“मतलब बाजी जितने से है...’’

    13-Aug-2016
Total Views |


आपलं सर्वस्व अर्पण करून एका वेगळ्याच जिद्दीने देशासाठी कार्य करणारी मोजकीच लोक आपल्याला पाहायला मिळतात. के. एम. नानावटी हे पन्नासच्या दशकात अशाच देशप्रेमासाठी गाजलेलं मुंबईतील एक नाव. नौदलातील अधिकारी असणारे नानवटी, त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर यांची ही सत्य घटना. त्या काळीही प्रचंड लोकप्रियता मिळविलेल्या या घटनेवर आधारित टिनू देसाईचा ‘रूस्तम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खरतर निरज पांड्ये आणि अक्षय कुमार जोडी म्हणली की बेबी, स्पेशल 26 हे चित्रपट आठवल्याशिवाय राहत नाहीत. पण ‘रूस्तम’ निरज पांड्येचा जरी चित्रपट असला तरी याचे दिग्दर्शन मात्र त्याने केलेले नाही, त्यामुळे त्यातील त्रुटी प्रकर्षाने दिसून येतात. रसिकांना खिळवून ठेवण्याची कला, थ्रिलर, अनपेक्षित ट्विस्ट अँड टर्न आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चित्रपटातील गती या सार्‍या निरजच्या वैशिष्ट्यांची कमतरता ‘रूस्तम’मध्ये जाणवते. पण तरीही इतर कलागुणांच्या जोरावर ‘रूस्तम’ नक्कीच बाजी मारून जातो, हे विशेष!

नौदलात अधिकारी असणारा रूस्तम पावरी (अक्षय कुुमार) अचानक सुट्टी मिळाल्याने घरी येतो. घरी आल्यावर त्याला आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळते. तिचा प्रियकर हा आपलाच मित्र असल्याचे कळाल्यावर तो अधिक अस्वस्थ होतो आणि थेट त्याच्याच घरी जाऊन त्याला गोळ्या झाडतो व पोलिसांना शरणही जातो. ही तर ‘ओपन अँड शट’ केस आहे, त्यात फार तपास करण्याचीही गरज नाही; असं आपल्याला वाटू शकतं. पण इथेच तर खरी गमंत आहे. पहिल्या काही मिनिटांमध्ये खून झाल्यानंतर हळू हळू चित्रपट त्यामागची पार्श्‍वभूमी उलगड जातो. चित्रपट पुढे जात असताना दिग्दर्शक आपल्याला काही हिंट देतो आणि त्यावर आपल्या मनातील तर्क-वितर्क सुरू होतात.

रूस्तमची बायको सिंथ्या (इलियाना डिक्रुज), आणि तिचा प्रियकर विक्रम मख्खिजा (अर्जन बाजवा) यांच्यात नेमके काय संबंध असतात, विक्रमला रूस्तमचा मारतो की दुसरं कोणी, विक्रमला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची बहीण प्रिती (ईशा गुप्ता) काय खेळी करते, इन्सपेक्टर लोबो (पवन मल्होत्रा) खूनाच्या मुळापर्यंत जातो का, जनसामान्यांकडून रूस्तमला सहानभूमी मिळवून देण्यासाठी ‘ट्रुथ’ हे वर्तमानपत्र कशी भूमिका बजावतं या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरं चित्रपटातून अलगदपणे आपल्याला मिळत जातात. प्रितीचा वकील (सचिन खेडेकर) व रूस्तम यांच्यात न्यायालयातील जुगलबंदी रंगतदार झाली आहे. कारागृहात असताना लोबो आणि रूस्तम बुद्धिबळ खेळत असतात त्यावेळी रूस्तमच्या तोंडी एक संवाद आहे. रूस्तम म्हणतो, “मतबल बाजी जितने से है, फिर चाहे प्यादा कुरबान हो, या रानी’’ हा संवादच आपल्याला अनेक गोष्टींची उकल करून देतो. त्याकाळातील मुंबईतील जनजीवन, लोकांचे कपडे, गाड्या, पारसी आणि सिंधी समाजाची प्रतिमा आदी गोष्टींसाठी कला दिग्दर्शकाचेही विशेष कौतुक करायला हवे.

अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुुमार पासून अगदी उषा नाडकर्णीपर्यंत सर्वांनीच आपले शंभर टक्के यासाठी दिले आहेत. अक्षयने नौदलाचा अधिकारी अतिशय खुबीने रंगवला आहे. त्याची चालण्याची पद्धत, त्याची शिस्त, बोलण्यातील कडक पणा, बायकोप्रती नजरेतून जाणवणारे प्रेम प्रसंगी राग या सार्‍या गोष्टी अभिनयातून त्याने अक्षरश: जागवल्या आहेत. ईलियानाला फार वाव नाहीये परंतु आहे तितक्या सीनमधून तीने अधिक सुंदर दिसून प्रेक्षकांवर छाप टाकली आहे. ईशाने श्रीमंत खानदानातील घमंडी मुलीची व्यक्तिरेखा उत्तम साकारलीये. त्याचबरोबर वृत्तपत्राचा संपादक कुमुद मिश्रा, अर्जान बाजवा, पवन मल्होत्रा, सचिन खेडेकर यांच्या भूमिकाही उत्तम!

अशा प्रकारच्या कथांना थोडा वेग आवश्यक असतो अस मला वाटतं. ‘रूस्तम’ मात्र तो वेग पहिलेपासूनच कायम ठेवण्यात अपयशी ठरला आहे. कथा-पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन यासर्व बाबतीत उणीवा काढता येणार नाहीत परंतु एकूणच चित्रपटाची लांबी आणि विशेषत: लाबंलेला क्लायमॅक्स थोडासा कंटाळवाणा वाटतो. ‘तेरे बीन यारा’ हे गाणं खरोखरीच अप्रतिम झालं आहे. खरतर या आठवड्यात ‘रूस्तम’सोबतच मनोरंजनाचे आणखीन दोन-तीन पर्याय उपलब्ध आहेत. पण तरीही प्रेक्षकांनी यातून ‘रूस्तम’ला प्रथम प्राधान्य द्यावे, इतपत हा चित्रपट सर्व पातळ्यांवर यशस्वी झाला आहे.
----