खाद्यभ्रमंती- बटाटा इन रेड ग्रेव्ही

Total Views |
 


 
आज आपण पाहणार आहोत आपल्याच घरातल्या नेहेमीच्या साथीदाराला... म्हणजेच बटाट्याला एका वेगळ्याच रूपामध्ये..
 
त्याचं असं आहे बघा...कि आपण कसे रोज रोज वरण-भात-भजी-आमटी-कोशिंबीर -चटणी-लोणचे खावून खावून कंटाळतो आणि मग मस्त एकदा अचानक कधीतरी पावभाजी चेपायला जातो...
 
तसच आहे बघा हे काहीसं...
 
मसाल्या डोश्यातून, काचऱ्यातून , गुळ-चिंचेच्या रस्सा भाजीतून आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वडा-पाव मधून बटाटा आपल्या आयुष्याचा स्थायीभाव होवून राहिला आहे. 
आता या बटाट्याला सुद्धा कधीतरी या नेहेमीच्या रेसिपींचा कंटाळा येत असेलच ना नक्कीच...
 
नक्कीच........................
 
म्हणून आज मी ठरवलं कि जरा या बटाट्याला आज वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या मसाल्यांनी नटवूया..... वेगळ्या पद्धतीनी याची हौस पुरवूया...

 
आणि मग तयार झाली हि भन्नाट डिश...
 
चला तर मग साहित्य बघूया या डिश साठी लागणारे...
 

साहित्य 

बटाटे  - ३०० ग्राम्स किंवा साधारण १२ लहान टपोरे बटाटे
 
धने - २ मोठे चमचे 
 
जिरं - २ मोठे चमचे 
 
लसूण पाकळ्या - ८ मध्यम आकाराच्या (सोलत बसावा लागतो म्हणून लसूण खायचा आळस करू नका...तो उग्र असला जरा तरी अत्यंत बहुगुणी आहे आपल्या जेवणात )
 
चिंचेचा कोळ - ५  चमचे (या बटाट्यांना रंगवायला आणि आंबट करायला नंतर टोमाटो प्युरी सुद्धा येणार आहे त्यामुळे जास्त आंबट आवडत नसेल तर चिंचेचा कोळ ४ चमचे घेऊ शकतो...पण हि भाजी आंबटच  जास्त छान लागते...म्हणजे आम्हा सगळ्यांना आवडते...तुम्ही बघा तुम्हाला काय आवडत ते तसा चिंचेचा वापर करा) 
 
मध्यम आकाराच्या ६ टोमाटोची प्युरी (टोमाटो गरम पाण्यात उकडून घ्या , थंड झाले कि साल काढून पाणी न घालता मिक्सर मध्ये फिरवून घ्या ) 
 
कडीपत्याची पाने - १० मध्यम आकाराची 
 
तिखट - २ चमचे (आवडत असेल आणि चालत असेल तर हे तिखट जरा जास्त तिखट पावडर घेतली तरी चालेल कारण हि भाजी जरा हायर
 
साईड ला तिखट असली तरच जास्त छान लागते)
 
हिंग - चिमुटभर
 
तेल - ४  चमचे 
 
पांढरे तीळ - एक मोठा चमचा
 
दाणेदार साखर - १ चमचा 
 
मीठ - चवीनुसार...साधारण २ चमचे 
 
 

पाककृती  

सर्व बटाटे वाहत्या पाण्यात व्यवस्थित धुवून घ्या,,,आणि नंतर नीट उकडून घ्या (पूर्ण लगदा करू नये...उकडल्यावर बटाटे फर्म राहायला हवेत इतकेच उकडा, उकडून झाल्यावर एखाद्या बटाट्यात टोकदार काहीतरी काडी वगैरे घुसवून पहा...आत घुसवलेली काडी सदृश वस्तू तशीच्या तशी बाहेर आली आणि सोबत बटाट्याचा काहीच अंश बाहेर आला नाही तर समजा कि बटाटे नीट उकडले गेले आहेत.)
आता या सर्व बटाट्याची साले काढून बाजूला एका भांड्यात ठेवून द्या.
 
मिक्सरच्या लहान भांड्यात आता धने , जिरं आणि लसणाच्या पाकळ्या एखाद दोन वेळा फिरवून घ्या...पाणी न घालता आहेत तश्याच...आता हे मिश्रण एखाद्या वाटीत बाजूला ठेवा...
याच भांड्यामध्ये आता टोमाटोंची साले काढून हे टोमाटो एखाद दोन वेळा फिरवून प्युरी तयार करून घ्या,,,,गाळू नका...पल्प सकट प्युरी लागणार आहे आपल्याला या भाजीत.

 
आता पुढे.......जाड बुडाच्या भांड्यात ४ चमचे तेल घ्या आणि ते तापल्यावर त्यात चिमुटभर हिंग टाकून हलकेच परता. 
 
आता कडीपत्ता टाका......., पांढरे तीळ टाका........... बऱ्यापैकी परता आणि आता तिखट, साखर आणि मीठ टाका...
मस्त परता...

आता जो सुवास सुटणार आहे त्याने तुम्हाला जबऱ्या वाटायला सुरुवात झाली आहे....
पण आत्ताच घरच्या लोकांना जवळपास फिरकू देऊ नका...
खरी गम्मत त्यांना जेवणाच्या टेबलावरच घेऊ द्या...
मी तरी असेच करतो.... 

आणि लगेचच मगाशी मिक्सरमध्ये फिरवलेले मिश्रण भांड्यात ओता...
 
आता टोमाटो प्युरी ओता .......

आता हे संपूर्ण मिश्रण तेल बाजूला सोडेपर्यंत व्यवस्थित घट्टसर हलवा...
 
बाजूच्या भांड्यात ठेवलेल्या बटाट्यांना हलकेच टूथ पिक च्या सहाय्याने भोके पडून घ्या...
म्हणजे लज्जतदार मिश्रण बटाट्याच्या अगदी आत पर्यंत घुसून चव आत फिरवू अन जिरवू शकेल....
 
आता या लाल ग्रेव्ही तयार झालेल्या भांड्यात बटाटे बिनधास्त सोडा आणि सर्व बाजूंनी हलकेच फिरवत फिरवत सगळ्या मिश्रणाचे कोटिंग बटाट्यांना  मस्त  कवेत घेवू द्या....
 
ही तयार झाली आपली बटाटा इन रेड ग्रेव्ही ....
 
कशी झाली आहे भाजी...मस्त ना ?
 
ही भाजी आपण गरमागरम पोळ्या सोबत अथवा वाफाळणाऱ्या भातासोबत ही मस्तपैकी खावू शकतो...

 
सोबत पण मस्त उडदाचा पापड मात्र  हवा...
आणि तो पण लसूण मिश्रित......आवडत असल्यास

रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....


भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा

 देव बरा करो.........
-मिलिंद वेर्लेकर