लेखाचे शीर्षक वाचून थोडं संभ्रमात पडला असताल ना? म्हणूनच तुम्हाला अधिक संभ्रमात न टाकता पहिल्या वाक्यातच थेट सांगून मोकळा होतो की ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या मराठी चित्रपटात तुम्हाला काहीच नवीन गवसणार नाही, याउलट तुमचे पैसे आणि वेळ या गोष्टी नाहक वाया जातील. आपण चित्रपट अनेक गोष्टींसाठी पाहत असतो परंतु या अनेकांपैकी फक्त अभिनयाच्या पातळीवरच हा चित्रपट सरस ठरला आहे. दिग्दर्शन, मांडणी, संगीत (त्यातल्या त्यात श्रवणीय), कथा, पटकथा आदींची पाटी कोरीच असल्याचे जाणवते.
औरंगाबादमध्ये राहणार्या मानस व मुग्धाचे ब्रेकअप होते आणि तिथून चित्रपट सरधोपट पद्धतीने सुरू होतो. आयुष्यातील कोणत्याही एखाद्या घटनेने आपल्याला खूप एकटेपणा जाणवतो, त्यातून नैराश्याची भावना निर्माण होते व त्याचे रूपांतर अगदी आत्महत्येपर्यंतही जाऊ शकते. अशाच एकटं पडलेल्या अनेकांच्या मनातील गोष्टी ऐकून घेण्यासाठी, त्यांना जगण्याची नवी उमेद देण्यासाठी मानस (सिद्धार्थ), नैना (स्पृहा जोशी), मारूती (मंगेश देसाई) व श्रीरंग काका (मोहन आगाशे) एकत्र येऊन ‘अँटी लोनलीनेस प्रोग्रॅम’ सुरू करतात. इथपर्यंत सगळं ठीक चाललेलं असतं, पण त्यानंतर ज्या गोष्टी पडद्यावर घडतात त्या नेहमी कोणत्या ना कोणत्या चित्रपटाची आपल्याला सातत्याने आठवण करून
देतात. एखादे उदाहरण द्यायच झालं तर ‘मुुन्नाभाई एमबीबीएस’च नाव लगेच डोळ्यासमोर येतं. नावीन्य नावाची कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत चित्रपटात शोधूनही सापडत नाही. एक चित्रपट म्हणून किमान मनोरंजनाची पातळीही गाठण्यात अयशस्वी झालेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’मध्ये अनेक त्रुटी आढळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या हायटेक युगात ‘अँटी लोनलीनेस प्रोग्रॅम’ची माहिती देण्यासाठी ही सर्व मंडळी घरोघरी लिफलेट
घेऊन जातात, हे जरा अतीच वाटतं. मान्य आहे तुम्हाला ‘व्हर्च्युअल’ जगायचं नाहीये, पण सोशल मीडियाचा वापर केला असता तर ते अधिक लोकांपर्यंत काही क्षणात पोहचू शकले असते. कथेची गरज म्हणून की काय, पण चित्रपटातील चारही कलाकार एकटे राहात असल्याचे दाखवले आहेत, पण ते जुळवून आणल आहे जाणवल्याशिवाय राहात नाही. शिवाय हे सामाजिक कार्य करताना मानस, मारूती आणि नैनाच्या कामाचा बहुदा बोर्याच वाजला असावा. कारण संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत मानस त्याचे दुकान उघडताना आणि नैना शिक्षिका म्हणून शाळेत जाताना एकदाच दाखविण्यात आले आहे, तेही एका गाण्यातून. ‘ये ना जरा’ या गाण्यातून पुन्हा एकदा काजोल-शाहरूखची ‘ती’ पारंपारिक आठवण करून देण्याची काहीच आवश्यकता नव्हती. यातून आपण अजून किती जुन्या गोष्टी फॉलो करतो हे दिसून येते. याशिवाय आणखी अनेक गोष्टी आहेत, ज्या मनाला खटकतात, पण माझ्या लिहिण्याला आणि तुमच्या वाचण्यालाही मर्यादा आहेत.
गतवर्षी आलेल्या ‘स्लॅमबुक’नंतर दिग्दर्शक आणि लेखक ऋतुराज धालगुडे याचा हा दुसरा चित्रपट. पहिला चित्रपट पाहण्यात आला नव्हता, दुसरा पाहिला आणि त्यामुळे त्याचा तिसरा (देवदास) चित्रपट बघण्याचे धाडस करणे जरा मोठे आव्हानच वाटते. तरी देखील मंगेश देसाईच्या अभिनयासाठी आपण तो पाहू शकतो. ‘लॉस्ट अँड फाऊंड’मध्ये सिद्धार्थ व स्पृहाने आपली भूमिका चोख वठवलीये, मंगेश देसाई आणि मोहन आगाशेंचा अभिनय मात्र अधिक उठावदार झाला आहे. गाणी व पार्श्वसंगीत तसेच चित्रपटातील काही खुमासदार विनोद (तेही मंगेश व आगाशेंच्याच तोंडीचे) त्यातल्या त्यात दिलासा देतात. बाकी सारं रामभरोसे...