सुगंध हा मानवी मनाला पुरातन काळापासून मोहीत करत आला आहे. कालांतराने त्याने अत्तराचे रुप घेतले आणि सध्या डिओ, बॉडी स्प्रे आणि परफ्युम्सचा सर्वत्र बोलबाला आहे. कृत्रिम सुगंधांच्या या भाऊगर्दीत अत्तर मात्र ‘ओकेजनल’ झाले आणि अखंड दरवळणारा हा मनमोहक अत्तराचा सुगंध ‘फॉग’च्या जमान्यात मागे पडला. तेव्हा, अत्तराची परंपरा, निर्मिती आणि सद्यस्थिती यावर भाष्य करणारा हा लेख...
रस्त्यावरून चाललेला एक पुरुष आणि त्याच्यामागे लागलेल्या दहा-पंधरा स्त्रिया अशी कोणतीही जाहिरात आली की, ती नेमकी कशाची असेल हे आपल्या लक्षात येते. ती जाहिरात हमखास कोणत्या ना कोणत्या बॉडी स्प्रे/डिओड्रंटची असते. शेकडो कंपन्यांनी, बॉडी स्प्रे उत्पादनांनी परफ्युम्सची बाजारपेठ आज काबीज केलेली आहे. बॉडी स्प्रेच्या ’फॉग चल रहा है’च्या भडक, दिखाऊ जमान्यात गेली शेकडो वर्षे मानवी मनाला आपल्या शीतल, सौम्य सुगंधातून शांतता, एक नवा उत्साह, टवटवीतपणा मिळवून देणारी अत्तराची कुपी मात्र थोडीशी विस्मृतीत गेली. निरनिराळी सुगंधी फुले, वनस्पती यांच्यापासून तयार करण्यात आलेली पूर्ण नैसर्गिक अशी अत्तरे आज रासायनिक बॉडी स्प्रेच्या फवार्यापुढे फिकी पडली. मात्र, या परिस्थितीतही ज्याप्रमाणे एखादी अस्तंगत होत चाललेली कला कलाकार व रसिक नेटाने जतन करतात, पुढे नेतात, त्याप्रमाणेच अत्तर बनविण्याची नाजूक व सुंदर कला आजच्या काही अत्तर निर्मात्यांनी व आजही अत्तर वापरणार्या हौशी अत्तरप्रेमींनी जतन केली आहे व नेटाने पुढे नेली आहे.
सुगंध हा दरवळू दे...
अत्तर किंवा परफ्युम्स यांच्या निर्मितीच्या व वापराच्या निरनिराळ्या पद्धतींच्या विकासामागे अर्थातच माणसाला सुगंधाची असणारी प्रचंड ओढ हे एकमेव कारण आहे. सुगंध हा नेहमीच आपल्या मनाला आकर्षित करत असतो. आपला मूड बदलण्याची क्षमता या सुगंधात असते. सुगंधाच्या या अनिवार ओढीतूनच अत्तरे विकसित होत गेली. जवळपास सर्वच धर्मांमध्ये धार्मिक विधींच्या वेळी अत्तरे, गुलाबपाणी, धूप,आदींचा वापर करून सुगंधी वातावरण तयार केले जाते, ज्यातून वातावरणात एक नवा उत्साह दरवळतो. अनेक समारंभात सुरुवातीला पाहुण्यांच्या हातावर अत्तर लावून किंवा गुलाबपाणी शिंपडून त्यांचे स्वागत केले जाते. भारतात तर अत्तर निर्मितीच्या अनेक पद्धती शेकडो वर्षांपासून प्रचलित असल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशातील कनोज हे ठिकाण अत्तर उद्योगाची पंढरी मानली जाते.
अत्तर निर्मितीची कला
अत्तरे/परफ्युम्स बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. नैसर्गिक पदार्थांपासून बनविलेली आपल्याकडील लोकप्रिय अत्तरे वगळल्यास बाकी परफ्युम्स, डिओड्रंट्स आदी सर्व रासायनिक, कृत्रिम सुगंध आहेत. ज्यामध्ये अल्कोहोलिक पदार्थांचा वापर असतो व त्यांचा सुगंधही पूर्णपणे कृत्रिम असतो. भारतीय नैसर्गिक अत्तरांची प्रक्रिया जास्त कठीण व नाजूक आहे, ज्यात जास्त करून उर्ध्वपतन (डिस्टिलेशन) पद्धतीचा वापर केला जातो. अत्तर बनवतानाचा कच्चा माल म्हणजे अर्थातच सुवासिक फुले, पाने, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, वनस्पती. हा कच्चा माल गोळा करून त्याचा साठा केला जातो. या कच्च्या मालापासून सुवास वेगळा करण्याची पद्धत म्हणजेच उर्ध्वपतन. अत्तर बनविताना खरा कस लावणारी पायरी हीच असते. यामध्ये कच्चा माल एका भट्टीत टाकून त्याला उकळवले जाते. या उष्णतेतून त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे (तेल) बाष्प तयार होते. हे बाष्प एका नळीवाटे बाहेर काढून तो सुगंध चंदनाच्या तेलावर शोषून घेतला जातो व त्यालाच ‘अत्तर’ असे म्हटले जाते. बकुळ, हिना, गुलाब, मोगरा, चाफा, निशिगंध, केवडा, पारिजात, वाळा आदी फुलांची अत्तरे आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहेत.
रसायनविरहित अत्तरांची निर्मिती
भारतीय अत्तर निर्मितीची प्रक्रिया ही अशी तर, दुसरीकडे पाश्चात्त्य परफ्युम्स, डिओड्रंट्समध्ये मात्र द्रावक म्हणून अल्कोहोलचा वापर होतो. त्यामुळेच मुस्लीम समाजात या पाश्चात्त्य परफ्युम्सचा वापर कमी आढळतो. कारण इस्लाममध्ये अल्कोहोल किंवा एकूणच मादक पदार्थांचे सेवन वा बाह्य वापरही त्याज्य मानला गेलेला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजात अत्तरांचा वापर जास्त आढळतो. रासायनिक परफ्युम्समध्ये अल्कोहोल, अन्य रसायनांमुळे ऍलर्जी होऊ शकते. स्प्रे अंगावर मारल्यावर सूर्यकिरणांनी ऍलर्जी होण्याचा धोका असतो. तसेच काही बॉडी स्प्रेमुळे त्वचा पांढरी किंवा काळीही पडू शकते. त्यामुळे साधे किंवा रसायन विरहित अत्तरच प्रकृतीला चांगले ठरते.
मुस्लीम समाज आणि अत्तरांची लोकप्रियता
हौसेने वेगवेगळ्या अत्तरांचा नियमित वापर करणारे लोक मुस्लीम समाजात जास्त आढळतात. त्यामानाने हिंदू समाजात अत्तरांची हौस थोडी कमी आढळते. हिंदू समाजात जास्त करून पूजा-अर्चादी धार्मिक विधींमध्ये अत्तरांचा वापर असतो आणि ही मुख्यतः पारंपरिक अत्तरे असतात. हीना किंवा सुवासिक फुले उदा. गुलाब, मोगर्यापासून बनविलेली अत्तरे हिंदूंमध्ये जास्त वापरली जातात. याउलट मुस्लीम समाजामध्ये वापरल्या जाणार्या अत्तरांमध्ये अनेकविध प्रकार पाहायला मिळतात. काहींची नावेही खूपच भारदस्त असतात. ‘जन्नतुल फिरदोस’ हे एक असेच लोकप्रिय अत्तर.
कनोजचे जगप्रसिद्ध अत्तर
मुस्लीम समाजातील अत्तरांच्या लोकप्रियतेचे जसे एक कारण इस्लाममध्ये अल्कोहोल निषिद्ध असण्याचे आहे, तसे दुसरे एक कारण म्हणजे भारतात मध्ययुगातील मुस्लीम राजवटीत अत्तरांना मिळालेले उत्तेजन. विशेषतः मुघल साम्राज्याच्या काळात. त्यांचा एकूणच रसिक (काही प्रमाणात रंगेल) स्वभाव व त्यांचे शौक यामुळेच अत्तर व्यवसायाला खतपाणी मिळत गेले. त्यातच कनोज हे अत्तर निर्मितीचे केंद्र भरभराटीला आले. राजधानीच्या जवळ असल्याचा फायदाही कनोजला मिळाला. आजही कनोजचे अत्तराच्या व्यापारातील स्थान कायम आहे. अत्तर व्यापारी, दुकानदार यांच्याशी बोलताना कनोजचे महत्त्व जाणवते. ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत गायकांमध्ये त्यांच्या घराण्यांबद्दल जसा आदर दिसून येतो, तसाच आदर अत्तर क्षेत्रातील व्यापार्यांमध्ये कनोजबद्दल आढळतो. कनोजच्या अत्तर व्यवसायाबद्दल अनेक सुरस कथा आपल्याला ऐकायला मिळतात. अत्तर व्यवसाय कनोजमध्ये इतका रुजला आहे की, कनोजच्या सांडपाण्यालाही अत्तराचा सुगंध येतो असे म्हटले जाते! कनोजशिवाय म्हैसूर, चेन्नई, तंजावर, पुणे, पंढरपूर, नाशिक, वाराणसी, दिल्ली व अमृतसर या ठिकाणीही अत्तरनिर्मिती केली जाते.
डिओच्या जमान्यात हरवलेला सुगंध
एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्त्य जगात परफ्युम्स बनविण्याचे आधुनिक तंत्र विकसित होऊ लागले आणि अत्तर व्यवसायाला उतरती कळा लागली. पारंपरिक अत्तरे त्याच्या उत्पादन खर्चामुळे महाग पडू लागली, तर दुसरीकडे बॉडी स्प्रे किंवा सेंट आदींच्या माफक किमतीमुळे सर्वसामान्य अत्तर ग्राहक या पाश्चात्त्य पद्धतीच्या परफ्युम्सकडे खेचला गेला. एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला हा उद्योग क्षीण झाला. अगदी अलीकडच्या काळात तर बॉडी स्प्रे किंवा डिओड्रंट्सचा सर्वत्र अक्षरशः सुळसुळाट झाला. शिवाय, जाहिरातींच्या मार्याने मोठा वर्ग या बॉडी स्प्रेकडे खेचला गेला. त्याच्या वापराला प्रतिष्ठा मिळू लागली. त्यामुळे अत्तराची क्रेझ आधीसारखी राहिली नाही. अत्तराची ती ठराविक कुपी सोबत बाळगणे, त्यातून हातावर अत्तर लावून त्याचा सुगंध दरवळू देणे हे सारे कमी प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. परंतु, दुसरीकडे अत्तराचा चाहता असणारा एक हौशी वर्ग मात्र अत्तरालाच चिकटून राहिला. तसेच काहींनी या क्षेत्रात अधिक संशोधन केले. वनस्पतींपासून अत्तर बनविण्याचेही वेगवेगळे प्रकार शोधून काढले. अलीकडे पुन्हा एकदा नैसर्गिक, शुद्ध वगैरे गोष्टीकडे समाजातील एक वर्ग पुन्हा वळला आहे. त्याच्याकडून परंपरांना नव्या चष्म्यातून पुन्हा एकदा जोखले जात आहे. या वर्गात पुन्हा एकदा अत्तरांची आवड नव्याने निर्माण होते आहे, असे अत्तर विक्रेते आशेने सांगतात. मात्र, हा टक्का अगदीच थोडा आहे. मोठेच्या मोठे मार्केट सध्या रासायनिक परफ्युम्स आणि विशेषतः बॉडी स्प्रेंनी प्रचंड प्रमाणात व्यापलेले आहे.
अत्तरांच्या मोठ्याच्या मोठ्या बाजारपेठा (कनोजसारखा अपवाद वगळता) आता फारशा आढळत नाहीत. मुंबईतही आता फक्त मशीद भागातील मुहम्मद अली रोड व भेंडीबाजार परिसरात अत्तरांची मोठीच्या मोठी दुकाने एका रांगेत उभी असलेली आढळतात. अत्तरांच्या उत्पादक व व्यापार्यांचा हा समुदाय मुख्यत्वेकरून मुस्लीम आहे. यांपैकी अनेकांनी चार-पाच पिढ्यांपासून हा व्यवसाय नेटाने व आवडीने चालवला आहे. काही तर आपले आडनावच ‘अत्तरवाला’ असे सांगतात. या व्यवसायात अर्थातच मराठी माणूस अपवादानेच आढळतो. यामध्ये एस. एच. केळकरांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सुगंध निर्मिती क्षेत्रात त्यांनी आपला असा एक स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. मुंबईतील अत्तर विक्रेत्यांपैकी मोजकेच स्वतः अत्तर निर्मितीही करतात. यांचे बहुतांश कारखाने भिवंडी व वसई भागात आहेत, तर बाकी सर्वजण कनोज, वाराणसी वगैरे उत्तरेतील ठिकाणांहून अत्तर आणून येथे विकतात.
या सर्व दुकानदारांच्या बोलण्यातून एक रुबाब, जुन्या आठवणींचा कल्लोळ अगदी स्पष्टपणे जाणवतो. जवळपास प्रत्येकाशी अत्तरांबद्दल बोलायला सुरुवात केली की, ब्रिटिशपूर्व काळाच्या आठवणी आल्याच म्हणून समजा. गप्पांच्या ओघात ते थेट मुघल काळात अत्तरांचे कसे वैभव होते इथपर्यंत कधी पोहोचतात ते आपल्यालाही कळत नाही. वेगवेगळ्या सुगंधांची अत्तरे, ते सुगंध बनविण्याच्या पद्धती, त्यांचे प्रकार,नवनवे व अनोखे सुगंध बनवून दाखविण्याची त्यांची एकमेकांमधील चढाओढ हे सर्व ऐकल्यावर ही अत्तरांची दुनिया म्हणजे एक वेगळेच विश्व असल्याचे लक्षात येते. पिढ्यान् पिढ्यांपासून वेगवेगळ्या पदार्थांच्या किचकट व अवघड प्रक्रियेतून अत्तरासारखी अत्यंत सुंदर व आनंददायी वस्तू बनविणार्या या कलाकारांची दुनिया ‘फॉग चल रहा है‘च्या जमान्यात समजून घेणे हा एक अप्रतिम अनुभव आहे.
-निमेश वहाळकर