गंध गोव्याचा...

    13-Oct-2017   
Total Views |
 

 
कोणी हळूच यावे माझ्या मनी फुलावे
आणि ओंजळीत घ्यावे...
गंध हलके हलके हलके... गंध हलके...
 
‘गंध हलके हलके’ या अल्बममधील वरील गीताच्या पंक्ती खरंच आसपासचं वातावरण एकदम गंधाळून टाकतात. लहानपणापासून प्रत्येकाच्या आठवणीच्या कुपीत असे गंध अलगद बंदिस्त होतात आणि पुन्हा तोच गंध हुंगला की गतआठवणींचा पिटारा आपसुकचं उघडतो. असे हे मनाला भुलवणारे, खिजवणारे आणि आत्मानुभूतीची जाणीव करुन देणारे गंध प्रत्येकालाच मोहित करतात. एखादी जागा, फळं-फुल, वस्तू, ऋतू अशा विविध घटकांशी गंधांचे तसे गहिरे नाते... तेव्हा गोमंतकाच्या भूमीतील वैविध्यपूर्ण गंधांचा मूळच्या गोवेंकर असलेल्या शेफाली वैद्य यांनी शब्दबद्ध केलेला हा स्वानुभवाचा गंध...
 
 
एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होते. इकडच्या तिकडच्या अवांतर गप्पा मारता मारता बागेच्या गोष्टी निघाल्या. सहज तिला म्हटलं की, ’’पुण्याला माझ्या बागेत मी बकुळीचं झाड लावलंय.’’ ती काही क्षण काही बोललीच नाही. मला वाटलं फोन कट झाला. फोन ठेवून देणार एवढ्यात तिने सोडलेला खोल निःश्वास ऐकू आला. ’’अगं, झालं काय, अशी एकाएकी बोलायची का थांबलीस तू ?’’ मी विचारलं. ’’तू बकुळीचा उल्लेख केलास आणि नुसत्या त्या फुलाच्या सुगंधाच्या आठवणीने अख्खं बालपण जिवंत केलंस माझं. आठवणीत हरवून गेले गं काही वेळ...’’ भरल्या स्वरात मैत्रीण म्हणाली. मी नुसती हसले. खरंच स्पर्श, आवाज आणि रंग या संवेदनांपेक्षाही गंधांमध्ये जुन्या आठवणी चाळवण्याची केवढी ताकद असते! नुसत्या एका फुलाचा वास आपल्या आयुष्यावर जमलेली किती दिवसांची पुटे सहज खरवडून टाकू शकतो.
 

 
मी गोव्यासारख्या रूपसंपन्न भूमीत वाढले. कुंकळ्ळीसारख्या तेव्हा छोट्या असलेल्या गावात बालपण गेलं माझं. गोव्यात वाढलेल्या कुठल्याही मुलाचा ‘निसर्ग’ हा एक अदृश्य सवंगडी असतो आणि अख्ख्या गोव्यातला निसर्ग गंधाच्याच भाषेत बोलतो. मी लहान होते तेव्हा आमच्या घराकडे जाणारा रस्ता अजून डांबरी झाला नव्हता. लाल मातीचाच होता तो रस्ता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असह्य उन्हाच्या झळांनी रस्त्यावरची माती ताप ताप तापायची. चुकून अनवाणी पायांनी रस्त्यावर चाललं तर जाणवेलसा चटका बसायचा. घामाच्या धारा वाहात असायच्या सगळ्यांच्या अंगातून आणि मग अचानक एका संध्याकाळी जोरदार वारे वाहू लागायचे. आकाशात वीज कडकडायची आणि वळिवाचा पाऊस यायचा. त्या पावसाचे थेंब त्या उन्हाने तडतडणार्‍या लाल मातीवर पडले की, खरपूस असा मृद्गंध सगळीकडे पसरायचा. इंग्रजीत या गंधाला ‘पेट्रिकोर’ असं नाव आहे, हे मला पुढे खूप वर्षांनंतर कळलं. तो मृद्गंध तापलेली धरती आणि शिणलेली मने, दोघांनाही ताजातवाना करून जायचा. अजूनही पहिल्या पावसाचा तो चिरपरिचित मातीचा वास आला की, मला आमच्या घरासमोरचा तो तापून लालेलाल झालेला रस्ताच आठवतो. गोव्यात पाऊस पडतो तो वेड्या प्रियकरासारखा. अगदी नको नको होईस्तोवर अखंड बरसणारा. त्या पावसाळी दिवसांचेही अनेक गंध असतात. गोव्यात पावसात मासेमारी बंद असते. त्यामुळे ताजे मासे मिळत नाहीत. मग अगदीच जीभ खवळायला लागली की, हाडाचा गोवेकर साठवणीतला सुक्या बांगड्याचा किंवा मोरीचा तुकडा भाजायला घेतो. बाहेर पावसाने कुंद झालेली हवा आणि आत चुलीवर तडतडणारा बांगड्याचा तो उग्र, तरीही जीभ चाळवणारा गंध! त्या आठवणीने आत्ताही हे लिहिताना माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. त्यातच वीज जायची आणि केरोसीनवर पेटणारी ’चिमणी’ पेटवली जायची. त्या चिमणीची ज्योत जळताना केरोसीनचा वास यायचा. इतर गंधांमध्ये तो केरोसीनचा गंधही बेमालूममिसळून जायचा. कुकरमध्ये शिजणारा गुरगुट्या भात, ’डोणातल्या’ म्हणजे मोठ्या मातीच्या बरणीत मीठ घालून मुरायला ठेवलेल्या ’आंबली’ म्हणजे कैरीचा आंबट वास, खवलेला भरपूर ताजा नारळ घालून केलेल्या सुक्या बांगड्याच्या किसमोरीचा खमंग वास आणि त्या गंधावर भुरभुरती साखर पेरावी तसा पेरलेला पावसाचा आणि केरोसीनच्या चिमणीचा संमिश्र गंध, हे सगळं म्हणजेच गोव्यातला पाऊस!
 

 
पावसाळ्यात रात्री डास येऊ नयेत म्हणून आई घरात धूप घालायची. रसरसणारे लालभडक इंगळे आणि वर उसासणारा सुगंधी धूप. पूर्ण घर त्या धुंदावणार्‍या तरीही पवित्र अशा सुवासाने भरून जायचं. बाहेर पाऊस अखंड वेदघोषासारखा धीर-गंभीरपणे कोसळत असायचा. तो नाद आणि तो गंध यांचं अतूट नातं मी कधीच विसरू शकणार नाही. आषाढ उलटून गेला की, पाठोपाठ फुलांनी नटलेला श्रावण यायचा. गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक माणसाच्या अवतीभवती फुलांचा सहज वावर असतोच. श्रावणात तर सगळीकडे फुलांची नुसती रेलचेल असायची. माझी चुलत आजी श्रावणात आदितवारची पूजा बांधायची. देवघरातल्या एका झाडून-पुसून साफसूफ केलेल्या कोपर्‍यात ठेवलेली केळीची लुसलुशीत हिरवीकंच आगोतली आणि पानाच्या कडेकडेने रांगोळीसारखी रचलेली ताजी टवटवीत प्राजक्ताची फुले! नुकत्याच शाळेत लागलेल्या मला ती तिरंगी आरास हुबेहूब भारताच्या झेंड्यासारखी दिसायची. आजी मग देवाभोवती बाकीची फुलं नीट रचून ठेवायची, लहान बाळाच्या आरक्त नखांसारख्या गुलाबी जाईच्या कळ्या, सुगंधाची मुक्त उधळण करणारी मोजकीच, पण टपोरी सोनचाफ्याची फुले, लाल-पिवळी छटा असलेला विरागी देवचाफा, रक्तासारख्या काळपट लाल रंगाचे गावठी गुलाब आणि थोड्या उग्र वासाच्या रानतुळशीच्या मंजिर्‍या, गोव्यात त्यांना ‘पातीची कणसे’ म्हणतात. पूजा करताना आजी उदबत्ती लावायची. उदबत्तीच्या धुराची निळी भेंडोळी फुलांच्या वासात मिसळून जायची. सगळ्यात शेवटी यायचा तो भीमसेनी कापराचा काहीसा तिखट वास. हे सगळे गंध एकमेकांत मिसळून जो गंध निर्माण व्हायचा, तो आत्तासुद्धा कधी कधी माझं नाक चाळवतो.
 

 
बकुळीची आणि प्राजक्ताची फुलं तर माझी अत्यंत आवडती. आमच्या फाटकाच्या कडेलाच एक मोठं पारिजातकाचं झाड होतं. सकाळी रस्त्यावर नुसता फुलांचा सडा शिंपलेला असायचा. शाळेला जाताना न राहवून मी त्यातली काही फुलं उचलून ओंजळीत घ्यायचेच, पण चार पावलं चालते न् चालते, माझ्या मुठीत ती पृथ्वीमोलाची फुलं पार मलूल होऊन मान टाकायची. फार वाईट वाटायचं. मी मनाशी पक्कं ठरवायची की, यापुढे प्राजक्ताची फुलं हातात घ्यायची म्हणून नाहीत, पण दुसरा दिवस उजाडला की, परत ती प्राजक्ताची टपोरी फुलं मला खुणवायची आणि मी ती उचलून घ्यायचीच! बकुळीची फुलं मात्र सुकून गेली तरी त्यांचा परिमळ मागे ठेवून जायची. बकुळीचे सुकलेले सर आम्ही मुली पुस्तकांमधून ठेवायचो. काही दिवसांनी पुस्तकांची पानं उघडली की, कागदाचा आणि बकुळीच्या फुलांचा असा एक संमिश्र प्रसन्न वास दरवळायचा. आमच्या घराजवळ एक खूप जुनं बकुळीचं झाड होतं. त्याचं खोड पाच माणसांना सहजी कवेत घेता येणार नाही एवढं मोठं होतं आणि भरदुपारीदेखील त्या झाडाच्या सावलीत कसं शांत, निवांत वाटायचं. भल्या पहाटे त्या झाडाखाली खूप मुलींची गर्दी जमायची, खाली पडलेली बकुळीची फुलं वेचायला. वरती पक्ष्यांची सतत किलबिल चालू असायची. पुढे एका पावसाळ्यात केवढा तरी मोठा आवाज होऊन ते झाड मुळापासून उन्मळून पडलं. पुढे किती तरी दिवस त्याचं ते महाकाय खोड तसंच रस्त्यात पसरलेलं दिसायचं, रणांगणात गेलेल्या एखाद्या वीराच्या शरीरासारखं!
 
 
श्रावणातच कधी कधी पापा आईसाठी म्हणून मुद्दाम केळीच्या पानात बांधलेला जाईचा केळीच्या सोपाच्या दोरात ओवलेला भरगच्च गजरा आणायचे. तो गजरा केसांत माळल्यावर माझी आई देवघरातल्या तेवत्या दिवलीसारखी प्रसन्न दिसायची. त्या नकळत्या वयातदेखील मला आई-पापांची एकमेकांबद्दल वाटणारी ओढ आत कुठे तरी खोल स्पर्शून जायची. गोव्यातला फोंडा महाल हा फार पूर्वीपासून इथल्या जाईच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. श्रावण सरता सरता माझी कुलदेवता असलेल्या म्हार्दोळच्या श्री म्हाळसा मंदिरात ’जाईची पूजा’ बांधली जाते. या दिवशी देवळाचा अख्खा परिसर फक्त जाईच्याच फुलांनी सजवला जातो. देवीच्या अंगावरही फक्त जाईच्याच फुलांचे अलंकार आणि देवीचे वाहनही जाईच्याच फुलांनी सजवलेले. त्या दिवशी केवळ श्री म्हाळसेचे मंदिरच नव्हे, तर पूर्ण म्हार्दोळ गाव जाईच्या गंधाने घमघमतं. त्या दिवशी आसपासच्या सगळ्या गावांमधली झाडून सगळी जाईची फुलं म्हार्दोळच्या देवळात पाठवली जातात, सेवा म्हणून. माझे वडील नेहमी म्हणायचे, ‘‘ज्या दिवशी म्हार्दोळला जाईची पूजा असते, त्या दिवशी जवळपासच्या गावांमध्ये हजार रुपये मोजले तरी जाईची एकही कळी विकत मिळणार नाही.’’ श्रावण जातो आणि भाद्रपद येतो. गोव्याचा आवडता सण, गणेश चतुर्थी याच महिन्यात येते. घराघरात गणपती बसतात. गणपतीपुढे पानाफुलांनी, फळांनी सजवलेली माटोळी असते. त्या माटोळीला स्वतःचा असा एक रानगंध असतो. घरात गणपतीच्या अंगावर वाहिलेली फुलं, कापूर, उदबत्ती, ताजं ताजं उगाळलेलं चंदन, हळद-कुंकू आणि श्री गणेशापुढे तेवत असलेलं तुपाचं निरांजन आणि तेलाच्या समया यांचा गंध एकत्र दरवळत असतो. त्यात नैवेद्याला ’पातोळ्या’ होतात, त्या हळदीच्या पानात उकडतात. त्या हळदीच्या पानांचा वास किती तरी वेळ मनात रेंगाळत असतो. याच दिवसात नवीन भाताच्या लोंब्या तयार होतात. ’नव्यांची पूजा’ या नावाने त्या भाताची पूजा बांधली जाते. त्या ताज्या ताज्या दुधाळ कणसांचा वास नाक भरून टाकतो. गोव्यात फुलं तर इतकी आहेत की, प्रत्येक फुलाचा गजरा वेगळ्या नावाने ओळखला जातो. जाईच्या फुलांचा तो ‘पोड’, सुरंगांचा तो ‘वळेसर’, अबोलीची, शेवंतीची बारीक चमकी घालून गुंफलेली ती ‘फांती’ आणि बकुळीची ती ‘माळ’. बकुळीच्या फुलांना गोव्यात ’वोवळा’ म्हणतात. गोव्याचे नवपरिणीत नवरा-नवरी अंतरपाट पडला की, आधी एकमेकांच्या गळ्यात आधी बकुळीची नाजूक एकपदरी माळ घालतात आणि मगच फुलांचा हार. कदाचित त्या बकुळीच्या फुलांसारखा त्यांच्या सहजीवनाचा सुगंध दीर्घकाळ परिमळत राहावा, अशी इच्छा असू शकेल या परंपरेमागे. काही काही सुगंधी फुलं तर मी फक्त गोव्यातच पाहिली आहेत. ‘केसर’ नावाचं एक सुरेख केसरी फूल आहे. त्याचं झाड एकदम काटेरी, बाभळीसारखं असतं, पण फुलं एकदम नाजूक, रेशमासारखी मऊ. गालावर फिरवली तर असंख्य केशरी रंगकण गालाला चिकटून राहतात. केसराचं फूल एकदमनाकापाशी नेऊन हुंगलं तरच त्याचा गंध नाकात भरतो. गोड, हवाहवासा वाटणारा गंध, लहान मुलाच्या टाळूला येतो तसला. मंगेशीच्या देवळाबाहेर फुलं विकणार्‍या बायकांकडे हातभर रुंदीची नागचाफ्याची फुलं विकायला ठेवलेली असतात. गर्द गुलाबी रंगाच्या त्या फुलांमध्ये पिवळे परागकेशर काय शोभून दिसतात! त्या नागचाफ्याचं झाड पुणे विद्यापीठात आहे. गोल तोफेच्या गोळ्यासारखी फळे येतात म्हणून त्या झाडाला ’कॅनन बॉल ट्री’ म्हणतात इंग्रजीत. विशेष म्हणजे, नागचाफ्याची फुलं झाडाच्या मुख्य बुंध्याला लगडलेली असतात. सुरंगांची फुलेही अशीच बुंध्याला फुलतात. पूर्वी सुरंगांचे वळेसर खूप दिसायचे. एक प्रकारचा मादक, जरासा उग्रच गंध असे त्यांना. आजकाल मात्र सुरंगांचे वळेसर कुठे दिसतच नाहीत. माझ्या काकांचं मडगावला घर होतं, त्या घराबाहेर एक सुरंगांचा मोठ्ठा रुख होता. त्या झाडावरून फुललेली सुरंगं खुडताना पूर्ण हातच सुगंधी व्हायचा. हल्ली नर्सरीतून आपण कंद आणून लावतो, त्या मोठ्या कमळाला कसला वासच नसतो, पण गोव्यातल्या प्रत्येक तळ्यात रांगोळीच्या ठिपक्यांप्रमाणे शोभून दिसणार्‍या इवल्या साळकांना मात्र त्यांचा स्वतःचा असा अंगचा एक मंद सुवास असतो. हातो किंवा केवडा पूर्वी गोव्यात सर्रास मिळायचा, पण आता मात्र जवळजवळ बाजारपेठेतून हद्दपारच झालाय. शब्दुली किंवा गुलबक्षीच्या फुलांनाही खूप मंद सुवास येतो. निशिगंधाचा मंद दरवळ, रातराणीचा नखरेल सुगंध, बटमोगर्‍याचा एखाद्या सुरेख संध्याकाळची नशा अजून वाढवणारा उन्मादक गंध... या सगळ्या गोव्याच्या वासांनी केवढं समृद्ध केलंय मला. यातल्या एखाद्याच फुलाचा वासदेखील माझा अख्खा दिवस सुगंधी बनवायला पुरेसा आहे.
 

 
गणपती गेले की, देवीच्या आगमनाची तयारी सुरू होते. गोव्याला म्हणावी तशी थंडी कधी पडतच नाही, पण पहाटेच्या वेळेला गोधडीत गुरफटून जरा अधिक वेळ झोपावंसं वाटत असतं. तेव्हा नेमकी घराबाहेरच्या मोठ्या न्हाणीमध्ये आंघोळीचं पाणी गरमकरण्याची आईची लगबग सुरू व्हायची आणि पावसाळ्याचे गंध मागे पडून थंडीच्या दिवसांचे गंध नाकाशी खेळ करायला सुरू करायचे. वाळक्या पानांच्या शेकोटीच्या तिखटगोड धुराचा वास, नुकत्याच कापलेल्या साळीच्या शेतात मागे रेंगाळणारा ओल्या भाताचा उबदार गंध, लाल-पिवळ्या झेंडूच्या फुलांची उग्र दरवळ, नुकत्याच कढवलेल्या साजूक तुपाचा वास, तिळाच्या वडीचा, वाफाळणार्‍या गवती चहाचा, गाई-गुरांच्या गोठ्याचा, डोंगराच्या गालावरची सोनेरी लव होऊन हलणार्‍या गवताचा, हाताने शिवलेल्या गोधडीचा आणि संध्याकाळी तुळशीपाशी लावलेल्या निरांजनाचा असा हा थंडीच्या दिवसांचा खास वास. त्यातच गोव्यात गावागावांतून देवीच्या जत्रा होतात. त्या जत्रांमध्ये गरमागरमखाजं मिळतं. बेसनाच्या कांड्यांना भरपूर आलं घातलेल्या गुळाच्या पाकात बुडवून हे खाजं तयार व्हायचं.
 
त्या खाज्याचा गंध आणि भल्यामोठ्या घमेल्यांमधून कोळशावर तडतडणार्‍या काळ्या चण्यांचा खरपूस वास म्हणजे गोव्यातल्या जत्रा! हळूहळू थंडी ओसरायला लागायची आणि सरत्या थंडीत मग आंब्याच्या झाडांना मोहोर धरायचा. आम्रमंजिर्‍यांना खूप सुंदर आणि मादक असा गंध असतो. त्या गंधाने वेडावून मधमाशा यायच्या. आम्रमंजिर्‍यांचा तो वास आणि मधमाशांचा गुंजारव ऐकता ऐकता होळी कधी यायची, ते कळायचंदेखील नाही. होळीबरोबर उरलीसुरली थंडी पार पळून जायची आणि यायचा तो अंगाची आग आग करणारा उन्हाळा. एरवी कधी गेले नाहीत तरी सर्व गोवेकर उन्हाळ्यात आवर्जून समुद्रावर जातात. समुद्रस्नान केलं की, सांधे दुखत नाहीत, असं म्हणतात. समुद्रकिनार्‍याच्या तो खार्‍या हवेचा आणि सुकायला ठेवलेल्या मासळीचा गंध हा खास गोव्याचा किंवा कोकणाचा गंध आहे. बर्‍याच लोकांना तो आवडत नाही, पण ज्यांची नाकं किनारपट्टीवर तयार झाली आहेत, त्या लोकांना मात्र हा गंध हवाहवासाच वाटतो.
 
 
- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.