पिक्चर बघा, ‘ती’ तुम्हाला नक्की भेटेल...

    07-Jan-2017
Total Views |

 

बालपणीचं, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासूनच प्रेम! फार कमी लोकांच्या नशिबी हे प्रेम असतं विशेष म्हणेज हेच प्रेम कॉलेजमध्ये गेल्यावरही तुमच्या सोबत असणं याला तर जास्तच नशिबवान असायला लागतं. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातल्या तन्वी आणि अनुरागच्या नशिबी या दोन्ही काळातलं प्रेम असतं खरं पण पुढे काही कारणांमुळे ते दुरावले जातात. कालांतराने दोघांचेही लग्न होते, आपापल्या संसारात ते रमतात, दोघांनाही मुलं होतात आणि अचानक काही वर्षांनी पुन्हा दोघं एकमेकांना भेटतात. पण पुन्हा भेटल्यानंतर त्यांचं नातं कोणत्या वळणावर जातं आणि मुख्य म्हणजे दोघांच्या संसाराचं काय होतं याबाबतची उत्सुकता म्हणजे ‘ती सध्या काय करते’ ही आहे...

 

 

सतीश राजवाडेने हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. एकंदरीतच प्रेम-रोमॅन्स आणि सस्पेंन्स या विषयांमध्ये त्याचा हातखंड आहे. त्याच्या मालिकांना प्रचंड यश मिळालयं, ‘मुंबई-पुणे-मुंबई’हा चित्रपटही लोकप्रिय ठरला पण त्याचा दुसरा भाग मात्र म्हणावा तितका चालला नाही. या चित्रपटानंतर काही काळ ब्रेक घेऊन सतीश पुन्हा एका ‘ती सध्या काय करते’च्या रूपाने एक कोरी करकरीत लव्हस्टोरी घेऊन आपल्या समोर आलाय. यावेळी त्याने पठडीतल्या जोड्यांना बाजूला ठेवून नवीन केमिस्ट्री जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि संगीत क्षेत्रात अग्रगण्य असणारी आर्या आंबेकर या चित्रपटातून प्रथमच पदार्पण करीत आहेत. ह्रदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री हे बालकलाकारही आपल्याला यातून दिसतात आणि मोठेपणची तन्वी व अनुराग साकारलाय तेजश्री प्रधान व अंकुश चौधरी यांनी.

खरतर ‘शाळा’ किंवा ‘टाईमपास’ सारख्या चित्रपटांचा आपल्यावर अजून इतका प्रभाव आहे की, आता परत शालेय जीवनातील प्रेमकहाणी नव्याने बघण्याची इच्छा होत नाही. पण वर वर जरी ‘ती सध्या काय करते’ असा वाटत असला तरी यातील शालेय जीवनातील प्रेम मर्यादित काळापुरतेच आहे. यामध्ये अभिनयाला सगळ्यात जास्त वाव आहे तो आर्या व अभिनयला. एकाच शाळेत शिकणारे आणि एकाच सोसायटीमध्ये राहणार्‍या तन्वी व अनुरागची ही प्रेमकथा. ही प्रेमकथा तशी फारशी वेगळी नाहीये, पण ज्या प्रश्‍नाभोवती हा चित्रपट फिरतो तो प्रश्‍न मात्र वेगळा आहे. म्हणजे तो प्रश्‍न आपल्यापैकी अनेकांना अनेकवेळा पडतही असेल पण या प्रश्‍नाला अनुसरून एक चित्रपट निर्माण करण्याचे धाडस सतीशने केले, यासाठी त्याचे कौतुक करायला हवे.

नुसतं हा प्रश्‍न मांडून तो थांबला नाही तर त्याने त्याच्या परीने या प्रश्‍नाचे उत्तरही शोधले आणि क्लायमॅक्सला दाखविण्यात आलेले या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजेच या चित्रपटाचे खरे यश आहे, असे म्हणावे लागेल. आता ते उत्तर देखील व्यक्तीसापेक्ष आहे. काहींना ते पटणार नाही तर काहींना पटेल पण दिग्दर्शकाला जे वाटलं ते त्यानी दाखवलं. यातून आपण काय उत्तर घ्यायचं हा आपला वैयक्तिक प्रश्‍न आहे. बर्‍याचदा आपलं पहिलं प्रेम कायमस्वरूपी आपल्या सोबत नसतं. त्याची अनेक कारणं असू शकतात. पण आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करत होतो किमान ते त्या व्यक्तिपर्यंत पोहचण तितकच गरजेचं असतं. अशाच अव्यक्त न झालेल्या पहिल्या प्रेमावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्याचबरोबर जुन्या आठवणींनाही उजाळा देण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो.

अभिनयात ह्रदित्य आणि निर्मोहीने बाजी मारली आहे. या दोघांचा तसा चित्रपटात वावर फार कमी आहे, पण त्यातही त्यांनी उठावदार काम केलयं. अभिनय बेर्डेनी चांगला अभिनय केलाय खरा पण त्याच्याकडून आणखी जास्त अपेक्षा असल्याने तो कुठेतरी कमी पडत असल्याचे सारख भासत राहते. आर्याला खरोखरच अभिनयात करिअर करायचं असेल तर तिने अधिक कष्ट घ्यायला हवेत. कारण या चित्रपटात तिने केलेला अभिनय फारच वरवरचा असल्याचे दिसून येते. यासगळ्यांमध्ये खरी जादू अंकुशने आपल्या निवेदनातून केली आहे. संपूर्ण चित्रपटातील त्याचे निवेदन ही एक मोठी जमेची बाजू आहे. बाकी अंकुश आणि तेजस्वीच्या अभिनयात त्रुटी काढण्यासारखे काही नाहीये. त्यांना संजय मोने, सुकन्या कुलकर्णी मोने व उर्मिला कानिटकरने चांगल्या प्रकारे साथ दिली आहे.

प्रेम हा सतीशचा आवडतीचा विषय असल्याने दिग्दर्शनात तो उजवाच ठरलाय. पण मध्यंतरापर्यंतची पटकथा थोडीशी संथ वाटते, मनस्विनी लता रविंद्रने यावर आणखी थोडं काम केलं असतं तर चित्रपटाकदाचित आणखी यशस्वी झाला असता. ‘ह्रदयात वाजे समथिंग’ हे एकच गाणं मोठ्या पडद्यावर ऐकायला व पाहायला छान वाटतं. बाकीची गाणी कथेमध्ये कुठेतरी व्यत्यय निर्माण करतात. यातील आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे, लहानपणीचं प्रेम दाखविताना दिग्दर्शक ‘मैने प्यार किया’ चित्रपटाचे दाखले देतो. याचाच अर्थ तो काळ नव्वदच्या दशकातला आहे. तर मग पडद्यावर दिसणार्‍या गोष्टीही त्या काळाला साजेशाच हव्या होत्या. पण त्या तशा दिसत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर आत्ता आत्ता सुरु झालेली सिहंगड रोडवरची न्यू पुना बेकरी नव्वच्या दशकात दाखवल्यावर कसं चालणार. कारण जुना काळ पडद्यावर दाखविताना किमान रेफरन्स लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी सोडल्या तर चित्रपट उत्तम बनला आहे. पण तो परफेक्ट लव्हस्टोरी नाही हे देखील तितकच खरयं.

तुमच्या आयुष्यात कोणी ‘ती/तो’ असेल आणि पुन्हा एकदा ‘तिच्या/त्याच्या’ आठवणींमध्ये रममाण व्हायचं असेल त्याचबरोबर या प्रश्‍नाबाबत सतीशला सापडलेलं उत्तर तुम्हालाही आपल्या आयुष्यात अनुभवायचं असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा... तिला भेटून, तिची आठवण काढून खूप दिवस/महिने/वर्ष झाले असले तरी हा चित्रपट बघितल्यावर आठवणींच्या रूपाने का होईना ती तुम्हाला नक्की भेटेल!!!
----