
आई-मुलाचं अतूट नात संपूर्ण जगाला माहित असतं, पण बाप-मुलाच्या नात्यावर खूप कमी वेळा लिहलं, वाचलं आणि बोललं जातं नाही. विशेषत: ‘सिंगल पँरेंटिंग’द्वारे तब्बल सात वर्ष अंगाखांद्यावर खेळवलेल्या मुलाच आणि वडिलांचं नात खूपच वेगळं असतं. याच प्रेमळ, लडीवाळ नात्याचा अचानक जेव्हा शेवट होतो तेव्हा बापाच्या भूमिकेतील तो सामान्य व्यक्ती सामान्य राहत नाही. तो सैरावरा होतो, हट्टाला पेटतो आणि खेळ सुरू होतो तो ‘मदारी’चा...
‘कॉमन मॅन’चा धागा पकडून निशिकांत कामतने पुन्हा एकदा ‘मदारी’तून व्यवस्थेविरूद्धचा संघर्ष मांडला आहे. यावेळी त्याने थेट व्यवस्थेतील मुख्य व्यक्तीलाच टारगेट केल्याचे दिसते. मुंबईतील एका अपघातात आपल्या सात वर्षाच्या मुलाचा प्राण गमाविलेला निर्मलकुमार (इरफान खान) या घटनेचा बदला घेण्यासाठी आणि भ्रष्ट व्यवस्थेला उघड करण्यासाठी थेट देशाच्या गृहमंत्र्याच्याच (तुषार दळवी) मुलाचे अपहरण करतो. आपला उद्देश पूर्ण होईपर्यंत तो या व्यवस्थेला मदारीसारखं आपल्या तालावर नाचवतो आणि चित्रपटाचा शेवटही व्यवस्थेच्या चौकटीतलाच होतो.
सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मदारी’ची सुरूवात अत्यंत वेगवाग हालचालींनी होते. डेहराडूनमधील एका बोर्डींग स्कूलमधून निर्मलकुुमार गृहमंत्र्याच्या मुलाचे अपहरण करतो आणि डेहराडूनपासून सुरू झालेला त्याचा प्रवास राजस्थान, मध्यप्रदेश, मुंबई असा अखेरपर्यंत चालू राहतो. दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि मुलाला सुखरूप परत आणण्यासाठी ‘सीबीआय’ ऑफिसर नचिकेतची (जिमी शेरगील) नेमणूक करण्यात येते. एकीकडे निर्मलकुमारचा त्या लहानग्या सोबतचा आपल्या चांगल्या-वाईट आठवणींसोबतचा प्रवास आणि दुसरीकडे गुन्हेगाराला शोधण्यासाठी जिमीच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या यामध्ये ‘मदारी’ हळूहळू पुढे सरकत जातो. परंतु जी गती सुरूवातीला असते ती कायम ठेवण्यात चित्रपट अपयशी ठरला आहे.
एखाद्या कमकुवत पुल बांधण्यासारख्या गोष्टींमधून सरकार किती आणि कशापद्धतीने भ्रष्टाचार करते आणि त्याचा सामान्यांच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो हेच दाखविण्याचा ‘मदारी’ने प्रयत्न केला आहे. तांत्रिक गोष्टीत माहिर असलेला आणि शांत चित्ताने नियोजित उद्देशाच्या दिशेने वाटचाल करणारा सामान्यमाणूसही संपूर्ण व्यवस्थेला कशा पद्धने वेठीस धरू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मदारी’. ‘कहानी सच्ची नही लगती लेकीन खुदा कसम अच्छी लगती है’, ‘आठ साल के बच्चे को भी पता है पॉवर क्या चीज है’, ‘तुम मेरी दुनिया मुझसे झीनों गे, तो मै तुम्हारे दुनीयाँ मै घुस जाऊंगा’ असे काही संवाद उत्तम प्रकारे सादर केले आहेत. इरफानच्या अभिनयाचा दर्जा दिवसेंदिवस उच्च पातळी गाठत आहे. ‘मदारी’मध्ये तर त्याचा अभिनय अनेक प्रसंगातून केवळ डोळ्यातूनच दिसून येतो, हे विशेष. हा कलाकार खास अशाच भूमिकांसाठीच बनला असावा अस मला वाटत. जिमी शेरगिलचा प्रेझेंसच नेहमी सुखकारक असतो, त्यातून तो पोलिस अधिकारी असला तर मग तो अधिकच भावतो. राहून राहून एवढच वाटत की, त्याचा सारखा प्रतिभावान कलाकार आज या सृष्टीमध्ये एवढा मागे राहीला कसा? असो, बाकी तुषार दळवी आणि उदय टिकेकर (आपले बाबाजी) यांनी आपले काम चोख बजावले आहे. छोट्या मुलाची भूमिका साकारणारा विशेषही उत्तम.
‘मदारी’मधल्या न पटणार्या गोष्टींबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपटाचा नायक जंगलात, वाळवंटात, ग्रामीण भागात कुठेही असताना ‘आयपॅड’वर त्याला नेटची रेंज कशी बुवा मिळते हा प्रश्न आपसुकच उपस्थित होतो (कदाचित अप्रत्यक्षरित्या आम्ही तुमची जाहिरात करू असं आश्वासन निशिकांतने ‘एअरटेल’ला दिलं असावं.) दुसरी गोष्ट म्हणजे ‘सीबीआय’ किंवा त्यासाठी काम करणारे अधिकारी एवढे श्रीमंत कधी झाले की, ते उठसूठ हेलिकॉप्टरमधून प्रवास करू शकतील? चित्रपटातील संगीतही मनाला फार भावणारे नाही त्यातल्या त्यात ‘डमा डमा डम’ हे गाण फारच अंगावर येतं. यापेक्षा सुरूवातीला मदारी जे डमरू वाजवतो ते बॅकग्राऊंडचे म्युझिक मोजक्या प्रसंगांमध्ये पेरलं असतं तर ते रसिकांना जास्त आवडलं असतं.
अभिनयातील दर्जा सोडला तर ‘मदारी’चा संपूर्ण परफॉर्मन्स सारखा कुठे तरी खटकत राहतो. शेवटही यापेक्षा अधिक प्रभावी किंवा काहीतरी वेगळा करता आला असता असं वाटत राहतं. भ्रष्ट व्यवस्थेची जनतेसमोर पोल-खोल करणारा ‘मदारी’ हा पहिला सिनेमा नाही. याआधी ‘क्रांतीवीर’, ‘मैं हूँ आझाद’, ‘घायल’, ‘नायक’ पासून ते अगदी ‘रंग दे बसंती’पर्यंत अनेक चित्रपटातून हा विषय मांडण्यात आला आहे. यामध्ये ‘मदारी’च वेगळेपण एवढचं की कोणत्याही हाणामारीशिवाय शांत डोक्यानेसुद्धा सामान्य माणूस बदल घडवू शकतो हे यामध्ये दाखविले आहे. परंतु स्वत: इरफानने त्याच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत की, “एक चित्रपट कधीही व्यवस्था बदलू शकत नाही, त्यासाठी संघटित होणं आणि मानसिकता बदलणं गरजेचं आहे.’’ त्यामुळे काहीतरी वेगळ बघायला मिळेल या आशेने ‘मदारी’पाहायला जाणार असाल तर जाऊ नका...पण इरफान खान आणि निशिकांत कामतचे जबर्या फॅन असाल तर त्यांचा हा परफॉर्मन्स चुकवूही नका!