माधव आपटे आणि विजय साळगावकर ही नाव आठवताय का हो? पहिलं नाव तर आपल्यापैकी अनेक मराठी जनांना आजही आठवत असेल आणि दुसर्या नावाचा संदर्भही अगदी ताजाच आहे. अगदीच सामान्य आयुष्य जगणारे आणि आहे त्यामध्ये सुखी असणारे आपटे आणि साळगावकर यांचे कुटुंब पण अचानक त्यांच्या आयुष्यात अघटीत घडते आणि सुरू होतो संघर्ष... स्वत: बरोबरच कुटुंब रक्षणाचा आणि व्यवस्थेविरुद्धचा... सध्याच्या शंभर कोटींच्या क्लबच्या स्पर्धेतही सातत्याने ‘कॉमन मॅन’चा व्यवस्थेविरूद्धचा संघर्ष निशिकांत कामत मांडत आला आहे आणि हेच त्याच्या यशाचे मोठे वैशिष्ट्य आहे.
माथेफिरू, की ग्रासलेला सामान्य व्यक्ती
ज्या चित्रपटाने निशिकांत कामतला ओळख मिळवून दिली त्या ‘डोंबिवली फास्ट’चा नायक म्हणजे माधव आपटे (संदीप कुुलकर्णी). आता नक्कीच आठवला असेल हातात क्रिकेटची बॅट घेऊन रस्त्यावर उतरलेला माधव, पाण्यासाठी टँकरवाल्यांशी भांडणारा माधव, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर बंदुक धरणारा माधव आणि रेल्वेमध्ये पोलिस अधिकार्याच्या बंदुकीतील गोळी खाऊन खिडकीतल्या सीटसाठी शेवटची इच्छा व्यक्त करून निपचित पडलेला माधव... तो माथेफिरू नव्हता तर, या व्यवस्थेला कंटाळलेला तो तुमच्या आमच्या सारखाच एक ‘कॉमन मॅन’ होता.
प्राधान्य कुटुंबाला
दुसरं नाव विजय साळगावकर. मागील वर्षी प्रदर्शित झालेला अजय देवगणची प्रमुख भुमिका असलेला ‘दृश्यम’ या हिंदी चित्रपटातील ही व्यक्तिरेखा. केबल नेटवर्क चालवणार्या एक सामान्य मनुष्याच्या आयुष्यात एक अविश्वसनीय घटना घडते आणि त्या घटनेतुन आपल्या कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी हा सामान्य माणूस आपले सर्वस्व पणाला लावतो. हे करताना काय बरोबर आणि काय चुक यापेक्षा त्यानी कुटुंबाच्या सुरक्षेला दिलेल्या प्राधान्यामुळे ‘कॉमन मॅन’चे प्रतिबिंब अधिक ठळकपणे स्पष्ट होते. ‘दृश्यम’ नावाच्या तेलगू चित्रपटाचाचे हे हिंदी व्हर्जन होतं. परंतु चित्रपटाची निवड करतानाही निशिकांत ‘कॉमन मॅन’लाच नेहमी केंद्रस्थानी ठेवत असतो, हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल होतं.
संघटित लढा
दरम्यान निशिकांतने ‘मुंबई मेरी जान’, ‘फोर्स’, ‘लय भारी’ व ‘रॉकी हँडसम’ सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले. यातील ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘फोर्स’ चित्रपटांचे प्रेक्षक तसेच समीक्षकांनी विशेष कौतुक केले. यामध्ये दहशतवाद आणि डॉनविरूद्धचा संघटित लढा दाखविण्यात आला होता. जशी ‘डोंबिवली फास्ट’ने निशिकांतला एक स्वतंत्र्य ओळख निर्माण करून दिली तसेच ‘मुंबई मेरी जान’ने हिंदी चित्रपट सृष्टीत त्याचे वेगळे अस्तित्त्वच निर्माण केले. या यशाचे कारण होते त्याने केलेली विषयाची निवड.. ‘मुंबई मेरी जान’चा विषय लोकांना आपलासा वाटला आणि त्याची मांडणीही अतिशय भावली.
बी-टाऊनचे वारे
मध्यंतरीच्या काळात निशिकांतला बी-टाऊनचे वारे लागले आणि तो मसालापटांकडे थोडा झुकल्याचे जाणवले. ‘लय भारी’ आणि ‘रॉकी हँडसम’ हे चित्रपट मात्र त्याच्या ‘कॉमन मॅन’च्या प्रतिमेस साजेसे नसून तद्दन मसालापट होते. यातील ‘लय भारी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केले परंतु ‘रॉकी हँडसम’ला तेवढेही जमले नाही. या चित्रपटांमध्येही ‘कॉमन मॅन’चा आपल्या हक्कांसाठी संषर्घ होताच की, पण तो खरच आपलासा वाटला नाही. चित्रपटातला नायक दहा-बारा लोकांशी फायटिंग करतो आणि अखेर आपल्याला जे हवे आहे ते साध्य करतो याला वास्तववादी ‘कॉमन मॅन’ थीम म्हणता येणार नाही. ‘कॉमन मॅन’चे जे वास्तववादी आयुष्य ‘डोंबिवली फास्ट’ व ‘दृश्यम’मधून दिसलं ते वास्तव दाखविण्यात ‘लय भारी’ व ‘रॉकी हँडसम’ साफ अपयशी ठरला. परंतु आता पुन्हा तो त्याच्या ‘कॉमन मॅन’चे बोट धरून ‘मदारी’च्या रूपाने रसिकांसमोर येत आहे... थरारकता, उत्सुकता आणि विषयाची उत्कृष्ट मांडणी ही वैशिष्ट्ये ‘मदारी’मधूनही बघायला मिळतीय अशी अपेक्षा आहे.
‘मदारी’ येतोय...
वेगळ्या भूमिका आणि दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या इरफान खानसोबत निशिकांत घेऊन येतोय ‘मदारी’! एका राज्यातील मुख्यमंत्र्याच्या मुलाचे या चित्रपटातील नायकच अपहरण करतो. तो असं का करतो, त्याच्या मुलाला या व्यवस्थेने कोणता धोका पोहचवला होता का?, नक्की चित्रपटात मदारी कोण आणि कोणाचं माकड होणार आहे असे अनेक प्रश्न ‘ट्रेलर’ पाहिल्यावर उपस्थित होतात. परंतु एक धागा मात्र पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर येतो; तो म्हणजे ‘कॉमन मॅन’ आणि त्याचा व्यवस्थेविरूद्धचा प्रखर लढा.
या विषयाचा तगडा अनुभव असणारा निशिकांत आणि सर्वोत्तम अभिमनाची कुवत असलेला इरफान ही जोडगोळी ‘मुंबई मेरी जान’ नंतर पुन्हा एकदा रसिकांवर गारूड घालण्यासाठी सज्ज झाली आहे. तत्पूर्वी ‘मदारी’चा विशेष 'शो' मुंबईत बुधवारी दाखविण्यात आला. तो बघितलेल्या या क्षेत्रातील मान्यवरांनी या चित्रपटाचे, इरफानच्या अभिनयाची आणि निशिकांतच्या दिग्दर्शनाचे विशेष कौतुक केलेलं आहे. यामध्ये हंसल मेहता, अनुभव सिन्हा, रघुवेंद्र सिंग, अशोक पंडित आदींचा यामध्ये समावेश आहे. येत्या शुक्रवारी (22 जुलै) ‘मदारी’ सर्वसामान्य जनतेसाठी प्रदर्शित होईल, तोपर्यंत माधव आपटे आणि विजय साळगावकरच्या रूपातील ‘कॉमन मॅन’च्या आठवणी संबंधित व्हिडिओ पाहून आपण ताज्या करू....