
इतिहासातील काही क्षण असे असतात कि जे केवळ इतिहासच बदलत नसुन भूगोल देखील बदलतात. १९७१ सालचा १६ डिसेंबर हि केवळ कॅलेंडरवर छापील एक तारीख नसून इतिहासाच्या छातीवर कोरलेला भारतीय सेनेच्या पराक्रमाचा अमीट हस्ताक्षर आहे. या तारखेने केवळ इतिहासात नोंद घेतली नसून जगाला एक नवीन देश स्वतंत्र करून देऊन आपले भूगोलातही स्थान मिळविले आहे. स्वतंत्रतेचे आपले एक अनोखे मोल असते. ते अनेकांच्या त्याग आणि बलिदानानंतर प्राप्त होत असते. या सर्वांची जाण अनेक देशांना आहे, त्याचे आज स्मरण करण्याचे कारण म्हणजेच विजय दिवस.
युद्ध पार्श्वभूमी
१९७० च्या दशकांत पाकिस्तानातील राजकारण धुमसत होते, पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तानातील दुरावे दिवसेंदिवस वाढत जाऊन त्यात प्रचंड मोठा कलह निर्माण होत होता. अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळून देखील तेथील सत्तास्थापानाची दारं बंद केली गेली. स्थानिक अस्मितेला ठेचून काढण्याचा पश्चिम पाकिस्तानचा हा एक प्रयत्न होता. ज्याचा परिणाम म्हणून पूर्व पाकिस्तानात भले मोठे जन आंदोलन सुरु झाले, ज्यात जनतेचा थेट संघर्ष सत्तेतील मंडळींशी होता. सत्तेचा माज चढलेल्या ह्या मंडळीने हा जन आक्रोश २५ मार्च १९७१ पासून सेनेच्या सहाय्याने ठेचणे सुरु केले. पाकिस्तानी सेना आपल्याच देशांतील नागरिकांवर अत्याचार करीत दैत्याचा थैमान मांडून बसली होती. जनरल टीका खान याने सुमारे ३ लाख पुर्व पाकीस्तानी नागरिकांची हत्या केली होती, ज्याने तेथिल नागरिकांमध्ये प्रचंड मोठी दहशत निर्माण झाली. याचा परिणाम म्हणून भारतीय सीमांवरचा भार वाढू लागला. ज्याने आसाम व पश्चिम बंगाल मधील शरणार्थी शिबिरात बांगलादेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. नोव्हेंबर १९७१ पर्यंत हि संख्या १ कोटीच्या आसपास गेली होती. हि संख्या भारतासाठीचा एक अधिकतम भार बनत जात होता. जो कि कुठल्याही दृष्टीकोनातून भरताला न परवडण्यासारखा होता. त्यामुळे तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी सारखा उल्लेख करीत असत कि पूर्व पाकिस्तानातील नागरिकांना आपल्या मायदेशी परत जावे लागेल. भारत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानाच्या भौगोलिक दृष्ट्या मध्ये असल्यामुळे त्या संघर्षाची विनाकारण कळ सोसत होता. त्यामुळे अंतरराष्ट्रीय समुद्यासमोर आपली व्यथा मांडणे भारतासाठी अपरिहार्ह्य बनले होते. भारताने जुलै ते नोव्हेंबर १९७१ मध्ये सातत्याने हा मुद्दा लाऊन धरला होता, मात्र याचा कोणताही तोडगा तेथून निघत नसल्यामुळे श्रीमती इंदिरा गांधी यांनी जनरल माणिक शाह यांची भेट घेउन अखेर युद्ध तयारीचे आदेश दिले.
भारतीय सैन्याचा पराक्रम
पाकिस्तानला या युद्धतयारीचा पुरता अंदाजा येऊन तेथून कुरापती करणे सुरु देखील झाले होते. पाकिस्तानी रणनीती नुसार त्यांना भारतीय सैन्याला पश्चिमी सीमेवर गुंतवून ठेवायचे होते, परंतु भारतीय सेना आपले संपूर्ण लक्ष पूर्वेकडील सीमेवर लावून बसली होती. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५:४० ला पाकिस्तानी वायू सेनेने भारतीय वायुसेनेच्या ११ तळांवर अचानक हल्ला केला. त्यांचा हेतू वायू सेनेला कमजोर करण्याचा होता, परंतु तसे न होता भारतीय सेनेने सीमांवरील सुरक्षा अधिक वाढवली. तेव्हाच इंदिरा गांधी कलकत्त्यातील एका जनसभेतून थेट दिल्लीत दाखल झाल्या, आणि मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून मध्यरात्री युद्धाची घोषणा केली. ५ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा भारतीय सेनेचे संपूर्ण लक्ष पूर्व पाकिस्तानवर होते तेव्हाच पश्चिमी सीमेकडून पाकिस्तानने राजस्थानच्या लोन्गेवाला येथे हल्ला केला. तेथे भारतीय सेनेची केवळ १२० लोकांची तुकडी बाजी लढवीत होती, सकाळी वायू सेनेच्या मदतीने पाकिस्तानी रसदिसह सैनिकांचा संपूर्ण नयनाट झाला. पहिल्या पराभवामुळे पाकिस्तानने आपली संपूर्ण शक्ती यात झोकाण्याचा निर्णय घेतला. भारतीय सेनेने नौदलाच्या सहाय्याने ‘ऑपरेशन ड्रायडेंड’ अंतर्गत कराची बंदरावर हल्ला चढवला. कराची बंदरावरूनच पश्चिम पाकिस्तान पूर्वेकडे आपल्या सैन्य तथा रसदीचा पुरवठा करीत असे. त्यामुळे कराचीचा हल्ला पाकिस्तानांच्या जिव्हारी लागला होता. तद्नंतर आसाम, त्रिपुरा आणि प. बंगाल अश्या तिन्ही बाजूंनी भारतीय सेनेने ढाक्यावर हल्ला चढविला ज्यात बंगलादेशातील ‘मुक्ती बाहिनी’ भारतीय सेनेच्या मदतीला होती. अश्याप्रकारे पाकिस्तानी सेना घेरली गेली असतानाच त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ढाकाकडे लावले, व तोच बिंदू भारतीय सेनेने पकडून धरला. १४ डिसेंबर १९७१ ला दुपारी भारतीय सेनेने ढाक्यातील एका इमारतीवर हल्ला केला, ज्यात पाकिस्तानी प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख बैठक चालली होती. या हल्ल्याने पाकिस्तानी सेनेत प्रचंड दहशत बसली असून त्यांचे मनोबळ देखील खच्ची झाले होते. १६ डिसेंबरला जनरल जगजीतसिंह अरोडा यांनी पाकिस्तानी जनरल नियाझी यांना शरणागतीचे आव्हान केले. पाकिस्तानी सैन्यापुढे अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी शरणांगती स्वीकारत शस्त्र खाली टाकले, आणि जगासमोर बांगलादेश नावाचा नवीन देश उदयास आला. तो क्षण भारतीय सेनेच्या पराक्रमी इतिहासातील एक मनाचा तुरा म्हंणून नेहमी ओळखला जातो.
आजची परिस्थिती
भारताने पाकिस्तानचे २ तुकडे करून भारताने आपली ताकत जगापुढे सिद्ध केली आहे. भारतासोबत झालेल्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला असल्यामुळे त्याला पुरते लक्षात आले आहे कि भारताला युद्धात हरवणे अशक्य आहे. त्यामुळे आता अन्य जिहादी मार्गाने भारतावर सातत्याने आक्रमण करणे सुरु केले आहे. २६/११, पठाणकोट, उरी हि त्याचीच प्रतीके आहेत. सध्या पाकिस्तानी राजकारण आता पुन्हा धुमसायला लागले आहे. बलुचिस्तान, सिंध इत्यादी प्रांतात बंडाचे वारे वाहत असताना भारताने आता पुन्हा १९७१ च्या विजय दिनाचे स्मरण करून इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते.
- हर्षल कंसारा
