच आत शिरलो आणि त्यांची वाट बघत उभे राहिलो. आधी विचार केल्याप्रमाणे खोलीत कुठेही एअर कंडिशनर नव्हता. अगदी साधी गरजेपुरती व्यवस्था होती. २-३ मिनिटातच दत्तोपंत आले. जवळजवळ ऐंशी वर्षांचे असलेलं दत्तोपंत थकलेले दिसत होते. तरी चेहरा प्रसन्न आणि उत्साही. आम्ही नमस्कारासाठी खाली वाकलो. त्यांनी आम्हाला थांबवत पलंग- खुर्च्यांवर बसायला सांगितले. सर्वांना जागा पुरली नसती म्हणून आम्ही खालीच सतरंजीवर बसलो. त्यांनीं खुर्चीवर बसून आमच्याशी बोलावे असा आमचा उद्देश. त्यानंतर जे घडले तो क्षण आयुष्यभराची शिकवण देणारा ठरला. दत्तोपंत आमच्यातच खाली सतरंजीवर बसले. त्यांना खाली बसायला त्रास होत असावा. आम्ही वर बसायला विनंती करूनही न ऐकता आमच्या अगदी जवळ बसले. म्हणाले, आपण सगळे स्वयंसेवक आहोत. आम्ही मात्र अवाक होऊन हा अनुभव मनात , डोळ्यात साठवून घेत होतो. संघाचे संस्कार म्हणजे काय हे बोलून किंवा भाषणातून सांगण्याचा विषय नाही तर जगण्याचा विषय आहे हे आम्ही दत्तोपंतांच्या रूपात अनुभवत होतो.

 

त्यानंतर १५- २० मिनिटे आम्ही विविध विषयांवर गप्पा मारल्या. देशातील परिस्थिती विषयी ते अतिशय चिंताग्रस्त दिसत होते. खास करून स्वदेशी ला प्रोत्साहन देण्यात सरकार कसे अपयशी ठरत आहे याविषयी त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. ऐंशी वर्षे वयाचा हा तपस्वी वयाच्या उत्तरार्धात सुद्धा देशाविषयी किती तळमळ बाळगून आहे हे त्यांच्या शब्दांतून जाणवत होते.

 

महिन्याभराच्या या वर्गात आम्ही बरेच काही मिळवले. पण त्यातील दत्तोपंतांची भेट हा परमोच्च बिंदू होता हे नक्की.

 

- भूषण मेंडकी