महिलांना स्वातंत्र्य देणारा ‘पिंक’!

    17-Sep-2016
Total Views |


महिलांनी असचं बोललं पाहिजे, असेच कपडे घातले पाहिजेत, इतक्याच वाजता घरी आलं पाहिजे, व्यसनं करू नयेत, हे आणि यांसारखे असंख्य नियम आजच्या एकविसाव्या शतकातही केवळ महिलांसाठीच लागू आहेत. पुरूषांना कोणतेही बंधन नाही आणि त्यांना कोणी विचारतही नाही. स्त्री-पुरूष समानता हे फक्त बोलण्यापुरत आणि कागदावर लिहीण्यापुरतच मर्यादित आहे. पण पुन्हा एकदा या प्रश्‍नाला ‘पिंक’ चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. पिकू आणि विकी डोनर सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या सुजीत सरकार यांनी ‘पिंक’ची निर्मिती केली असून प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. मनोरंजन करणारा एक परिपूर्ण चित्रपट म्हणून हा थोडा असफल ठरला असला तरी यातून जो संदेश देण्यात आला आहे तो अफलातून आहे आणि सध्या त्याची समाजाला गरज आहे.

हॉट कल्चर असणार्‍या दिल्ली शहरातील ही कहाणी. मिनल अरोरा (तापसी पन्नू), फलक अली (किर्ती कुल्हारी) आणि अंद्रिया (तरींग) या तीन वर्कींग बॅचलर रूममेट्सचे दैनंदिन आयुष्य चालू असतानाच एके दिवशी अघटीत घटना घडते. या तिघीही एका रॉक स्टार पार्टीमध्ये गेल्या असताना शहरातील बड्या नेत्याचा भाच्चा असणार्‍या राजवीर सिंग (अंगद बेदी) कडून मिनलवर अतिप्रसंग केला जातो आणि त्याच्या विरोधात मिनल त्याच्यावर हल्ला करते. इथूनच ‘पिंक’चा प्रवास सुरू होतो. पुढे या प्रवासात प्रसिद्ध वकील असणारे दीपक सेहगल (अमिताभ बच्चन) हे मुख्य पात्र समाविष्ट होते. या घटनेमुळे साहजिकच या तिघीही भांबावून जातात, पण त्यानंतर राजवीर व त्याच्या मित्रांकडून सातत्याने होणार्‍या त्रासाला कंटाळून त्या पोलिसांमध्ये जाण्याचा निर्णय घेतात. राजवीर नेत्याचा नातेवाईक असल्याने मिनल विरोधातच केस उभी राहते आणि सुरू होतो कार्ट रूम ड्रामा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अमिताभ या मुलींना वाचविण्यासाठी कशी मदत करतो, सत्तेची ताकद सोबत असलेल्या राजवीरच काय होत आणि अखेर मिनल व तिच्या मैत्रींणींना न्याय मिळतो का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘पिंक’ पाहावा लागेल.

चित्रपटाच्या कथेत फारसा दम नसला तरी त्याची मांडणी आपल्याला खिळवून ठेवते. शिवाय अभिनयाच्या पातळीवरही सर्व कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वजीर नंतर काहीसा त्याच भूमिकेतून बाहेर पडून अमिताभने पिंक मधील सेहगल साकारल्या सारखे वाटते. पण इथेही ते प्रभावीच ठरले आहे. तीन मुलींपैकी तापसी पन्नूबरोबरच किर्तीनेही अभिनयाची छाप सोडली आहे. ‘तारीख पे तारीख’ या सनी देओलच्या प्रसिद्ध संवादानंतर आजपर्यंत अनेक कोर्ट रूम ड्रामासंदर्भातील संवाद आणि चित्रपट आपण पाहिले, पचवले पण ‘पिंक’ हा त्याच फॉरमॅटमध्ये असूनही आपले वेगळेपण सिद्ध करतो. या चित्रपटात अमिताभच्या समोर असलेला वकील पियुष मिश्राही भाव खाऊन गेला आहे. त्याचा संवादफेक कौशल्यावरून पुन्हा एकदा गँगस् ऑफ वासेपूरची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. आपले मुद्दे ठळकपणे मांडताना समाजाने स्त्रीयांसाठी घालून दिलेले नियम ज्यापद्धतीने अमिताभ प्रेक्षकांसमोर मांडतो ते खरोखरीच लाजवाब आहेत. नॉर्थ ईस्टमधील मेघालयाची वेगळी वैशिष्ट्य सांगणारा किंवा राजवीरला खिशातील हात काढायला भाग पाडणारा संवाद अक्षरश: प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जातो.

‘नो’ म्हणण्याचा अधिकार महिलांना आहे आणि त्याची समाजाने कदर करावी असा साधा सरळ संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. एखादी मुलगी कमी कपडे घालत असेल, सिगरेट-दारू पित असेल किंवा मुुलांशी हसतखेळत बोलत असेल तर तिचे कॅरॅक्टर खराबच आहे, ही समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. अर्थात पटकथेच्या बाबतीत त्रुटी आहेतच. जसे की, आधी साध निट बोलताही न येणारा अमिताभ कोर्टात गेल्यानंतर उत्तम प्रकारे आपले मुद्दे मांडतो, केस लढविण्यापूर्वी तो या तिघींकडूनही घटनेची सत्यता का पडताळून पाहात नाही किंवा फलक राजवीर कडून पैसे का घेते आणि याबाबत ती मिनल व अंद्रिया का सांगत नाही असे काही प्रश्‍न आपल्याला सतावतात खरे पण दिग्दर्शन, मांडणी आणि अभिनयाच्या ओघात आपले आपसुकच त्याकडे दुर्लक्ष होते.

‘कारी कारी रैना सारी सो अंधेरे क्यूं लाईं’ हे गाणं आणि अगदी शेवटीला अमिताभ यांच्या आवाजातील ‘तु खुद की खोज में निकल’ ही कविता सर्व स्त्रियांना नवी प्रेरणा देणारं आणि समाजाला संदेश देणारं आहे. संपूर्ण चित्रपटावर सुजीत सरकारची छाप असल्याचे वेळोवेळी जाणवत राहते. त्यामुळे या यशात सुजीतचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. एक चांगला संदेश देणारा हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे!