मेनस्ट्रीम मीडियामध्ये बातमी आलीये म्हणजे खोटीच असेल

    18-Jul-2016   
Total Views |
 
एक काळ असा होता की लोक पेपरमध्ये छापून आलेल्या बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. एकूणच पत्रकारिता ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल सामान्य जनतेला आदर होता. पण गेल्या काही वर्षात पारंपरिक प्रसार माध्यमांची विश्वासार्हता पार रसातळाला पोचली आहे. 'मेनस्ट्रीम मिडिया मध्ये बातमी आलीये ना, मग ती खोटीच असेल', असं लोक सोशल मीडियावर ठामपणे बोलून दाखवत आहेत. एकूणच सोशल मीडियावर वावरणाऱ्या जागरूक नेटीझन्स मुळे पत्रकारितेतल्या थापा, खोटारडेपणा, अर्धसत्य लिहिणं, राजकीय अजेंडा राबवत लिहिणं ह्या गोष्टी नियमितपणे एक्स्पोझ होत आहेत. अर्थात ह्याला पत्रकारितेच्या नावाखाली आपला वैयक्तिक वा राजकीय स्वार्थ साधणारे पत्रकारच सर्वस्वी जबाबदार आहेत.
 
सध्या काश्मीर मध्ये निष्पक्ष पत्रकारितेच्या नावाखाली आपल्या सैन्याला बदनाम करण्याचे आणि दहशतवाद्यांचे अवडंबर माजवण्याचे जे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत त्यामधून अश्या पत्रकारांची भाडोत्री वृत्ती चांगलीच दिसून येते. शेकडो काश्मिरी युवकांना हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या बुऱ्हान वणी ह्या कट्टर दहशतवाद्याला भारतीय सैन्याने ठार केलं, त्या बुऱ्हान वणीची तुलना  राजदीप सरदेसाई ह्या पत्रकाराने चक्क महान क्रांतिकारक भगत सिंगशी केली तर बरखा दत्तने लगेचच बुऱ्हान कसा सामान्य घरातला हुशार मुलगा होता, त्याचे वडील एक गरीब हेडमास्टर कसे होते वगैरे मुद्दे मांडून हे दहशतवादाचं कडू कारलं साखरेत घोळवायचा प्रयत्न केला.
 
कोब्रापोस्ट नामक एका सनसनाटी बातम्यांना वाहिलेल्या वृत्तसंस्थेने तर कहरच केला, एक पाच वर्षे जुना व्हिडिऑ  आत्ताचा  ताजा व्हिडिओ  म्हणून शेअर केला, तर काही पत्रकारांनी पेलेस्टिन मधल्या पेलेट गनने जखमी झालेल्या तरुणांचे फोटो काश्मीरमधले फोटो म्हणून खपवायचा प्रयत्न केला. दहशतवादी तरुण काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर तुफान दगडफेक करतायत, दगडांच्या आडून सैनिकांवर बॉम्बगोळे फेकले जातात आणि आपले सैनिक कुठेही गोळी न चालवता अत्यंत संयमाने ह्या परिस्थितीला तोंड देताहेत हे जणू ह्या पत्रकारांना दिसतच नाही.  
 
निःष्पक्ष, निःस्पृह आणि स्वतंत्र पत्रकारितेला लोकशाहीचं चवथं अंग मानलं जातं पण आजकालची परिस्थिती बघता निदान भारतात तरी पारंपारिक प्रसार माध्यमं पंचमस्तंभी होत चालली आहेत की काय अशी शंका येते. ही परिस्थिती प्रसारमाध्यमांच्याही हिताची नाही आणि लोकशाहीच्याही!
    

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.