आम आदमी पक्षाची शोकांतिका

    27-Jul-2016
Total Views | 2

 


‘वाहवत जाणे’ म्हणजे काय याचा शब्दशः प्रत्यय ‘आप’ अर्थात आम आदमी पक्षाच्या सध्याच्या वाटचालीवरून येतो आहे. २०१४ पूर्वी देशातील राजकीय परिस्थितीमुळे जनतेची सहनशीलता उद्रेकाच्या टोकावर पोहोचलेली असताना त्या महत्वाच्या टप्प्यावर आम आदमी पक्षाची स्थापना झाली होती. स्थापनेपासून, आपल्या नावातून, आणि आपल्या देहबोलीतून या पक्षाने देशातील ठराविक वर्गातील जनतेच्या अपेक्षा कमालीच्या उंचावल्या होत्या. प्रचलित आणि प्रस्थापित राजकारणापेक्षा वेगळे राजकारण आपच्या माध्यमातून होईल अशा आशा पक्षाने निर्माण केल्या होत्या. ‘न्यू पॉलिटीक्स’ असं काहीतरी पटकन न समजणारं पण गोड गोंडस वाटेल असं नाव या सगळ्या प्रक्रियेला दिलं गेलं होतं. योगेंद्र यादवांसारखा एक लोकप्रिय आणि आदरणीय असा अभ्यासक-विचारवंत आपच्या स्थापनेपासून जीवाचं रान करत होता. पण ते तसं होणारच नव्हतं बहुधा.

मुळात सध्याच्या भारतीय राजकारणात तळागाळातील सर्वसामान्य माणसाला देशाच्या उच्चपदापर्यंत घेऊन जाऊ शकतील, तशी संधी उपलब्ध करून देऊ शकतील असे दोनच पक्ष किंवा विचारधारा. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा कम्युनिस्ट पक्ष. पैकी दुसरा स्वतःच्या कर्माने क्षीण झालेला. तर पहिला तथाकथित ‘सांप्रदायिकतावादा’चा शिक्का बसल्याने एका ठराविक वर्गाच्या टीकेचा विनाकारण बळी ठरलेला. अशा परिस्थितीत कोणताही शिक्का नसलेला, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, सामान्यांना, किमान त्यातील काही टक्क्यांना आवडेल अशी भाषा बोलणारा आम आदमी पक्ष व त्यांचा नेता अरविंद केजरीवाल लोकांना आकर्षित न करता तरच नवल. पण दिल्ली विधानसभा निवडणूक (पहिली) इथपासून जे काही या पक्षाचं घोडं चिखलात रुतलं कि ज्यातून आशेने पाहणाऱ्या लोकांच्या त्या अशा पार धुळीला मिळाल्या. त्या नंतर गेल्या दोन-तीन वर्षांत आपच्या व केजरीवालांच्या राजकीय कारकिर्दीत तशी बरी गेली. दुसऱ्या दिल्ली निवडणुकीत त्यांनी भव्य असं यश मिळवलं. येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पंजाब व गोवा अशा दोन राज्यांमध्ये चंचूप्रवेशाची शक्यता निर्माण झाली. मात्र नेता केजरीवाल आणि अन्य पक्ष कार्यकर्ते यांच्या वर्तनामुळे, धोरणामुळे जे वेगळेपण आपने आधी जाहिरात करून करून मिळवलं होतं ते अक्षरशः धुळीस मिळालं. आणि त्याच बरोबर लोकांच्या त्या अपेक्षासुद्धा. याचं ताज उदाहरण म्हणजे आपचे खासदार भगवंत मान याचं वर्तन आणि त्यामुळे पक्षाची झालेली नाचक्की.

विनोदी अभिनेता (?) असलेले भगवंत मान यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने पंजाबातून उमेदवारी दिली आणि आपलं वेगळेपण दाखवून दिलं. मान निवडूनही आले. पण एवढ्यावर थांबतो तो आम आदमी पक्ष कसला. मान यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा संसद भवनातील आपल्या आगमनाचा व्हिडिओच इन्टरनेटवर टाकला. विनाकारण असले प्रसिद्धीचे स्टंट करून मान यांनी आपल्या नेत्याचं अनुकरण केलं खरं, पण त्यातून निलंबनाची कारवाई ओढवल्याने सामन्यांचा आम आदमी पक्ष किती ‘सामान्य’ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

भगवंत मान यांच्या निमित्ताने आम आदमी पक्ष चर्चेत येणं आणि माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांचा आपमधील संभाव्य प्रवेश चर्चेत येणं या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटाव्यात इतक्या योगोयोगाने घडलेल्या या घटना आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने रुसलेले आणि राज्यसभा सदस्यत्वाने खुश न झालेले सिद्धू कधी न कधी खटका वाजवणारच होते. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या नाराजीचं कारण देताना ते म्हणाले भाजपने मला पंजाबपासून दूर ठेवले, मी पंजाबपासून दूर राहू शकत नाही त्यामुळे मी भाजपवर नाराज आहे. म्हणजे नेमकं काय ते कोणालाच समजलं नाही पण मध्यंतरी आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सिद्धू असल्याच्या बातम्यांवरून ते थोडंफार समजू शकतं. सिद्धू, केजरीवाल आणि आप यांची एकूण कारकीर्द पाहिल्यास हे ‘कॉम्बीनेशन’ अगदीच छान जुळून येणार आहे असं दिसतं. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी समजा उद्या चुकून सिद्द्धू पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि तेही आपतर्फे, तर परिस्थिती किती भयानक असेल याचा अंदाज आताच लावण्यास हरकत नाही.

केजरीवाल यांच्यावर सोशल मिडियावरून कधीकधी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जाते. ती कोणत्याही सुबुद्ध माणसाला पटणार नाही अशा दर्जाची असते. पण तेवढा भाग सोडल्यास केजरीवाल आणि आप यांची जी प्रतिमा जनतेच्या मनात आहे त्याचंच प्रतिबिंब सोशल मिडियावर उमटत असत हेही तितकंच खरं. एका किमान वरकरणी चांगल्या भासणाऱ्या प्रयोगाची ही चालू असलेली शोकांतिका दुर्दैवी आहे. भगवंत मान हा त्यातला ताजा अंक. आधीही जे काही चांगले, डोकं तळ्यावर असलेले लोक होते, ते केव्हाच दूर निघून गेले. यादवांवर तर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आली. यापुढे निवडणुकांत यश मिळेल न मिळेल, आपचं ह्या प्रकारचं अधःपतन पाहून आणखी जणांवर अश्रू ढाळण्याची वेळ येणार आहे हे मात्र नक्की. शेवटी आभासाचा फुगा कितीही फुगवला तरी कधी ना कधी फुटतोच हे या साऱ्या घटनांवरून सिद्ध होतं आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंचा युतीबद्दल

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121