‘निवडणुकीत जनतेचा कौल मिळाला म्हणजे राज्याचे सर्व प्रश्न सुटले असं नाही. अद्याप बरीच मोठी आव्हाने आपल्यासमोर आहेत.’ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका – नगरपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच ऐतिहासिक यश प्राप्त केल्यानंतरच्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमातील ही वाक्यं आहेत आणि तीही या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची !
केंद्र व राज्य सरकारातील सत्ताधारी भाजपसाठी आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक अनेकार्थांनी महत्वाची होती. गेल्या काही दिवसांतील काहीशा अस्थिर भासणाऱ्या किंवा भासवण्यात येणाऱ्या राजकीय परिस्थितीत या निवडणुकीवर फडणवीस यांचं नेतृत्व आणि खुर्चीही पणाला लागली असल्याची चर्चा असताना फडणवीस यांनी या निकालातून सर्व चर्चांच्या गुऱ्हाळांना इतकं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. या विजयातून राज्यातील जनतेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू, शांत, संयमी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या विजयामागे विचार करायला लावणारे अनेक मुद्दे आहेत ज्यातून फडणवीस यांचे संयत नेतृत्व तितकंच भेदक असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
नोट रद्दीकरण- वीक पॉइंट नव्हे तर प्लस पॉइंट !
५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर स्वाभाविकच ग्रामीण व निमशहरी भागात खळबळ माजली. बँका, एटीएम्सची कमतरता, त्यात जिल्हा सहकारी बँकांवरील निर्बंध यांमुळे सामान्य माणसाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर करत असतानाच देशातील तमाम नागरिकांना साद घालत काळा पैसा व भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी सरकारला थोडे दिवस देण्याची व होणारा त्रास सहन करण्याची विनंती केली होती. आणि या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसादही दिला होता. सोशल मिडियापासून विविध संस्था, खुद्द केंद्र सरकार यांनी केलेल्या सर्वेक्षणात तो दिसूनही आला होता. मात्र, काही ठराविक मंडळींनी नेहमीप्रमाणे प्रत्येक बाबतीत आपली नकारात्मक घंटा वाजवणे चालूच ठेवत या निर्णयाचा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसेल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहीजण तर थेट भाजपच्या ‘पानिपता’पर्यंत जाऊन पोहोचले. अशा वातावरण निर्मितीला सुरुवातीला काही प्रमाणात यशही आलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिस्थितीचा अचूक अंदाज घेत जो मुद्दा आपला ‘वीक पॉइंट’ ठरणार असल्याचे भाकीत वर्तवलं जात होतं, तोच मुद्दा आपला ‘प्लस पॉइंट’ म्हणून पुढे आणला. राज्यभरातील सभांमध्ये नोट रद्दीकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ‘पंतप्रधान मोदींनी पुकारलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईत तुम्ही – आम्ही सारेच सेनानी होऊयात’, असं भावनिक आवाहन केलं. देशाच्या नेत्यापाठोपाठ राज्याच्या नेत्यानेही राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यावर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने थेट आपल्या दारात येऊन संवाद साधावा ही बाब जनतेला अर्थातच भावली. आणि अनेक मुद्द्यांसोबत जनतेने नोट रद्दीकरणाच्या निर्णयावरही आपली भूमिका आपल्या मतदानातून स्पष्ट केली.
विकासाची भाषा पुन्हा एकदा भिडली
नगरपालिका – नगरपंचायत निवडणुका म्हणजे आपल्या जिल्ह्यातील आपल्या सग्या-सोयऱ्याना ‘वर’ आणण्याची आणि थोडक्यात आपल्या जहागीरीतील आपले ‘वर्चस्व’ सिद्ध करून प्रतिस्पर्ध्याला कसा शह दिला हे सांगून राज्यपातळीवर मिरवायची संधी असे समीकरणच गेल्या काही वर्षांत बनलं होतं. त्यामुळे व्यक्तिगत हेवे-दावे, तालुक्याचा-जिल्ह्याचा कोण ‘किंग’, कोण ‘डॉन’ हेच मुद्दे प्रचारासाठी वापरण्यात येत होते. त्यापलीकडे जाऊन हाती काय लागलं या प्रश्नाचं उत्तर शून्य हेच येत होतं.
फडणवीस यांनी यावेळच्या निवडणुकांत ही परिस्थिती बदलण्याचा बराच यशस्वी प्रयत्न केला. दिवसाकाठी घेतलेल्या चारचार सभांमध्ये फडणवीसांनी सातत्याने राज्य सरकारची विविध क्षेत्रांतील कामगिरी आणि संबंधित विकासात्मक मुद्दे यांवर भर दिलेला दिसून आला. जलयुक्त शिवारपासून हागणदारीदारीमुक्त महाराष्ट्रपर्यंत कृषी, पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सर्व बाबींवर राज्य सरकार करत असलेलं काम हेच फडणवीसांच्या भाषणांतील मुख्य मुद्दे राहिले. आपल्यावर व्यक्तिगत पातळीवर करण्यात आलेल्या टीकाटिप्पण्यांचा समाचार वगैरे घेण्यासाठी त्यांनी या प्रचारसभांचा वापर केला नाही. आणि त्यामुळेच एकसारखं त्याच त्या नेत्यांच्या गटा-तटांच्या वर्चस्वाच्या बजबजपुरीला कंटाळलेल्या जनतेने आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक मुद्द्यांवर बोलणाऱ्या नेत्याच्या बाजूने कौल दिला.
बेरजेच्या राजकारणासह उत्तम नियोजनाची जोड
पक्षाच्या प्रचाराची धुरा फ्रंट फूटवर येऊन आपल्या खांद्यावर घेत असताना बहुमतावर चालणाऱ्या लोकशाही व्यवस्थेत आवश्यक अशा बेरजेच्या राजकारणाचीही मदत फडणवीस यांनी घेतली. विशेषतः कोल्हापुरात माजी मंत्री विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षाला महायुतीत सामावून घेण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूर पट्ट्यात जबरदस्त यशस्वी ठरला. महायुतीतील घटकपक्ष व त्याच कोल्हापूर-सांगली भागात प्रभाव असणाऱ्या खा. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जनसुराज्य प्रतिस्पर्धी. ‘स्वाभिमानी’चे नेते जनसुराज्य महायुतीत आल्याच्या दिवसापासून खासगीत भाजपवर नाराजी व्यक्त करताना दिसत होते. दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री जनसुराज्यबाबत आशादायी होते. त्यांचे सर्व अंदाज अचूक ठरले आणि कोल्हापूर भागात काही नगरपालिकांमध्ये जनसुराज्यच्या साथीने भाजपला उत्तम कामगिरी करता आली तर काही ठिकाणी चंचुप्रवेश करता आला. दुसरीकडे स्वाभिमानीसोबत आघाडी करूनही राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याची सांगलीतील इस्लामपूरमधील सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश आलं.
या प्रकारच्या बेरजेच्या राजकारणासह भाजपने केलेलं एकूण प्रचारयंत्रणेचं उत्कृष्ट नियोजनही बरंच यशस्वी ठरलं. पक्ष व सरकारमध्ये उत्तम समन्वय राहिला. मंत्री, प्रदेश कार्यकारिणी नेते यांनी पद्धतशीरपणे आपापल्या वाट्याला आलेली कामं पद्धतशीरपणे पार पाडली. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर दिवसाकाठी तीन, चार कधी तर त्याहून अधिक ठिकाणी सभा घेतल्या. अनेकदा फडणवीस यांचं सकाळी मुंबईत एखाद्या कार्यक्रमाला, संध्याकाळी नागपूरमध्ये एखाद्या बैठकीला आणि दिवसभरात मराठवाडा किंवा कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात एका जिल्ह्यात तीन चार सभा असं वेळापत्रक राहिलं. फडणवीस यांनी घेतलेल्या सुमारे ४० ठिकाणच्या सभांपैकी तब्बल ३२ ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळालं आणि फडणवीसांचा ‘स्ट्राईक रेट’ जबरदस्त असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
दणदणीत यशानंतरही पाय जमिनीवरच
यशापयशाच्या शक्यतांनी भरपूर ढगाळ झालेल्या वातावरणात इतकं घवघवीत यश प्राप्त करूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले पाय जमिनीवर असल्याचं दाखवून दिली आहे. आजच्याच भाजपने साजऱ्या केलेल्या विजयोत्सवात फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आदर्श व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात सांगितलेल्या तत्वांचा मार्ग यामुळेच आम्ही यशस्वी झालो. या विजयातून जनतेनं आपण पंतप्रधान मोदींच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं आहे. या निकालामुळे नव्या महाराष्ट्राकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे.’ हा विजय फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सामान्य जनतेला अर्पण केला.
राज्यात अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यांत आपल्या तालुक्यातील किंवा त्या भागातील एखाददुसरी नगरपालिका जिंकल्यावर दिलेल्या प्रतिक्रिया पाहता फडणवीस याचं हे बोलणं फार महत्वाचं आहे. ‘निवडणुकीत कौल मिळाला म्हणजे राज्याचे सारे प्रश्न सुटले असं नाही. अद्याप अनेक मोठी आव्हाने समोर आहेत.’ ही भाजपच्या विजयोत्सवात ‘सेलिब्रेशन मूड’मध्ये असलेल्या कार्यकर्त्यांसमोर फडणवीसांची वाक्यं आहेत. हे सगळं जितकं प्रामाणिकपणातून आलेलं आहे, तितकंच संयमीपणातून, सावधपणातून आलेलं आहे. विविध नेत्यांनी दिलेल्या एक नगरपालिका जिंकल्यावर ‘इथे आपणच डॉन’ स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहिल्यास देवेंद्र फडणवीस यांची वागणूक एक नेता म्हणून पुढे जात असताना किती महत्वाची आणि वेगळेपण जपणारी आहे हे दिसून येतं.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून सत्तेत दोन वर्षं झाल्यानंतर आज हे घवघवीत यश मिळेपर्यंत फडणवीस यांची ही संयत, सावध दुसरीकडे शांत, मृदू आणि तितकीच चाणाक्ष देहबोली बरंच काही सांगून जाणारी आहे. राज्यातील सामान्य मतदारही या सगळ्या घडामोडींचं, बारीकसारीक तपशिलांचं बारकाईने निरीक्षण करतो आहे. स्थानिक नेते, स्थानिक मुद्दे यांच्यापुढे जाऊन भाजपला आज जे यश मिळालं आहे ते मतदार राजाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा दिलेला कौल आहे हेच यातून सिद्ध होतं आहे.
निमेश वहाळकर