
भारतीय संस्कृती! एखाद्या देशाची, राज्याची किंवा शहराच्या संस्कृतीचे नियम, धोरणं कुठेही लिहीलेली नसतात. तर ती आपल्या दैनंदिन जीवनाच्या वागणुकीतून परिवर्तीत होत राहतात व पुढे त्याचेच अनुकरण संबंधितांच्या वंशंजांद्वारे केले जाते. हे अनुकरण शंभर टक्के पूर्वापार चालत आलेले नसले तरी त्यातील मूळ गाभा मात्र काही टक्के तरी कायम असतो, याची आजही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पण सो कॉल्ड प्रसिद्ध लेखिका असणार्या ‘शोभा डे’ सारख्या काही व्यक्ती यालाही अपवाद ठरतात. समोरच्या व्यक्तीचा आदर करणे शक्य नसेल तर किमान त्याचा अपमान तरी करू नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. परंतु शोभा डे यांना आजपर्यंत ही शिकवण कदाचित मिळाली नसेल किंवा त्यांनी ती योग्य रित्या आत्मसाततरी केली नसेल.
रिओ ऑलिंपिक सुरू झाल्यानंतर काही दिवसांनीच शोभा यांनी वादग्रस्त विधान करून मीडियाचे लक्ष तर वेधून घेतलेच परंतु त्याचबरोबर त्यांनी भारतीय खेळाडूंचा अपमानही केला. त्यांनी वक्तव्य केलेल्या क्षणापर्यंत भारतीय खेळाडूंचे कामगिरी तशी निराशाजनकच होती, परंतु त्यामुळे असे वक्तव्य करून त्यांचे मनोबल आणखी कमी करण्याचा हक्क शोभा डे यांना कोणी दिला? पण खरतर शोभा यांना असा प्रश्न विचारणेच चुकीचे आहे कारण ‘दुसर्याचा आदर करणे आणि एखाद्याबद्दल चांगले बोलणे’ हा त्यांचा मुळ स्थायीभावच नाहीये. (काल सिंधू जिंकल्यावर ‘सुपर्ब प्ले’ किंवा सिंधू, साक्षी आणि दिपाचं गेल्या काही ट्विटमधून शोभा डेनी केलेलं कौतुक उसनं अवसान आणल्यासारखच वाटतं.) ‘फ्रिडम ऑफ एक्स्प्रेस’च्या नावाखाली सध्या आपल्याकडे कोणी काहीही बोलू शकतं, पण हे बोलताना देखील आपल्या संस्कृतीचा कुठेतरी विचार करणे किंवा किमान त्याच्या जवळपास जाण्याचा तरी प्रयत्न करणे आवश्यक आहे असं मला वाटतं.
भारतीय संस्कृतीचं खरं प्रतिक काल सिंधुने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आपल्या खिलाडू वृत्तीमधून दाखवून दिलं. कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यातील विजेता पॉईंट मिळविल्यावर दोघीही कोर्टवर अक्षरश: कोसळल्या. दोघींच्या डोळ्यात आपसुकच अश्रु तरळले. एकीच्या डोळ्यात आनंदाश्रु होते तर दुसरीच्या डोळ्यात सामना गमाविल्याचे दु:ख होते. पण तरीही या दु:खातून स्वत:ला सावरत सिंधू नेटच्या पलिकडे गेली व तिने मरिनच्या खेळाचे कौतुक करीत तिचे मोठ्या मनाने अभिनंदनही केले. सिंधुचा हा दिलखुलास पणा कदाचित मरिनला भावला अन् तिने थेट तिला अलिंगनच दिले! सामना हारल्याच्या दु:खात सिंधु मरिनला न भेटता तशीच कोर्टबाहेर जाऊ शकली असती, पण तिने तसे केले नाही आणि तिच्या याच वर्तवणुकीचे आज जगभर कौतुक होत आहे. काल सिंधुच्या हातात जरी रौप्यपदक असलं तरी तिने तिच्या खेळाने आणि एकूणच खिलाडू वृत्तीने करोडो भारतीयांच्या मनात सुवर्णपदकाचा ठसा उमटविला आहे. भारत आज पदकांच्या शर्यतीय इतर देशांपेक्षा मैलोंमैल लांब असला तरी करोडे भारतीयांना क्रिकेटशिवाय पहिल्यांदाच ‘ऑलिंपिक’मधील बॅडमिंटनच्या सामन्यासाठी टीव्हीसमोर ठाण मांडून बसायला लावण्याचे अद्भूत कतृत्त्वही तू करून दाखविल्यामुळे सिंधु तुझे विशेष कौतुक!
सांगायचे तात्पर्य एवढेच की मनुष्यप्राण्यानेच मनुष्याचा आदर करणे सोडून दिल्यास हळूहळू संस्कृतीचा र्हास होण्यास वेळ लागणार नाही. शोभा ताई अवघ्या 21 वर्षीय सिंधूने जगाला भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन काल घडवून दिले आहे. तुम्ही तिच्यापेक्षा वयाने नक्कीच मोठ्या आहात, पण तरीदेखील शिक्षणाला किंवा गुरू-शिष्याच्या नात्याला कधीही वयाची अट नसते असे म्हटले जाते. तर बघा, जमलं संस्कृतीच्या हितार्थ चार गोष्टी तुुम्ही शिकून घेतल्या तर नुकसान काहीच होणार नाही; झाला तर फायदाच होईल, तोही तुमची स्वत:चीच प्रतिमा सावरण्यासाठीच! घरबसल्या एखादं ‘ट्विट’ करण अतिशय सोपं काम आहे, पण ऑलिंपिकमध्ये जाऊन प्रचंड दडपणाखाली देशाचा गौरव करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे, याची जाणीव गेल्या काही दिवसात शोभा डेंना झाली असावी अशी प्रांजळ अपेक्षा आहे..!
----