त्रिपुरा : निवडणुकी आधी १ वर्ष भाग - १

    15-Jan-2017   
Total Views |
 

चांदमोहन त्रिपुरा : कम्युनिस्ट हिंसाचाराचा आणखी एक दुर्दैवी बळी


 
 ..ते कोणालाच सोडत नाहीत. आपल्या विरोधात जो कोणी उभा राहील, आपल्याला पर्याय देण्याचा प्रयत्न करेल, त्याला कोणत्याही मार्गाने संपवायचं हीच त्यांची परंपरा आहे. त्यांचे संपविण्याचे मार्ग अत्यंत क्रूर, पशुलाही लाजवतील इतके हिंसक असतात आणि त्यातून आजपर्यंत अनेक रक्तरंजित अध्याय लिहिले गेले आहेत. केरळ व बंगाल राज्यांतील कम्युनिस्ट हिंसाचाराबद्दल एका अभ्यासकाने दिलेली ही प्रतिक्रिया. भारतातील राजकीय-सामाजिक चर्चाविश्व आणि माध्यमांमध्ये आता कुठे कम्युनिस्ट विचारसरणीचे पक्ष व त्यांच्या हिंसाचाराबद्दल उघड चर्चा होऊ लागली आहे. मात्र, या चर्चेत केरळ, बंगालबद्दल बोलले जात असताना आणखी एक महत्त्वाचे राज्य दुर्लक्षित राहिले आहे. ते राज्य म्हणजे ईशान्य भारत अर्थात पूर्वांचल भागातील छोटेसे राज्य त्रिपुरा! भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात छोटे राज्य असणार्‍या त्रिपुरावर १९९३ पासून म्हणजे गेली ३६ वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट) राज्य करतो आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार गेली १८ वर्षे मुख्यमंत्री आहेत. इतकी वर्षे राज्य केल्यानंतर निर्माण झालेली मजबूत पकड किंचित ढिली होण्याची चिन्हे दिसू लागताच या कम्युनिस्टांमधील ‘कम्युनिस्ट’ जागा झाला आहे आणि त्यांनी घेतलेला अगदी ताजा बळी म्हणजे ‘चांदमोहन त्रिपुरा’..


 
त्रिपुराची राजधानी आगरतळापासून साधारण सव्वाशे किलोमीटर्सच्या अंतरावर, डोंगराळ-दुर्गम भागात वसलेल्या गंडाचारा या गावाजवळील एका पाड्यात राहणारा चांदमोहन त्रिपुरा. २०१४ साली केंद्रात व त्यानंतर भारतातील अनेक राज्यांत भारतीय जनता पक्षाने केलेल्या ऐतिहासिक सत्तापरिवर्तनानंतर देशभरात भाजपचे वारे वाहू लागले. या वार्‍याची झुळूक ईशान्येला कोपर्‍यात वसलेल्या त्रिपुरात न पोहोचती तरच नवल. कम्युनिस्टांच्या या बालेकिल्ल्यात भाजप आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करू लागला. चांदमोहन हाही असाच भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन उभा राहिलेला एक कार्यकर्ता. गंडाचारामधील स्थानिक वनवासी जनजातीमधील एका समाजातील असणार्‍या चांदमोहनने स्थानिक वनवासी समाजात भाजपचे काम सुरू केले. आणि कम्युनिस्टांच्या या राज्यात स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत चांदमोहन निवडूनही आला. देशभरातील वारे आपल्या बालेकिल्ल्यातही पोहोचत असल्याचे पाहून आधीच धास्तावलेल्या कम्युनिस्ट संघटनांना वनवासी समाजातून वर येत असलेला हा भाजपचा युवा नेता डोळ्यात सलू लागला होता. दि. २६ डिसेंबर, २०१६ च्या दिवशी चांदमोहन घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. आली ती त्याच्या हत्येची खळबळजनक बातमी!
 
 
 अत्यंत दुर्गम, रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधांचा मागमूसही नसणार्‍या गंडाचाराच्या या भागात अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जगणार्‍या चांदमोहनला ‘काहीजणांनी’ बेदम मारहाण करून ठार मारल्याची बातमी आली आणि त्रिपुरात एकच खळबळ उडाली. दै. ‘मुंबई तरुण भारत’चा प्रतिनिधी म्हणून त्रिपुरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी मला गंडाचारामध्ये चांदमोहनचे कुटुंब आणि स्थानिक वनवासींचा आक्रोश पाहायला मिळाला. भाजपचे त्रिपुरा अध्यक्ष विप्लव कुमार देव आणि त्रिपुरा राज्य प्रभारी सुनील देवधर यांनी काल गंडाचारामध्ये जाऊन चांदमोहनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक लोकांनी चांदमोहनच्या हत्येच्या तपासाबाबत ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर कम्युनिस्ट राजवटीखालील प्रशासनाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्याच्या हत्येबाबत पोलिसांकडून केवळ एकाच व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची बातमी अनेक स्थानिक माध्यमांमधून प्रसिद्ध झाली. या हत्येत एकूण सहाजणांचा सहभाग असून हे लोक कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचा संशय आहे. मात्र, दहशतीमुळे साक्ष देण्यास स्थानिकांपैकी कोणी तयार नसल्याने बाकीच्यांना ताब्यात घेता येत नाही, असे उत्तर पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

 
 चांदमोहनच्या धाकट्या भावाला कम्युनिस्ट पक्षाच्या ललित त्रिपुरा या स्थानिक आमदाराने आपल्या कार्यकर्त्यांकरवी जर तू भाजपचे काम करशील, तर तुझीही अवस्था तुझ्या भावासारखीच करू, अशी धमकी पाठविली आहे. तसेच काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी चांदमोहनच्या कुटुंबीयांना थोडी तडजोड करण्यासाठी, थोडक्यात तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. या सार्‍या घडामोडींमुळे आधीच खचून गेलेले चांदमोहनचे कुटुंब आणखी घाबरले आहे. अशात त्यांना पोलीस संरक्षण देण्यासही प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत वगैरे तर लांबची गोष्ट, चांदमोहनचा शवविच्छेदन अहवालही इतक्या दिवसांनंतर देण्यात आलेला नाही. वरिष्ठ पोलीस पदाधिकार्‍यांपासून खालच्या पोलिसांपर्यंत सार्‍यांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत. या सार्‍या बाबींमुळे या चांदमोहनच्या हत्येमागे नेमका ‘बोलविता धनी’ कोण हे स्पष्ट होते आहे. विप्लव देव आणि सुनील देवधर यांनी प्रत्यक्ष त्या पाड्यावर जाऊन स्थानिक वनवासी समाजात धीर देण्याचा आणि या कम्युनिस्ट दहशतीविरुद्ध जनमत एकवटण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय चांदमोहनच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. येत्या काही दिवसांत या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलने करण्याचा मनोदयही भाजपने बोलून दाखविला आहे. आता या सार्‍या प्रयत्नांना कितपत यश मिळते हे पाहावे लागणार आहे.
 
 चांदमोहन तर गेला आहे. तो आता परत येणार नाही. त्याचे कुटुंबीयही यथावकाश हा धक्का सहन करत पुन्हा पूर्वीसारखे जीवन जगू लागतील. पण असे किती चांदमोहन कम्युनिस्टांच्या या रक्तरंजित अध्यायांचे भाग बनणार आहेत, हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. विकसित राज्यांपासून दूरवर एका कोपर्‍यातल्या त्रिपुरामधील या हिंसाचाराची दाखल माध्यमे आता तरी घेणार का हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. चांदमोहनचे कुटुंब आक्रोश करत न्याय मागत आहे, मात्र त्रिपुराचे कम्युनिस्ट प्रशासन जागचे हलण्यास तयार नसल्याचे दिसते आहे. आता चांदमोहनला न्याय मिळणार का आणि असंवेदनशीलतेचा कळस गाठलेल्या माणिक सरकार यांच्या कम्युनिस्ट शासनाला त्रिपुरावासीय ‘शासन’ करणार का हे येणारा काळच ठरवणार आहे.
 
 - निमेश वहाळकर, (त्रिपुरामधून)

निमेश वहाळकर

सध्या मुंबई तरूण भारत मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत. मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.