सांस्कृतिक शहरातील विकृती..

    06-Jan-2017   
Total Views |


एखाद्या सांस्कृतिक शहरात राहून त्याविषयीचा अभिमान बाळगणे म्हणजे नेमके काय असते? याच नेमकं उदाहरण म्हणजे पुणेकर.. लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, पंडित भीमसेन जोशीं यासह विविध क्षेत्रातील कुशल व निपुण मंडळी पुण्याने देशाला दिली आहेत. येथे प्रत्येक क्षेत्र संस्कृतीच्या रुपात रुजले गेले आहे. त्यामुळेच पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणले जाते.  

शिक्षणाच्या विविध संस्था व त्याला पोषक वातावरण इथे रुजल्यामुळे एक अनोखी शैक्षणिक संस्कृती पुण्याने रुजविली आहे म्हणूनच याला विद्येचे माहेरघर असे देखील संबोधिले जाते. तर जागतिक पातळीवर 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' म्हणून हे शहर नावाजलेले  आहे. येथील शिक्षण संस्कृती, उत्सव संस्कृती, खाद्य संस्कृती, साहित्य संस्कृती, नाट्य तथा विविध कला संस्कृती या सर्वांचा पगडा संपूर्ण महाराष्ट्रासह देशावर किमान गेल्या ३ शतकांपासून आहे. दिवसेंदिवस यात भरच पडत आहे. ऑटोमोबाईल व नंतरच्या काळातील माहिती आणि तंत्रद्यान उद्योगांमुळे येथे नवीन औद्योगिक संस्कृती देखील रुजलेलीआहे. परंतु एक प्रश्न नेहमी मनात येतो की, सांस्कृतिक शहरातील प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत असेल का ? या सर्व सांस्कृतिक वारश्याबद्दल तेथील प्रत्येकाला अभिमान असेल का ? किंबहुना तो असण्याची अपेक्षा धरावी का? हे सर्व प्रश्न आजच मनात येण्याचे कारण म्हणजे नुकताच पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याची घटना.

पुतळा हटवण्यामागची विकृत मनोभूमिका

महाराष्ट्रभर माहित असलेल्या संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटना छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांना आपली जातीय मक्तेदारी मानतात. याविषयी यांच्याशिवाय इतर कोणी बोलणे, लिहिणे म्हणजे एक अलिखित आणि अक्षम्य गुन्हा आहे. त्यातही लिहिणारा एका विशिष्ट जातीचा असेल तर यांच्यातला बाणा जागृत होतो आणि त्याची पार धिंड काढेपर्यंत या मंडळींची मजल जाते.  मात्र तीच बाब इतरांविषयी घडल्यास सोयीस्कररीत्या विषयाला बगल दिली जाते.

संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यास' या नाटकाच्या लिखाणात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अक्षेपार्ह लिखाण केले आहे. म्हणून हे कृत्य करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. परंतु हाच जर मुद्दा असेल तर ज्या नाटकाचे लिखाण १९१७ साली झाले त्यावर काहूर २०१७ साली, म्हणजेच तब्बल १०० वर्षानंतर का? राम गणेश गडकरी हे मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ साहित्यिक मानले जातात. परंतु केवळ एका विशिष्ट जातीत जन्मले असे वाटल्यामुळे ते या ब्रिगेडीवृत्तीचे गुन्हेगार ठरतात ते ही तब्बल १०० वर्षानंतर..! आणि गंमतीचा भाग म्हणजे सत्य हे आहे की, ते संभाजी ब्रिगेड समजते त्या जातीतील नाहीतच.

हे प्रकरण समजायला खूप मोठी चिकित्सक वृत्ती असण्याची आवश्यकता नाही. कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे महानगरपालिका निवडणुका आहेत आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेने आता राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळविलेली आहे, त्यामुळे आपली राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात ती असेलच. मात्र एवढ्या खालच्या थराला जाऊन भिडेल हे थोडे अनपेक्षित होते, एवढेच.

कोण होते राम गणेश गडकरी?

इंग्रजी साहित्यात शेक्सपियरचा जो दर्जा आहे, तोच दर्जा मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांचा आहे. 'गोविंदग्रज' नावाने प्रसिद्ध असलेले गडकरी मराठीतले 'शेक्सपियर' म्हणून देखील संबोधिले जातात. केवळ ३४ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी मराठी साहित्यात अनमोल लेखन केले. ज्यात 'प्रेमसंन्यास', 'पुण्याप्रभाव', 'भावबंधन', सारखी नाटके समाविष्ट होतात. भारतीय महिला समस्यांविषयी बोट ठेवणारे त्यांचे 'एकाच प्याला' नामक नाटक स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंतच्या दर्शकांच्या हृदयी मानाचे स्थान मिळविते. ते कवी, नाटककार तसेच विनोदी लेखक होते.  'वाग्वैजंती' नामक काव्य संग्रह तसेच 'संपूर्ण बाळकराम' नामक त्यांचा विनोदी संग्रह देखील प्रसिद्ध आहे.

एवढ्या महान साहित्यिकाच्या पुतळ्यावर अशी वेळ का यावी? आपण कदाचित असा विचार करीत असाल. त्याचे कारण असे की, 'राजसंन्यास' नामक अजून एक नाटक त्यांनी लिहिले आहे. परंतु ते पूर्ण करण्यापूर्वीच गडकरी हे जग सोडून गेले. मग अश्या अपूर्ण कामांचा संदर्भ घेत संभाजी ब्रिगेडच्या शूरवीर 'मर्दांनी' त्यांच्या पुतळ्याला शिक्षा केली आहे. काम अपूर्ण राहिल्याची एवढी मोठी शिक्षा मिळेल असे माहित असते तर गडकरींनी देवाला नक्कीच अजून थोडे आयुष्य मागून ते नाटक पूर्ण केले असते. परंतु नियतीला ते मान्य नसावे.

संभाजी ब्रिगेड संघटना त्याचे साहित्य इतिहास क्षेत्रातील योगदान ?

इतिहास या क्षेत्रात आपले कवडीचेही योगदान नसलेली ही संघटना नेहमीच गल्लीबोळातील इतिहासकारांच्या आधारावर आपली तथ्ये मांडत असते. राम गणेश गडकरी यांच्या बाबतीत ही यांनी तसेच केले आहे. 'राजसंन्यास' नाटकावर आक्षेप घेत  त्यांनी हा पुतळा हटवला. परंतु यापैकी किती जणांनी हे नाटक वाचले असेल? किंवा साहित्य क्षेत्रातले किती जाणकारांचे मत यापूर्वी घेतले असेल? याला कोणतेही प्रमाण नाही. केवळ एका विशिष्ट जातीच्या द्वेशापायी, तसेच निवडणुका समोर ठेवून केलेली ही कृती आहे. तसे नसल्यास छ. संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंगजेबाची कबर अथवा शिवाजी महाराजांना मारायला आलेल्या अफजल खानचं थडगं या मंडळींनी कधीच नेस्तनाबूत केला असतं. परंतु इतिहासाचा सोयीस्कर वापर करणारे व साहित्य संस्कृतीचा गंधही नसणारी ही लोकांची टोळी पुतळा हटवायला आजच सरसावली आहे.

समाज संस्कृतीशी बांधिलकी

मराठीत 'सभ्य' नावाचा एक शब्द आहे, ज्याचा मुळ अर्थ सभेत(समाजात) राहण्या योग्य असा होतो. म्हणजेच समाजाने बनविलेले नियमांचे सर्वसाधारणपणे पालन करणाऱ्याला 'सभ्य' म्हटले जाते. 'संस्कारित', 'सुसंस्कारित' ही त्या पुढची विशेषणे आहेत. गडकरींचा पुतळा हटवलेल्या याच पुण्यात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर मित्र परंतु परस्पर भिन्न मते असलेली मंडळी होऊन गेलीत. टिळकांच्या मते समाजाची स्वतंत्र्यता ही अधिक महत्वाची होती, तर आगरकरांच्या मते समाजसुधारणा अशी परस्पर भिन्न मत असलेली मंडळी, समाजाचे नेतृत्व करताना एकमेकांवर सडकून टीका करीत असे, लिखाण करीत असत मात्र आपले मत श्रेष्ठ ठरविताना कधी कोणी एकमेकांची डोकी फोडली नाहीत. विचारांचा लढा विचारांनीच लढला होता. त्यामुळे समाजाने या मंडळींना स्वीकारले किंबहुना आपल्या वंदनीय स्थानी बसविले. परंतु कालची ही घटना म्हणजे तालिबानी आतंकवाद्यांना शोभाणारीच ठरली.

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी अनेक वर्ष लावून धरली गेली. परंतु ती मान्य होत नव्हती म्हणून त्याकाळात कोणी तिथल्या इमारती नाही फोडून काढल्यात. समाजाची एक विशिष्ट व्यवस्था असते. त्यानुसार जाणे म्हणजे 'कायद्याने' काम करणे असे म्हणतात. भारतीय समाजाने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्याची नियमावली संविधानात मांडलेली आहे. त्याचे पालन न करणारे गुन्हेगार ठरतात. पुतळा हटवायचाच होता तर संविधानिक मार्गाने लढा देता आला असता. परंतु अश्या प्रकारे रात्रीच्या अंधारात चोरट्यांप्रमाणे येऊन पुतळ्याला हातोडीचा वार करून पाडणे म्हणजेच समाजाचा सांस्कृतिक विनयभंग केल्या सारखे झाले आहे.

छत्रपतींच्या नावाने तोडफोड करणारे हे छत्रपतींच्या काळाच्या युद्धनीतीचा वापर स्वत:च्याच समाजावर करताना दिसत आहेत. छत्रपतींचे चारित्र्य, समाजाभिमुखपणा, देशभक्ती इतर गुण विसरून केवळ एका जातीच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केवळ आपल्या स्वार्थाच्या राजकारणाकारीता करतात. जातीय अस्मितेच्या नावाखाली मत मागणे अथवा मतदारांना चिथावणे हा आता गुन्हा असल्याचे २ दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंडळींनी शब्दाने जातीय राजकारण न करता ते कृतीतून घडवून आणले आहे. अश्या या विकृत बुद्धीच्या लोकांचा काय तो निर्णय जनता घेईलच मात्र आपल्या संकुचित स्वार्थापायी इतिहासाचा सोयीस्कर वापर करणाऱ्या मंडळींना इतिहास कधीच माफ करणार नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य असेल.

-हर्षल कंसारा

हर्षल कंसारा

माहिती तंत्रज्ञानातून अभियांत्रिकी पदवीधर, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात कामाचा अनुभव, सॉफ्टवेअर बरोबरच लेखनात ही विशेष आवड, ब्लॉग लेखन, चालू घडामोडी, राजकारण, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाणाची आवड, मराठी बरोबरच गुजराती आणि इंग्रजी साहित्यात देखील रुची, रा.स्व. संघाचे स्वयंसेवक.