अजातशत्रू कर्मयोगी -  डॉ. भीमराव गस्ती

    13-Oct-2017   
Total Views | 1
 

 
 
बेरड, देवदासींसारख्या वंचित, उपेक्षित समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे डॉ. भीमराव गस्ती यांची ऑगस्ट महिन्यात प्राणज्योत मालवली. ‘उत्थान’ या संस्थेच्या माध्यमातून गस्तींनी देवदासींच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि या पीडित महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून दिले. चिंचवडच्या समरसरता साहित्य संमेलनाचे डॉ. गस्ती यांनी अध्यक्षस्थानही भूषविले. त्यांच्या साहित्य कृतींनाही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अशा या थोर सेवाव्रतीच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख... 
 


 
’’संघटनेच्या कामासाठी हैद्राबादला आलो आहे. माझी प्रकृती ठीक आहे. तुम्ही कसे आहात ? - आपला, भीमराव गस्ती.’’ पोस्टकार्डावर लिहिलेल्या अशा दोन ओळींच्या पत्रापासून तशाच पोस्टकार्डाच्या दोन्ही बाजू भरतील एवढा मजकूर असलेली असंख्य पत्रे भीमरावांनी गेल्या पंचवीस वर्षांत मला लिहिली आहेत. त्याच पद्धतीने आपल्या अनेक मित्रांनाही ते न चुकता लिहीत असत. गस्तींच्या पायाला संघटनेच्या कामानिमित्त सतत भिंगरी असे. इतका समर्पित व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता माझ्या पाहण्यात नाही. जानेवारी २०१३ रोजी लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘‘बरेच दिवस झाले, आपल्याला पत्र लिहू शकलो नाही. इकडे कार्याचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे सगळीकडे जावे लागते. देवदासी मुलींची शिक्षणात प्रगती आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे संघटनेकडे जास्त लक्ष देणेे चालले आहे. बाकी ठीक. आपला, भीमराव गस्ती.’’ पाकीट तर सोडाच, पण साधे अंतर्देशीय पत्रही त्यांनी पत्रव्यवहारासाठी वापरल्याचेे आठवत नाही. इतक्या वर्षांतील त्यांच्या असंख्य पत्रांत त्यांनी कधीही स्वतःबद्दल, स्वतःच्या वा कुटुंबाच्या अडीअडचणी वा सुखदुःखाबद्दल लिहिले नाही. त्या पत्रांतून त्यांचा कामासाठी होणारा प्रवास, त्यासाठी करावी लागणारी अर्थउभारणी, करावी लागणारी वणवण, कामकरताना समाजाकडून येणारे कडू-गोड अनुभव, संघटनेसमोरील प्रश्न यांचा त्रोटक उल्लेख असे. त्यात एकप्रकारचा तटस्थपणा असे. आपल्या समाजकार्यात भावनिकदृष्ट्या इतका गुंतलेला माणूस इतक्या तटस्थपणे लिहू शकतो, याचे आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे निराशा येणारे अनुभव येऊनसुद्धा निराश झालेले भीमराव मी कधी पाहिलेच नाहीत. ना पत्रातून, ना प्रत्यक्ष भेटीत!
 

 
त्यांचे शेवटचे पोस्टकार्ड त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी हातात पडले आणि डोळ्यांत पाणी आले. स्वतःबद्दल कधीच काहीही न लिहिणार्‍या भीमरावांनी त्या कार्डाच्या मागील बाजूस जो मजकूर लिहिला होता त्यामुळे मन विषण्ण झाले. ते लिहितात, ‘‘आजपर्यंत संघटनेच्या कामासाठी पैशाची जुळवाजुळव करीत राहिलो. स्वतःचा, स्वतःच्या संसाराचा विचार कधीच केला नाही. स्वतःसाठी कोणाकडे हात पसरावे, असे कधीच मनात आले नाही. आज मात्र प्रकृती बरीच बिघडली आहे. बराच खर्च करावा लागणार आहे. पण मी कोणत्याही संस्थेकडे वा संघटनेकडे आर्थिक मदत मागणार नाही. तुमच्यासारखे मित्र हाच माझा खरा आधार आहे.’’ असे लिहून गस्तींनी प्रथमच आपला वैयक्तिक बँक अकाऊंट, बँकेचे नाव व बँकेचा IFSC  कोड कळवला. पण गस्ती हे इतके निःस्पृह होते, की तशी पैसे पाठविण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर येऊ दिली नाही. पैसे पाठविण्यापूर्वीच हा मित्र या जगातून निघून गेला. डोंगराएवढे असामान्य सामाजिक कार्य करणार्‍या या मित्रावर श्रद्धांजलीपर लेख लिहिण्याची पाळी माझ्यावर आली. गेल्या पंचवीस वर्षांतील सहवासात त्यांचे जे अलौकिक अन् हृद्य मैत्र लाभले त्यावर आधारित हा लेख.
®®®
 
 
उत्तर कर्नाटकातील बेळगावजवळ यमनापूर हे छोटे गाव आहे. आता ते बेळगाव महापालिकेचा भाग बनले आहे. या गावात प्रामुख्याने बेरड रामोशी समाजाची वस्ती आहे. त्या समाजातील एका गरीब कुटुंबात भीमरावांचा जन्म झाला. या समाजाच्या कपाळावर इंग्रजांनी गुन्हेगारीचा शिक्का मारला होता. दिवसातून तीनदा पोलीस ठाण्यावर हजेरी देण्याचे बंधन, कुठेही चोरीमारी झाली तर पुरुष मंडळींना संशयावरून उचलून नेणे, त्यांच्यावर जुलूम-जबरदस्ती करणे, कमालीचे दारिद्य्र आणि अज्ञान यांच्याशी त्यांचे नशीब बांधले गेले होते. त्यामुळे ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ही सर्वसाधारणपणे समाजाची वृत्ती. अशा सर्वार्थाने मागास समाजाचा वारसा भीमरावांना लाभला होता.
 
 
स्वतः अशिक्षित असलेल्या वडिलांचे प्रोत्साहन आणि ईश्वराने भीमरावांना दिलेली अफाट बुद्धीची देणगी यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला नाही. बेळगावातच शालेय शिक्षण झाले. तेथेच राजा लखमगौडा सायन्स इन्स्टिट्यूटमधून ते विशेष प्राविण्यासह बी.एस्सी. झाले. त्यामुळे हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात त्यांना एम.एस्सी.साठी सहज प्रवेश मिळाला. जीवशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यास करतानाच त्यांना ‘इस्कस’ (ISCUS  ) या संस्थेमार्फत उच्च शिक्षणासाठी दरमहा शंभर रुबल्सची शिष्यवृत्ती मिळाली आणि भीमराव दोन वर्षे अध्ययनासाठी मॉस्को येथे राहिले. मॉस्कोत त्याकाळीही विविध ज्ञानशाखांचे प्रगत शिक्षण देणारी ५६ विद्यापीठे होती. त्यातील प्रतिष्ठेच्या लुमुम्बा विद्यापीठात भीमरावांनी संशोधन करीत एम.टेक. ही सन्मानाची पदवी मिळवली. तेथून परतल्यावर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राविण्यासह प्रथमश्रेणीत मिळवली. पुढे त्याच विद्यापीठात संशोधन करून पीएच.डी. पदवीही मिळवली. प्रत्येक टप्प्यांवर सर्वोत्तमयश मिळविल्यामुळे गस्तींना शिष्यवृत्ती मिळत गेली व अखंडपणे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. बेरड रामोशी या अतिमागास समाजात जन्मलेला एक तरुण ‘डॉ. भीमराव गस्ती’ झाला!
 
 
शिक्षणाच्या निमित्ताने भीमराव जसजसे विस्तृत क्षेत्रात वावरू लागले, तसतसे त्यांचे वाचन वाढले, सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण वाढले आणि तसतशी बेरड रामोशी समाजाला भोगाव्या लागणार्‍या अन्यायाची बोच त्यांना तीव्रतेने जाणवू लागली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हैद्राबाद येथील नॅशनल जिऑलॉजिकल सेंटरमध्ये संशोधक सहायक म्हणून प्रतिष्ठेची नोकरी त्यांना मिळाली. पण त्यांच्या मनाला चैन पडत नव्हते. आपल्या समाजाच्या दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होते. दारिद्य्र व अन्यायाने पीडित, अस्थिर, शोषित, अन्याय-अत्याचारग्रस्त असा आपला वंचित समाज. त्याला या खातेर्‍यातून कोणी बाहेर काढायचे? त्याची जबाबदारी आपलीच नाही का? आपली बुद्धिमत्ता व उच्च शिक्षण याचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी, उद्योगासाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी करायचा का? व्यक्तिगत प्रगती एवढेच आपल्या जीवनाचे लक्ष्य असावे का? एक ना अनेक, अशा प्रश्नांनी त्यांचे डोके भणाणून जाई. याच नोकरीच्या काळात त्यांचा हैद्राबाद येथील ‘गीता आश्रमा’शी संबंध आला. त्याच माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय त्यांच्या लेखन व कार्यातून झाला. गस्तींच्या विचाराला वेगळी रचनात्मक दिशा मिळाली. त्यांना आयुष्याचे ध्येय सापडले. समाजावर होणार्‍या अन्यायाविरोधात लढायचे असेल, तर पहिला सैनिक आपणच झालो पाहिजे. ’Leading from the front’ अशी सेनापतीची भूमिका घेऊन सामाजिक चळवळीचे नेतृत्व केले पाहिजे, असा निश्चय त्यांनी मनाशी केला. ज्ञानानंद देणारे संशोधन कार्य व त्यातून मिळणारी प्रतिष्ठा आणि सामाजिक कार्य या द्वंद्वात त्यांनी सामाजिक कार्याला प्राथमिकता दिली आणि सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यानंतर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच मागे वळून पाहिले नाही!
 
 
याच कालखंडात दोन महत्त्वपूर्ण ग्रंथ डॉ. गस्तींच्या वाचनात आले. रॉबर्ट स्वेल यांचा ’The Forgotten Empire’ आणि प्रा. कृष्णस्वामी अय्यंगार यांचा ’The History of Vijayanagar Empire’ हे ते दोन ग्रंथ होत. या ग्रंथांनी गस्तींच्या विचारात व जीवनदृष्टीत आमूलाग्र क्रांती केली. त्यांच्या माध्यमातून बेरड रामोशी समाजाचा विजयनगरच्या साम्राज्यापासून असलेला उज्ज्वल इतिहास त्यांच्यासमोर उलगडला. या समाजाच्या शौर्याचे, पराक्रमाचे खरेखुरे दर्शन त्यांना झाले. आपला समाज ही राज्यकर्ती जमात होती, हे त्यांच्या लक्षात आले. आज तो आपली खरीखुरी ओळख विसरला आहे. त्याने ‘सत्व’ आणि ‘स्वत्व’ दोन्ही गमावले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेला हा बेडर समाज, आज कसा हीनदीन झाला आहे, या जाणीवेने ते खंतावले. त्याची कारणे शोधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
 
 
पेशवाईच्या अस्तानंतर प्रायः सैनिकी पेशात असलेला हा समाज बेकारीच्या खाईत लोटला गेला. कित्तूरची राणी चन्नमा हिने बेरडांच्या वतीने इंग्रजांशी चांगलीच झुंज दिली. पुढे उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली रामोशांचे बंड झाले. क्रांतिवीर वासुदेव बळवंतांची फौज रामोशांचीच होती. १८५७च्या स्वातंत्र्यसमरातही हा समाज त्वेषाने लढला. त्यामुळे या समाजावर ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी वळली. त्यांचे पंख छाटण्याचे कामइंग्रजांनी केले. त्यामुळे देशोधडीला लागलेला हा समाज उपजीविकेसाठी दारू गाळणे, चोरी, दरोडेखोरी या मार्गाकडे वळला. या जमातीचा बंदोबस्त करण्यासाठी १८७०चा गुन्हेगारी कायदा संमत करून या समाजावर अनेकानेक निर्बंध लादले. तेथून या समाजाचे अधःपतन सुरू झाले. अत्यंत उज्ज्वल भूतकाळ आणि लाजिरवाणा वर्तमानकाळ दोन्ही गस्तींच्या डोळ्यांसमोर आले आणि या समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झगडण्याचा, लढण्याचा विडा गस्तींनी उचलला. त्याची संधीही त्यांच्यासमोर चालून आली.
 

 
१९६६ साली इंडाल कंपनीने बेळगाव औद्योगिक परिसरात आपला कारखाना उभा करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या सात-आठ खेड्यांतून सुमारे १६०० एकर जमीन संपादित व हस्तांतरित केली. त्यात बेरड रामोशी समाजासह अनेक जातीधर्मांतील शेतकर्‍यांच्या जमिनींचा समावेश होता. अज्ञानामुळे अनेकांच्या जमिनींची कागदपत्रेही त्यांच्याजवळ नव्हती. याचा फायदा घेऊन कंपनीने अल्प मोबदला देऊन या जमिनी हस्तांतरित केल्या. रोजीरोटीचे एकमेव साधन गेल्यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली. समाज असंघटित, त्यामुळे या अन्यायाविरोधात कोणीच आवाज उठवत नव्हते. गस्तींनी हा प्रश्न आव्हान समजून हाती घेतला. ते उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना समाजात स्थान होते. त्यांच्या निःस्वार्थ व पारदर्शक व्यवहारामुळे त्यांच्याबद्दल समाजात विश्वास होता. त्यामुळे लोकांना संघटित करणे त्यांना सोपे गेले. शिवाय त्यांच्या तोंडात साखर होती आणि डोक्यावर बर्फ होता. गस्तींनी या सर्व लोकांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव करून दिली. त्यांचा स्वाभिमान जागा केला. संघटित प्रकल्पग्रस्तांचे एक शिष्टमंडळ घेऊन गस्ती इंडालच्या व्यवस्थापकांना अनेकदा भेटले. अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी इंडालच्या व्यवस्थापकांना ते करीत असलेल्या अन्यायाची स्पष्ट शब्दांत जाणीव करून दिली. या वाटाघाटी चालू असताना हजारो प्रकल्पग्रस्त शांतपणे धरणे धरून बसले होते. या संघटित शक्तीचा चांगला परिणामझाला. गस्तींनी जिल्हाधिकार्‍यांनाही हे निवेदन सादर करून शासनालाही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे केले. या आंदोलनात गस्तींनी प्रामुख्याने चार मागण्या केल्या होत्या. १)जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा. २) घरटी एका व्यक्तीला इंडाल कंपनीत नोकरी दिली जावी. ३) बेघरांचे पुनर्वसन व्हावे. ४) परिसर प्रदूषणमुक्त व्हावा. शांततापूर्ण आंदोलने, संघटित शक्ती आणि गस्ती यांचे सुशिक्षित, संयमी परंतु ठामनेतृत्व यामुळे या सर्व मागण्या मान्य झाल्या. गस्तींनी उभ्या केलेल्या पहिल्याच चळवळीला अपूर्व यश मिळाले. गस्तींचा आत्मविश्वास दुणावला व त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही!
 
 
त्यानंतर त्यांनी उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम आंध्र या प्रदेशांत प्रामुख्याने राहणार्‍या बेरड रामोशी समाजाचे प्रश्न हाती घेतले. त्यासाठी या प्रदेशात विस्तृत प्रवास केला. आपल्या समाजबांधवांच्या भेटी घेतल्या. त्यांना आपल्या समाजाच्या दुःखाची व वेदनेची तीव्रता समजली. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची धग लक्षात आली. अज्ञान व दारिद्य्र तर त्यांच्या पाचवीलाच पुजले होते. कोठेही चोरी झाली, दरोडा पडला, तरी पोलीस रामोशींनाच उचलून नेत. त्यांना मारहाण करीत. त्यांचा अमानुष छळ करीत. त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले. हे भीषण वास्तव गस्तींनी स्वतः पाहिले व प्रत्यक्ष अनुभवले. आपल्या समाजबांधवांचे प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत, असे त्यांनी मनोमन ठरविले. ठिकठिकाणी मेळावे घेऊन त्यांना संघटित करण्यास व त्यांचे प्रश्न समजावून घेण्यास गस्तींनी सुरुवात केली. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची त्यांना त्यांच्याच भाषेत जाणीव करून दिली. त्याविरोधात लढण्याची त्यांना प्रेरणा दिली. मेळाव्यातून संघटनेची व आंदोलनाची पथ्ये व नियमही सांगितले. एका मन्वंतराची सुरुवात झाली. अर्थात, हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता, पण गस्तींचे नेतृत्व खंदे आणि कणखर होते.
 
 
या आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी अनेक मोर्चे काढले. तेही शांततापूर्ण. आरडाओरडा नाही, दगडफेक नाही, घोषणाबाजी नाही. कुठलाही आक्रस्ताळेपणा वा आक्रमकता नाही, असे हजारोंचे मोर्चे गस्तींनी जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य सचिवालयावर काढले. वस्तुनिष्ठ आकडेवारी व अन्यायाची वास्तवदर्शी ठळक उदाहरणे यांचा समावेश असलेली निवेदने जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधानांना सादर केली. अशा प्रकारे संयमाने मोर्चे निघणे, हा या मंडळींसाठी नवा अनुभव होता. गस्तींनी अर्ज, विनंत्या, धरणे, मेळावे, मोर्चे, आंदोलने असे सर्व मार्ग चोखाळून आपल्या समाजाला आत्मविश्वास दिला. त्यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या मागण्या न्याय्य होत्या. त्या अशा- १) पोलिसी अत्याचारापासून मुक्तता २) या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा ३) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण मिळावे ४) कौशल्य विकासाच्या संधी व पुनर्वसन. गस्तींनी अथक प्रयत्न केल्यानंतर या समाजाच्या जीवनावश्यक मागण्या कर्नाटक सरकारने मान्य केल्या. या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला व त्याचे अनुषंगिक लाभही त्यांना मिळू लागले. या संघटित प्रयत्नांमुळे रामोशी समाजाच्या जीवनात आमूलाग्र क्रांती झाली. एखादी चळवळ शांततामय मार्गाने परंतु निश्चयपूर्वक चालवली, तर यश मिळते याचा वस्तुपाठ गस्तींनी या चळवळीमार्फत घालून दिला.
 
 
यासाठी आंदोलनाबरोबरच जनजागरणाचे कार्यही गस्तींनी केले. मराठी व कानडी नियतकालिकांतून त्यांनी या प्रश्नांवर सात्यत्याने व भरपूर लेखन केले. त्यामुळे या समाजावर होणारे पोलिसी अत्याचार जवळजवळ थांबले. या आंदोलनाच्या माध्यमांतून व त्यातील अनुभवांतून संघटना कशी बांधावी, जनसंपर्क कसा करावा, लोकांचे प्रश्न कसे समजावून घ्यावेत, त्यांचा अभ्यास कसा करावा, शांततापूर्ण मार्गाने जनआंदोलन कसे करावे, नकारात्मक अनुभव येऊनही दृष्टी सकारात्मक कशी ठेवावी, निवेदने कशी तयार व सादर करावीत, वाटाघाटी कशा कराव्यात, याचा आदर्श गस्तींनी उभा केलेला दिसतो. हे सर्व यश गस्तींना मिळाले यामागे पडद्याआड उभे राहून रा. स्व. संघाचे विचारवंत कार्यकर्ते ‘स्वरूपवर्धिनी’ व ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संचालक व एक आधारस्तंभ मा. यशवंतराव लेले यांचा फार मोठा व महत्त्वाचा वाटा आहे. हे खुद्द गस्तींनी अनेकदा मनमोकळेपणाने मान्य केले. किंबहुना, कार्यकर्ता म्हणून आपली जी जडणघडण झाली, जो विकास झाला त्याचे खरे श्रेय लेलेजींना आहे, अशी कबुली गस्ती मोठ्या मनाने देतात. डॉ. गस्ती म्हणतात, ’’लेले सरांनी सामाजिक कार्याची जी दृष्टी मला दिली, त्यामुळे चळवळीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलून गेला. यशवंतराव अत्यंत कडक व शिस्तबद्ध गृहस्थ. त्यांच्या सहवासात सामाजिक कार्यासंबंधी माझ्या कल्पना स्पष्ट आणि स्वच्छ होत गेल्या. सरकारी मदतीशिवाय व लोकसहभागातून जीवनाचा विकास करण्याचे महत्त्व मला स्पष्ट झाले.’’ या गुरूशिष्यांच्या आंतरिक नात्यांचा मागोवा घेणे, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. लेले स्वत गस्तींचा उल्लेख ‘शाखेत न जाणारा, पण संघ जगणारा स्वयंसेवक’ असा करीत. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवासात गस्तींना जशी बेरड रामोशी समाजाच्या प्रश्नांची तीव्रता लक्षात आली, तसेच देवदासींचे प्रश्न, त्यातील अमानुषता, अगतिकता यांचे विदारक दर्शन त्यांना घडले. दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेल्या व आपले अस्तित्वच हरवून बसलेल्या देवदासींचे प्रश्न मार्गी लावायचे, असे त्यांनी ठरवले. हा काळ १९९० नंतरचा. देवदासींचा प्रश्न हा समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा व अंधश्रद्धांचा परिपाक होता. दुर्दैवाने त्याला धर्माचा कथित आधार असल्यामुळे त्याचा पगडा काही वंचित समाजघटकांवर मोठ्या प्रमाणात होता. आपल्या घरात जन्माला आलेली एक मुलगी सेवेसाठी यल्लमा देवीला वाहायची, असे या प्रथेचे स्वरूप होते. ती देवाच्या सेवेसाठी सोडली असल्यामुळे ती देवदासी. एकदा देवदासी झाली की, तिच्या जबाबदारीतून तिचे पालक मुक्त होत. तिच्याकडे वळून पाहण्याची वा तिच्या भवितव्याचा विचार करण्याची त्यांना गरज वाटत नसे. देवाला वाहिलेल्या या मुलींचे पुढे काय होते, याची चिंता त्यांचे कुटुंबीयच करत नसतील तर समाज कशाला करील? देवाचे पुजारी व समाजातील धनदांडगे या देवदासींचे रूपांतर आपल्या भोगदासींत करीत. तेथून त्यांच्या वनवासाला सुरुवात होई. पुरुष वासनेची शिकार झालेल्या देवदासी बापाचा पत्ता नसलेल्या अपत्यांच्या माता होत व त्यांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडे. यातून सुरू झालेल्या दुष्टचक्रातून केवळ मृत्यूच त्यांची सुटका करीत असे. अशा या अमानुष प्रथांविरोधात गस्तींनी आपला पुढील लढा केंद्रित केला.
 

 
देवदासींचा प्रश्न जटील आणि गुंतागुंतीचा आहे. ती समाजाच्या कार्यात धर्मभावनेशी व त्याबरोबर येणार्‍या मानसिकतेशी जोडलेला आहे, त्यामुळे धर्मजागृती करून देवदासींचा विषय हा धर्माशी वा देवाच्या सेवेशी जोडलेला आहे, या भ्रामक कल्पनेतून समाजाला मुक्त करणे, हे या प्रश्नाबाबतचे पहिले आव्हान आहे. ही प्रथा बंद झाली, तरच हा प्रश्न समूळ नाहीसा होऊ शकणार आहे. या प्रथेचे भक्ष्य झालेल्या तरुण स्त्रियांचे प्रश्न धार्मिक, सामाजिक व आर्थिक आहेत. त्यांनी देवदासीपण नाकारल्यास त्यांच्या उपजीविकेचे काय? त्यांची जबाबदारी कोण घेणार? त्यांचे शिक्षण कसे होणार? त्यांच्या अनौरस अपत्यांचे भविष्य काय? त्यांना समाजात माणूसपणाचे स्थान मिळणार का? त्यांना लग्न करून जीवनात स्थिरस्थावर होता येईल का? त्यांचे पुनर्वसन कसे होणार? असे या मूळ प्रश्नाचे अनेक आयाम आहेत.
 
 
समाजप्रबोधन हेे कोणताही सामाजिक प्रश्न सोडविण्याचा पहिला टप्पा असतो. त्याचबरोबर या स्त्रियांना त्यांची दुरावलेली ओळख व आत्मविश्र्वास परत मिळवून देणे हा त्या प्रक्रियेतला दुसरा टप्पा आहे. त्यासाठी त्यांचे संघटन करावे लागेल. त्यांना रोजगार मिळवून द्यावा लागेल. छोट्यामोठ्या व्यवसायांचे प्रशिक्षण द्यावे लागेल. कौशल्य विकासाचे प्रकल्प राबवावे लागतील. या स्त्रिया स्वावलंबी झाल्या तरच त्यांचे पुनर्वसन करता येईल. त्यांच्या अनौरस अपत्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल. ही प्रथा बंद झाली, तर ज्यांचे हितसंबंध दुखावले जातील अशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. या प्रश्नाचे असे अनेक कंगोरे गस्तींच्या लक्षात आले व हा गुंता सोडविण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले.
 
 
खुद्द गस्तींच्या घरातच देवदासींचा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यांची स्वतःची बहीण व त्यांच्या पत्नीची बहीण या देवदासी होत्या. गस्तींनी प्रथमदेवदासींना संघटित केले. यल्लमा देवीच्या यात्रेत जाऊन समाजप्रबोधन करायला सुरुवात केली. ही प्रथा कायद्याने बंद व्हावी म्हणून सरकार दरबारी अर्ज विनंत्या, मोर्चे, धरणे अशा सर्व आयुधांचा वापर केला. येथून तरी पुढे देवदासींच्या संख्येत वाढ होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न होता. अथक परिश्रमानंतर कर्नाटक सरकारला देवदासी प्रथेविरुद्ध कायदा करण्यास गस्तींनी भाग पाडले. आंदोलनाचा एक टप्पा पार पडला. कायद्याचे कोठेही उल्लंघन न करता शांततामय मार्गाने हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
 
 
देवदासींचे पुनर्वसन करणे म्हणजे त्यांना स्थैर्य देणे. त्यासाठी त्यांना घरे बांधून देणे. यासाठी शासनाच्या मागासवर्गीयांसाठी अनेक योजना आहेत. त्यांचा पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला. पोट भरण्यासाठी व्यवसाय हवा. त्यातून शेती, शिवणकाम यांच्या प्रशिक्षणाची योजना करण्यात आली. गस्ती यांच्या उत्थान केंद्रात ५० महिलांचा गट व ६ महिन्यांचे प्रशिक्षण या गतीने ४ हजार देवदासींचे प्रशिक्षण झाले. मुत्थानहाटी, बिक्कलदिनी, बिळणी, कार्वे या ठिकाणीही प्रशिक्षण केंद्रे उभारली. त्यातून शेकडो देवदासींना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. तसेच म्हैसपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसाय यांचे प्रशिक्षण दिले. देवदासींच्या मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे व शाळा काढून त्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करून दिले. देवदासी तरुणींना कार्यकर्ता शिबिरात प्रशिक्षण दिले. याची जबाबदारी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने उचलली. डॉ. हेडगेवार स्मारक सेवा समितीने ६ महिला कार्यकर्त्यांचे मासिक मानधन निरपेक्ष भावनेने देऊ केले आहे. त्यामुळे ही चळवळ स्वावलंबी, स्वतंत्र व स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली. संघर्ष आणि रचना या माध्यमातून सुमारे दहा हजार देवदासींचे पुनर्वसन करण्यात गस्ती यांच्या ‘उत्थान’ या संस्थेला यश लाभले आहे. हे कामलहानसहान नक्कीच नाही.
 
 
बेरड रामोशी समाजाच्या उत्थानासाठी गस्तींची चळवळ सुरू असतानाच ते समाजवादी चळवळीतील नेत्यांच्या संपर्कात आले. विशेषत: एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव यांच्याशी गस्तींची जवळीक निर्माण झाली. चळवळीतील कार्यकर्ते असल्याने हमाल पंचायतीच्या अनेक बैठकांना गस्ती उपास्थित राहिले. आपल्या चळवळीबद्दल गस्तींनी ’साधना’ साप्ताहिकात लेखनही केले. गस्तींना काही काळ समाजवाद्यांच्या सामाजिक कृतज्ञता निधीतून मासिक मानधनही मिळत असे. याच काळात गस्तींनी समाजवाद्यांनी चालविलेल्या चळवळी जवळून पाहिल्या. १९८० च्या दरम्यान बाबा आढाव बेळगावी आले होते. त्यांनी गस्तींच्या चळवळीतील एका मोर्चाचे नेतृत्वही केले होते. गस्तींच्या अनेक प्रकल्पांना भेटी देऊन व्याख्यानेही दिली.
 
 
याच काळात गस्तींना रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अन् ‘ज्ञानप्रबोधिनी’ व ‘स्वरूपवर्धिनी’ यांचे संचालक यशवंतराव लेले तसेच ‘ग्रामायन’ चळवळीचे गिरीश प्रभुणे यांच्याशीही परिचय झाला व पुढे गाढ मैत्रीही झाली. या दोघांना घेऊन गस्ती एकदा हमाल पंचायतीच्या एका बैठकीला गेले होते. प्रभुणे आणि लेले दोघेही पुण्याचे व रा. स्व. संघाशी संबंधित. त्यांना पाहून बाबा आढावांचे पित्त खवळले. गस्ती हे संघांच्या संपर्कात आहेत. संघाच्या जवळ जात आहेत, हे त्यांच्या पचनी पडले नाही. त्यांनी गस्तींना अक्षरशः फैलावर घेतले. पुढे गस्तींच्या चळवळीतील अनेक केंद्रांवर समाजवाद्यांनी हल्ले केले व या चळवळीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. गस्तींना दिले जाणारे मानधन रद्द केले. समाजबांधवांना संघविचाराच्या काविळीने किती पछाडले आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. गस्तींना आलेले अनुभव त्यांच्याशी सुसंगतच आहेत.
 
 
समाजवाद्यांच्या दीर्घकाळ सहवासात राहिल्यानंतर गस्तींच्या हे लक्षात आले की, समाजवादी चळवळी पुढार्‍यांभोवती फिरत राहतात. चळवळीपेक्षा पुढार्‍यांनाच जास्त प्रसिद्धी मिळते. त्यांच्या बहुतांश चळवळी हे कागदी वाघ असतात आणि प्रत्यक्ष कामापेक्षा कामाच्या प्रसिद्धीवर त्यांचा भर अधिक असतो. ‘शिल्पापेक्षा शिल्पकारालाच महत्त्व आले, तर दुसरे काय होणार? ’असे गस्तींचे याबाबतचे निरीक्षण आहे. त्यांच्या चळवळींचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर गस्ती अशा निष्कर्षापर्यंत आले की, ’’जमिनीवर पाय ठेवून उभ्या केलेल्या प्रत्यक्ष कामापेक्षा भाषणे, चर्चा व पुढारीपण यांना जास्त महत्त्व दिल्याने खर्‍या अर्थाने चळवळी उभ्या राहात नाहीत. त्या तुलनेत ‘ज्ञानप्रबोधिनी’चे प्रत्यक्ष कार्य, यशवंतराव लेले यांनी दिलेली जीवनदृष्टी व कार्यप्रेरणा तसेच रा. स्व. संघाचे डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधीच्या माध्यमातून दिलेला सक्रीय व भक्कम पाठिंबा अधिक महत्त्वाचा ठरतो. कार्यकर्ते अशा निःस्वार्थी भावनेतून उभे राहिले, तरच चळवळी यशस्वी होतील.’’
 
 
२००६ साली चिंचवड येथे झालेल्या आठव्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गस्ती होते. आपल्या विचारप्रवर्तक अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींच्या सद्यःस्थिती संदर्भात जे परखड भाष्य केले, ते सर्वांनाच अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणाले, ‘‘वस्तुतः महाराष्ट्र ही समाज सुधाराच्या चळवळींची जन्मभूमी आहे. तरीही आज मात्र महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींची दुरवस्था पाहून मन विषण्ण होते. शब्दबंबाळपणा, सत्तेची लालसा, स्वार्थमूलक प्रेरणा यांची लागण झाल्यानेच चळवळीची धग थंडावली आहे. या चळवळी गटातटात विभागल्या गेल्या. किंचितशा श्रेयाचेही वाटेकरी होण्याची स्पर्धा, कमालीचा व्यक्तिवाद यांच्या आहारी जाऊन तथाकथित पुढार्‍यांनी या चळवळी पक्षीय राजकारणाच्या दावणीला बांधल्या. त्यामुळे त्या अधिकच संकुचित होत गेल्या. बेरजेऐवजी वजाबाकीला महत्त्व आले. त्यातूनच विद्वेषाची बिजे पेरली जात असतात.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘समस्यांची सोडवणूक हे मुख्य उद्दिष्ट न राहता चळवळीवरची ठेकेदारी अबाधित ठेवणे यावरच नेत्यांचे लक्ष केंद्रित होऊ लागले. अन्य कुणी आपल्या परीने प्रश्न सोडविण्याचा केलेला प्रयत्नही सहन होईनासा झाला. पुढार्‍यांच्या या कोतेपणामुळे चळवळी व्यापक होण्याऐवजी संकुचित होत गेल्या. कप्पेबंदपणा व प्रतिक्रियावाद यांचा प्रभाव वाढला. श्रेयात वाटेकरी नको, लाभात वाटेकरी नको याची धडपड सुरू झाली आणि चळवळीचा मूळ हेतूच बाजूला फेकला गेला. उन्नयनाच्या उर्ध्वगामी प्रेरणा क्षीण होऊन अधोगतीतून कलह उत्पन्न होण्याची स्थिती सामाजिक चळवळींना प्राप्त झाली. यावर वेगळे ते भाष्य काय करणार?
®®®
 

 
डॉ. भीमराव गस्ती हे कर्ते समाजसुधारक व सामाजिक चळवळींचे जनक होते, तसेच ते मराठीतील श्रेष्ठ लेखकही होते. त्यांनी मोजकेच साहित्य लिहिले, परंतु ते इतके कसदार व दर्जेदार होते की, त्यांच्या वाड्.मयीन कलाकृतींना साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार लाभले. त्यातूनच त्यांच्या साहित्याची वाड्.मयीन महत्तता अधोरेखित होते. सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे सूक्ष्मअवलोकन हे त्यांच्या वाड्.मयीन व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. मनाने अतिशय संवेदनशील असणार्‍या गस्तींना सामाजिक समस्येची तीव्रता उत्कटतेने जाणवत होती. एकेकाळी अत्यंत शूर अशी राज्यकर्ती जमात म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेरड रामोशी समाजात त्यांचा जन्मझाला होता. मात्र, आजची या समाजाची अवस्था दयनीय व अलक्षित अशीच आहे. शिक्षणाचा अभाव, अठरा विश्वे दारिद्य्र, हातावरचे पोट, सततची भटकंती व अस्थैर्य, सामाजिक रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यांचे वर्चस्व, असा हा समाज. अशा अनुकंपनीय अवस्थेत जगणार्‍या बेरड रामोशी समाजात जन्मलेल्या भीमरावांनी आपल्या समाजाचे दुःख, दैन्य, अज्ञान तसेच त्यांना येेणारे व्यामिश्र अनुभव, त्यांचे वास्तववादी चित्रण ‘बेरड’ या कादंबरीत केले आहे. अनलंकृत भाषा व ओघवत्या शैलीतील सहजसुंदर मांडणी, हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. कोणताही विखार मनात न ठेवता वा आक्रस्ताळेपणा न करता आपल्या समाजाचे व आपले यथातथ्य, परंतु हृदयस्पर्शी चित्रण गस्तींनी या कादंबरीत केले आहे. त्यामुळे वाचकांच्या मनाला ते भिडतेे आणि एका दुर्लक्षित समाजाच्या व्यथा व वेदनांचे चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. ते वाचताना शंकरराव खरात यांच्या ‘तराळ-अंतराळ’ व दया पवार यांच्या ‘बलुतं’ या नितळ, पारदर्शी परंतु भेदक आत्मचरित्रांची आठवण होते.
 

 
पुढे गस्तींनी ‘आक्रोश’ व ‘सांजवारा’ या कादंबर्‍या लिहून आपल्या व आपल्या समाजाच्या कादंबरीमय आत्मचरित्राच्या त्रिधारा पूर्ण केल्या. त्यांच्या या कादंबर्‍यांची पुढे अनेक भाषांतून भाषांतरेही झाली. इतक्या धावपळीच्या व व्यस्त जीवनात गस्तींनी लेखनासाठी वेळ कसा काढला, हे आश्चर्य आहे. त्यांच्या साहित्यात त्यांनी कलेपेक्षा जीवनाला अधिक महत्त्व दिलेले दिसते. तात्त्विक काथ्याकुटापेक्षा किंवा चर्चेपेक्षा अनुभवातून आलेला शहाणपणा व परिस्थितीची तीव्र जाणीव त्यांच्या लेखनांत प्रतिबिंबित झालेली दिसते. या तिन्ही कादंबर्‍यांतून एका वंचित समाजाच्या जीवनसंघर्षाचे चलतचित्र त्यांनी रेखाटले आहे. त्यामुळे त्यांच्या या लेखनाला व्यापक सामाजिक आशय लाभला आहे. स्वांतसुखाय किंवा आत्मानंदासाठी लेखन असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप नाही, तर काही स्पष्ट हेतू मनात ठेवून व सामाजिक भान जागे ठेवून गस्तींनी हे लेखन केलेले दिसते.
 
 
डॉ. गस्ती यांनी लिहिलेल्या ‘कौरव’ आणि ‘अहिल्या’ या त्यांच्या वाड्.मयीन कलाकृती अद्याप अप्रकाशित आहेत. त्यांचे बरेचसे स्फूट लेखन अद्याप असंग्रहित आहे. त्यांचे हे सर्व अक्षर वाड्.मय प्रकाशित होणे, ही काळाची गरज आहे. त्यांनी बेरड रामोशी समाजात व देवदासींमध्ये जे उत्थानाचे सामाजिक कार्य उभे केले आहे, ते त्यांच्या पश्चात अधिक जोमाने व समर्थपणे चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. दुसर्‍या बाजूला त्यांचे सर्व विचारधन व वाड्.मय पुढील पिढ्यांसाठी प्रकाशात आणणे हे आपले उत्तरदायित्व आहे. ते आस्थेवाईकपणे पार पाडणे हीच डॉ. भीमराव गस्तींना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.
 
- प्रा. श्याम अत्रे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121