आ हा हा .. 'रम्य' ते पाकिस्तान..
Total Views |

सामान्यपणे 'आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कारटं' अशीच सर्वांची दृष्टी असते. मात्र याही पलिकडे जाऊन काही विशाल अंतःकरणाची माणसं आपली अंगभूत गुणग्राहकता दाखवत इतरांचंही कौतुक मुक्तकंठानं करताना दिसतात. पण काही अवसानघातकी माणसांना ते बघवत नाही आणि मग या उदार अंतःकरणाच्या माणसांना त्यांनी केलेली टीका, त्यांचे वाग्बाण सहन करावे लागतात. मात्र या महान व्यक्तींना त्याची तिळमात्रही तमा नसते आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात. कोणी कितीही निंदा नालस्ती केली तरी ते आपलं म्हणणं सोडत नाहीत आणि केवळ याचसाठी ते कायमच वंदनीय ठरतात.

काँग्रेसचं कर्नाटकातील एक युवा नेतृत्व ( केंद्रातील ४६ वर्षीय युवा नेतृत्वापेक्षा ३४ म्हणजे नक्कीच युवा आहे, असो ) म्हणजे अभिनेत्री आणि माजी खासदार दिव्या स्पंदना उर्फ रम्या. त्यांनी अलिकडेच केलेल्या एक वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. वास्तविक भारतात लोकशाही आहे आणि त्यामुळे प्रत्येकालाच आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र असं असतानाही बिचाऱ्या रम्या यांच्यावर सगळीकडूनच आगपाखड झाली. मात्र त्या अजिबात मागे हटल्या नाहीत आणि आपल्या विधानावर ठाम राहिल्या. अर्थातच ६० वर्षांचं सत्ताऋण चुकवण्यासाठी माध्यमांतील काही प्रतिनिधी त्यांच्या मदतीला सरसावून आलेच पण तरीही त्यांचंही बळ थोडं कमीच पडलं. आणि त्यामुळेच अस्मादिकांना त्यांच्या मदतीला धावून जाणं भाग पडलं. अहो अखेर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही चीज आहे की नाही देशात ? त्याचंच रक्षण करण्यासाठी हा लेखन प्रपंच.

मुळात रम्याताई नेमकं म्हटल्या तरी काय ते पाहिलं पाहिजे. ताई नुकत्याच सार्क देशांच्या एका बैठकीच्या निमित्ताने आपल्या शेजारी पाकिस्तानात जाऊन आल्या. आता काही मूर्ख, मूलतत्त्ववादी आणि संकुचित मनोवृत्तीच्या लोकांची नाकं पाकिस्तानचं नाव जरी काढलं तरी मुरडतात त्याला ताई काय करणार. त्यांनी खुशाल नाकं मुरडावीत पण म्हणून काय पाकिस्तानसारख्या आपल्या सख्ख्या भावावर प्रेम व्यक्त करण्याची संधी ताईं सोडणार थोडीच होत्या. त्यातच रक्षाबंधन जवळ आलेलं. त्यामुळे त्या गेल्या, तिथला पाहुणचार घेतला, आणि अगदी पंचमी नसली तरी भावाकडच्या म्हणजेच माहेरच्या रम्य आठवणी घेऊन भारतात परत आल्या. आता कुठल्याही माहेरवीशिणीला परत आल्यावर विचाराल तर ती बिचारी हेच म्हणणार ना की माझं माहेरच चांगलं आहे म्हणून. तसंच बिचाऱ्या ताई म्हटल्या की पाकिस्तान म्हणजे खरंच स्वर्ग आहे. तिथले लोक चांगले आहेत, आदरातिथ्य चांगलं आहे. एकंदरच पाकिस्तान खूपच रम्य आणि आल्हाददायक आहे. पण या निर्बुद्ध लोकांना काही कळतंच नाही मुळी. ताईंच्या या एका वाक्यावरून गदरोळ सुरू झाला. त्यामुळे आता एतद्देशीयांना पाकिस्तान कसा खरंच नरक नसून स्वर्ग आहे हे सांगण्याची नैतिक जबाबदारी अस्मादिकांची आहे असं आमचं मत झालं. ताई बरोबरच बोलल्या. पाकिस्तान खरंच स्वर्ग आहे.
पूर्वीच्या अखंड भारताचे तुकडे होऊन १९४७ साली भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. ते मिळत असतानाच पाकिस्तानातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. अनेक हिंदू गावंच्या गावं बेचिराख केली गेली. लाखो-कोटी हिंदूंची कत्तल झाली. पण तरीही पाकिस्तान स्वर्ग आहे.
धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या या देशात लोकशाही कधीच शांततेत नांदली नाही. तेथील लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये चैतन्य आहे ( भारतातील हे स्तंभ गेली कित्येक वर्षं एकाच जागेवर उभे असल्यामुळे त्यांना वाळवी लागली होती मात्र आता स्वच्छ भारत का असे काहीतरी सुरू झाल्यामुळे ही वाळवी कमी होत आहे असा काही नतद्रष्टांचा सूर असतो, पण ताईंनी त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये ) आणि म्हणूनच ते कायमच एकमेकांच्या तंगड्यात तंगडे घालत असतात. त्यामुळेच तिथे सत्तेच्या रक्षणार्थ असणारे लष्कर कधीही सत्तेच्याच विरोधात बंड करून लष्कर प्रमुख पंतप्रधान होण्याची उज्ज्वल आणि दैदिप्यमान परंपरा आहे. कोणालाही काहीही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य याहून दुसरीकडे कुठे मिळणार नाही. पण हे या मूर्खांना कळत नाही आणि त्यामुळेच ताई जे म्हणाल्या तेच योग्य आहे पाकिस्तान खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे.
काहीही झालं तरी भारताला प्रगती करू द्यायची नाही आणि काश्मीर सतत धुमसत ठेवायचा या पवित्र आणि मंगल वृत्तीमुळे पाकिस्तान सरकारचा निम्म्याहून अधिक पैसा लष्कारावर खर्च होतो. सहाजिकच त्यामुळे पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आणि ते योग्यही आहे कारण लोकांमध्ये बेरोजगारी वाढल्याशिवाय ते दहशतवादासारख्या विश्वशांतीच्या मार्गावर कसे वळतील ? त्यामुळे पाकिस्तानात दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असली, शिक्षणाची वानवा असली, आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला असला तरीही पाकिस्तान स्वर्गच आहे.
आपले राजीवकाका जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा रुपयातले फक्त १५ पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात असं त्यांनी सांगितलं होतं. खरंच काय सोनेरी दिवस होते ते. असो. ( फार लिहिलं तर अधिक भावूक व्हायला होईल आम्हाला. ) आपल्या धाकट्या भावानं कायम आपल्या पुढं जावं असं कोणत्याही थोरल्या भावाला वाटतं. त्याप्रमाणे पाकिस्तान आज या बाबतीत राजीवकाकांनी घालून दिलेली रेषा प्रमाण मानून आपल्यापेक्षा बराच पुढे निघून गेला आहे. तिथे आज कदाचित दहा रुपयातले १५ पैसे शेवटी पोहोचत असतील इतका भ्रष्टाचार आहे. ( जाता जाता ... आम आदमी पक्षाला आता सध्याच्या सरकारमुळे भारतात काम करायचा स्कोप राहिला नसल्यामुळे ते आपली एक आवृत्ती पाकिस्तानात उघडणार आहेत असं कळतंय. पण तो काही आजचा विषय नाही. असो. ) त्यामुळे सामान्य माणसाचे प्रचंड हाल होत असले तरीही पाकिस्तान स्वर्गच आहे.

पाकिस्तानातल्या हिंदूंची अनेक मंदिरं तिथल्या सरकारनं अधिकृतरित्या पाडली. कित्येक लाख हिंदूंचं बळजबरीनं धर्मांतर करून घेतलं. त्यामुळे स्वातंत्र्यकाळात तिथे असणारी ८ टक्के हिंदू लोकसंख्या आता ०.८ टक्क्यांवर आलेली आहे. ख्रिस्ती अल्पसंख्य समुदायाचीही अवस्था तशीच आहे. मात्र भारतात ज्याप्रमाणे मुस्लिमांच लांगूलचालन केलं जातं तसंच तिथेही व्हावं या उदात्त हेतूने हे धर्मांतर होतं एवढी साधी गोष्टही इथल्या लोकांना कळत नाही. त्यांना योग्य त्या सरकारी सुविधा मिळाव्यात, झालंच तर शिया विरूद्ध सुन्नी या राष्ट्रीय खेळात कोणत्या तरी एका बाजूने खेळता यावं यासाठी एवढी उठाठेव केली जाते. पण त्याचं महत्त्वच या लोकांना कळत नाही. पाकिस्तानात या उद्देशानं हे राष्ट्रीय धर्मांतर सुरू आहे हे माहिती असल्यामुळेच कदाचित मदर टेरेसा तिथे न जाता इकडे भारतात आल्या असाव्यात. पण हे समजून कोण घेणार. त्यामुळे आणखी काही वर्षांत पाकिस्तानात एकही हिंदू जिवंत राहिला नाही तरी पाकिस्तान स्वर्गच आहे.
बलुचिस्तान या आपल्याच राज्यात पाकिस्तान सरकार पुरस्कृत गोळीबार मैदान तयार केलं आहे. तिथे (बॉम्ब)गोळाफेक, नेमबाजी, कुस्ती यांसारख्या स्पर्धांचा सराव होतो. आता नेमकं त्याच वेळात समोरून कोणीतरी गेल्यावर त्यांना गोळी लागणारच ना. पण नाही, या ही गोष्टीचा बाऊ केला जातो आणि त्यामुळेच पाकिस्तान ऑलिम्पिक सारख्या खेळात मागे राहतो. खेळाडूंना जर नीट सरावच करू दिला नाही तर त्यांना यश मिळणार कसं. पण हे समजून न घेता बलुचिस्तानात पाकिस्तान सरकार हिंसाचार करते अशी आवई उठवली जाते. आता सरावा दरम्यान दरवर्षी हजार-दीड हजार लोक मरतात, पण म्हणून काय लगेच हिंसाचाराचा आरोप करायचा ? कमालच झाली बुवा. गिलगिट बाल्टिस्तान मध्ये नाही का होत सराव, मग तिथे कोणी आवाज उठवतं का ? नाही ना. मग. तिथे आवाज उठवला की लगेच मारून टाकतात. मग काय तर, तो काय पाकिस्तानचा भाग आहे का, नाही ना. मग त्यांनी पाकिस्तान सरकार विरूद्ध बोलण्याचं काय कारण. त्यांना ते ठेचूनच काढणार ना. पण मानवाधिकारांचं कितीही उल्लंघन होत असलं तरी ताई म्हणतात तेच बरोबर आहे. पाकिस्तान स्वर्गच आहे.
सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे इतकी टीका होऊनही ताई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. खरंतर आपल्या पप्पूदादांनी जसे परवा गांधीहत्येच्या संघावर केलेल्या आरोपावरून सुरू असलेल्या प्रकरणात आपले शब्द मागे घेतले आणि मी असं बोललोच नव्हतो असं कोर्टात सांगितलं तसं त्यांना म्हणता आलं असतं. पण त्या मागे हटल्या नाहीत. नीट विचार करून लिहीलेला आणि छापून आलेला अग्रलेख व्यवस्थापनातील एकाला न आवडल्यामुळे मागे घेण्याची नवी फुरोगामी परंपरा पुढे येत असतानाच पाकिस्तानची भलावण करण्याची जुनी परंपरा त्यांनी घट्ट पकडून ठेवली यातच त्यांचं मोठेपण आलं. पण काहीही म्हणा आपल्या केंद्रातील युवा नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून रम्या ताईंची वाटचाल अगदी योग्य चालू आहे यात मात्र तिळमात्र शंका नाही.