खंडित स्वातंत्र्य - भाग- १

    14-Aug-2016   
Total Views |

 

आणि फाळणी टळू शकली असती..

 


“१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली.”

या एका ओळीवर भारताच्या फाळणीच्या कथेचा शेवट होत नाही तर एका अंतहीन मोठ्या संघर्षाला सुरुवात होते.

फाळणीच्या वेदना खूप भीषण असतात. एक कोटी भारतीयांनी या वेदना सहन केल्या आहेत. जवळपास २० लाख हिंदु आणि शीख या फाळणीमुळे मृत्युमुखी पडले, याच फाळणीमुळे अनेक आया बहिणींच्या अब्रुशी खेळ करण्यात आला. अनेकांची कुटुंबे या फाळणीमुळे उध्वस्त झाली.

त्या सर्व हिंदु शीख बंधुंच्या प्रेतांवर, त्या अनेक आया बहिणींच्या करुण किंकाळ्यांवर, त्या सर्व लहान बाळांच्या बीभत्स मृत्युवर, तत्कालीन नेत्यांच्या हेकेखोरपणावर आणि राजकीय नपुंसकतेवर आपले स्वातंत्र्य उभे आहे.

१९२३ साली झालेल्या काकीनाडा अधिवेशनात पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या वंदेमातरम गायनाला झालेला विरोध गांधींजींनी गांभीर्याने घेतला असता तर भारताची फाळणी नक्कीच टळू शकली असती. १९२३ साली कांग्रेसच्या काकीनाडा अधिवेशनाचा तो पहिला दिवस होता. अधिवेशनाच्या सुरुवातील वंदेमातम गायन होणार होतं. प्रख्यात गायक पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर स्वत: हे राष्ट्रगीत म्हणणार होते. मंचावर गांधीजी आणि कांग्रेस अध्यक्ष (अली बंधुंपैकी एक) मुहम्मद अली उपस्थित होते. पंडितजींनी वंदेमातरम गायनास सुरुवात केली आणि तत्क्षणी गांधीजींच्या उपस्थितीत मुहम्मद अलींनी पंडितजींना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पंडितजी कुठे थांबणाऱ्यातले होते. त्यांनी वंदेमातरम सुरुच ठेवले. हे बघताच रागाच्या भरात मुहम्मद अली मंच सोडून निघून गेले. हे आपले दुर्भाग्यच की गांधीजींनी मुहम्मद अलींच्या या वागण्याचे खंडण करण्याच्या ठिकाणी त्यांची साथ दिली आणि ते ही मंच सोडून निघून गेले.

मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा इथूनच प्रारंभ झाला. ज्याचा सगळ्यात भीषण परिणाम म्हणजे भारताची फाळणी !

याच अली बंधूंनी गांधीजींना खिलाफत चळवळीसाठी उद्युक्त केलं होतं. याच अली बंधूंनी भारताला दार-उल-हरब (संघर्षाची भूमी) बनवण्याचा फतवा जाहीर केला होता. हेच अली बंधू नंतर भारताच्या विभाजनाला पाठिंबा देत मुस्लीम लीग मध्ये सहभागी झाले होते. ज्या गांधीजींना आपला भाऊ म्हणून या अली बंधूंनी स्वीकारले होते, त्याच अली बंधूंनी नंतर गांधीजींबद्दल, “ पतित से पतित, गिरा से गिरा और व्यभिचारी चे व्यभिचारी मुसलमान भी मुझे गांधी से प्यारा है.” असे मत व्यक्त केले होते.

हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच होते की, इतके होवून सुद्धा देशाच्या नेतृत्वाचे डोळे उघडले नाहीत. मुस्लिम लीगचे लाड करणे सुरुच राहीले. पुढले २०- २५ वर्ष तुष्टीकरणाची ही मालिका सुरुच राहिली. मुस्लिम लीग आपल्या मागण्या ठेवत गेली, आणि नाही नाही म्हणता कांग्रेसने त्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. मुस्लिम लीग कांग्रेसला वाकवत गेली, आणि कांग्रेस वाकत गेली. एके काळी विश्वव्यापारात सर्वोच्च शिखरावर असलेलं राष्ट्र, विश्वातील सगळ्यात वैभवशाली राष्ट्रानं हा अपमान मूकपणे सहन केला.

पूर्ण भारतवर्षाला एक सूत्रात बांधण्याचा आग्रह करणाऱ्या, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी नेतृत्वाला कांग्रेसने बाजूला सारलं. आणि त्याला अपमानित देखील केलं. सुभाषचंद्र बोस सारख्या क्रांतिकारक आणि दूरदर्शी नेतृत्वासोबत कांग्रेसचे सूर जुळले नाहीत. राजश्री पुरुषोत्तम दास टंडन यांच्या सारख्या स्वाभिमानी व्यक्तिला कांग्रेसने मुख्यधारेतून बाजूला सारलं. जवाहरलाल नेहरुंसारख्या माऊंटबेटन परिवाराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तिच्या हातात कांग्रेसचं नेतृत्व आलं आणि त्याच क्षणी भारताचं भविष्य लिहिलं गेलं.

(क्रमश:..)

 

 

प्रशांत पोळ

आयटी क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव. विविध मोठ्या कंपन्यांसाठी आयटी कन्सल्टंट. 'भारतीय ज्ञानाचा खजिना' या पुस्तकाचे लेखक. भारतीय इतिहासावर गहन अभ्यास. साहित्य, संस्कृती, इतिहास, तंत्रज्ञान या विषयावर लेखनाची आवड. हिंदुत्ववादी विचारधारा जोपासणारे लेखक.