#ट्रम्पचा विजय.... वास्तववादी बना, नाही तर...

    09-Nov-2016   
Total Views |



ट्रंप यांच्या निवडणुक विजयाने केवळ अमेरिकेलाच नव्हे तर जगाच्या भल्याचे कंत्राट केवळ आपल्यालाच मिळालेले आहे या आभिर्भावात वावरणार्या सर्वानाच जबरदस्त धक्का बसला आहे. ब्रेक्सिट नंतरच्या या दुसर्या धक्क्यानंतर तरी यांना शहाणपण येऊन वास्तवदर्शी विचार करतील अशी अपेक्षा करणेही फोल आहे याचे कारण यांनी आपल्या कल्पनेतून जे विश्व निर्माण केले आहे त्यापेक्षा वास्तव खूप वेगळे आहे व या वास्तवाचे कोणतेही भान प्रचलित व्यवस्थेला नाही याची खणखणीत जाणीव ट्रंप यांच्या निःसंदिग्ध विजयाने करून दिली आहे. ट्रंप यांनी कोणत्या स्थितित निवडणुक लढविली याचा विचार केल्याशिवाय या विजयाचे महत्व लक्षात येणार नाही. एकतर ट्रंप हे आजपर्यंत राजकारणाच्या बाहेर होते, त्यामुळे त्यांचा राजकीय अनुभव शून्य होता. त्यांनी एकामागोमाग वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावला होता व त्यात अमेरिकेतील हिस्पॅनिक, महिला, स्वतःला पुरोगामी समजणारे , सुशिक्षित यासर्वांचा विरोध पत्करला होता. ट्रंप यांना विरोधकांची गरज नाही, ते स्वतःच स्वतःचे विरोधक आहेत असे म्हटले जात असे. त्यांनी रिपब्लिकन पक्षातील प्राथमिक निवडणुक जिंकली तरी रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत नव्हता. त्या पक्षातील अनेक नेत्यांनी तोंडदेखलेही ट्रंप यांचे काम केले नाही. बहुसंख्य प्रमुख प्रसार माध्यमे त्यांच्या विरोधात होती. त्यांची कुचिष्टा करणे हा आपले बौध्दिक शहाणपण सिध्द करण्याचा राजमार्ग झाला होता. याची थोडीफार चुणुक महाराष्ट्रातील एका जगाला सल्ले देण्याकरिताच आपला जन्म झाला आहे या अभिनिवेशात लिहिणार्या संपादकाने महाराष्ट्राला करून दिली होती. चर्चेच्या फेरीत ट्रंप यांनी कसे वागावे यापासून प्रसारमाध्यमाना त्यांनी कसे हाताळावे यापर्यंत आपल्या स्तंभामधून त्यांना त्याने सल्ले दिले होते. त्यातच ट्रंप यांच्या महिलांच्या भानगडी बाहेर आल्यानंतर हिलरी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणे एवढा फक्त उपचार उरला आहे असे वातावरण तयार झाले होते. निवडणुकीच्या आदले दिवशी बराक ओबामा यांनी ट्रंप अध्यक्ष झाले तर अणुयुध्दाची जी कळी अध्यक्षाच्या हातात असते तिचा वापर किती जबाबदारीने करतील असा प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर ट्रंप यांनी आपल्या एकट्याच्या बळावर निवडणुक लढविली, आपल्या पध्दतीने लढविली, कोणाचीही पर्वा न करता लढविली आणि जिंकून दाखविली. केवळ डेमॉक्रॅटिक पक्षाची पारंपरिक राज्ये राखणे हिलरी क्लिंटन यांना शक्य झाले. जी बदलती राज्ये, स्विंग स्टेटस् म्हणून ओळखली जातात, त्यांनी ट्रंप यांना पाठंबा दिला. त्याची नेमकी कारणे कोणती आहेत याचा विचार केला पाहिजे.

या विजयाचा सर्वात महत्वाचा व पहिला निष्कर्ष म्हणजे लोकांच्या सर्व प्रचलित व्यवस्थासंबंधी भ्रमनिरास झाला आहे व या सर्व ब्यवस्थांच्या पलिकडे जाऊन ते पर्यायाचा शोध घेत आहेत हे स्पष्ट होते. मोदींच्या विजयामुळे आपल्याकडे सोशल मिडियाच्या दबदब्याची बरीच चर्चा झाली होती. येथे सोशल मिडियाही ट्रंप यांच्या विरोधात होता. सर्व प्रकारची माध्यमे हिलरी यांच्या बाजूला असतानाही, ट्रंप यांना अडविण्यासाठी हिलरीना मतदान केले पाहिजे, असे नकारात्मक त्वातावरण त्यातून तयार झाले व सर्व संपर्क साधने विरोधात असतानाही ट्रंप यांच्या समर्थकामधे भरभरून मतदान करण्याची प्रेरणा निर्माण झाली? आपल्या देशाचे व समाजाचे अस्तित्व टिकले पाहिजे अशी मूलभूत प्रेरणा प्रत्येक जिवंत राष्ट्रात व समाजात असते. जागतिकीकरणाच्या व मुस्लिम जिहादी चळवळीने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर व अस्तित्वावर आघात केला आहे या सुप्तावस्थेतील भावनेला ट्रंप यांनी हात घातला. आजच्या व्यवस्थेच्या फॅशनेबल परिभाषेत या भावनाना स्थान नाही. एवढा सर्व विरोध पत्करूनही, ट्रंप यांनी स्पष्टपणाने या भावनांना हात घातला व त्याचा त्याना भरभरून प्रतिसाद मिळाला. ट्रंप आपल्या व्यवस्थेच्या सभ्यतेच्या चौकटीत कसे बसत नाहीत यावर त्यांच्या विरोधकांचा भर होता तर या चौकटीच्या पलिकडे असलेल्या अस्तित्वाच्या संघर्षाला ट्रंप यांनी हात घातला होता. ही प्रक्रिया नीट समजून घेतली नाही व प्रचलित व्यवस्था आपल्याच अभिनिवेशात जगत राहिली तर त्यातून निर्माण होणारा अंतःसंघर्ष कोणता असेल याची चुणुक ट्रंप यांच्या विजयाने दाखविली आहे. मुस्लिम जिहादी दहशतवादाचा मुद्दा त्यांनी स्पष्टपणाने राजकीय पटलावर आणला आहे व त्याचा परिणाम दहशतवादाने ग्रस्त झालेल्या युरोपवर पण होणार आहे.

ट्रंप यांनी अमेरिकन लोकांच्या मनातील अस्तित्वाच्या संघर्ष भावनेला हात घातला असला तरी यातून बाहेर पडण्याकरिता त्यांच्याकडे काही निश्चित कार्यक्रम आहे असे नाही. किंबहुना असा निश्चित कार्यक्रम नसणे हेच त्यांचे शक्तिस्थान बनले होते. त्यामुळे ट्रंप यांच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यापेक्षा त्यांची टर उडविण्यावरच त्यांच्या विरोधकानी भर दिला. अमेरिकेसमोरचे प्रश्न आज गंभीर आहेत. त्यांचे परराष्ट्र धोरण फसले आहे. रशियाचा विरोध करण्यापेक्षा त्याची मदत घेऊन जिहादी दहशतवादाचा सामना करण्याचे संकेत त्यांनी आपल्या भाषणातून दिले आहेत. तसे घडले तर अमेरिकेच्या परराष्ट्रनितीचा तो नवा अध्याय असेल. सामाजिक दृ्ष्ट्या अमेरिकन कुटुंबव्यवस्था विस्कटलेली असल्याने तेथी उच्चशिक्षणावर अन्य देशातील विद्यार्थ्यांचा वरचष्मा निर्माण झाला आहे. त्याआधारे अमेरिकेच्या शिक्षणसंस्थांचे अर्थकारणही बदलले आहे. त्यामुळे व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रात, भारतीय, चिनी, आशियायी देशवासियांचा प्रभाव वाढत असून शारिरिक प्रधान कामात मेक्सिकन व अन्य लॅटिन अमेरिकन देशातील लोकांची स्पर्धा आहे. केवळ त्यांना अमेरिकेत येण्याची बंदी केली तर त्यातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमोर नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू झालेली ओबामाकेअर योजनेला लोकांचा विरोध असून हिलरी यांच्या पराभवात तिचा मोठा वाटा आहे. पण तिला पर्याय काढणे सोपे नाही. आपल्या जागतिक जबाबदार्यांच्या विचारापेक्षा अमेरिकेचे हितरक्षण यालाच आपण प्रधान्य देऊ असे ट्रंप यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जे देश चीनच्या विरोधासाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत, त्यांच्याबद्दल ट्रंप कोणती भूमिका स्वीकारणार हाही प्रश्न महत्वाचा आहे. भारतासंबंधी विचार करायचा असेल तर व्हिसा, व्यापार आणि दहशतवादविरोधी लढा हे तीन प्रश्न महत्वाचे बनतात. मोदी आणि ट्रंप हे दोघेही प्रचलित चौकटीच्या बाहेर विचार करणारे आहेत. त्या दोघांचे निर्माण होणारे परस्पर संबंध हा भारत अमेरिकेच्या भविष्यातील संबंधांचा कळीचा मुद्दा बनेल.

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय.